पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला बहुमत मिळाल्यानंतर आता अध्यक्षपदासाठी चुरस निर्माण झाली आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार याबाबत अंतिम निर्णय घेणार असून, त्या माजी आमदारांच्या कुटुंबाकडे अध्यक्षपद देणार, की नव्या चेहऱ्याला संधी देणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला ७३ पैकी ५१ जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत निवडणूक लढविली. आता अध्यक्षपदासाठी चुरस निर्माण झाली आहे. दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांचे चिरंजीव तुषार थोरात, इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील- ठाकरे आणि भोरचे माजी आमदार काशिनाथ खुटवड यांचे चिरंजीव विक्रम खुटवड या तीन माजी आमदारांची मुले जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत निवडून आली आहेत. त्यापैकी हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील- ठाकरे या सलग दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. तुषार थोरात आणि विक्रम खुटवड हे पहिल्यांदाच जिल्हा परिषदेमध्ये निवडून आले आहेत. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या अंतिम निर्णय घेणार आहेत. त्या कोणाला संधी देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दौंडमध्ये माजी आमदार रमेश थोरात आणि भाजपचे विद्यमान आमदार राहुल कुल हे पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी आहेत. तुषार थोरात हे भाजपच्या उमेदवाराचा पराभव करून केडगाव-बोरीपारधी गटातून निवडून आले आहेत. आमदार राहुल कुल यांनी प्रयत्न करूनही त्यांना थोरात यांचा पराभव करता आला नाही. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील- ठाकरे या इंदापूर तालुक्यातील बावडा या गटातून सलग दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत.

विक्रम खुटवड हे कामथडी- भोंगवली गटातून विजयी झाले, तर त्यांच्या पत्नी तृप्ती विक्रम खुटवड या त्याच गटातील कामथडी या पंचायत समिती गणातून विजयी झाल्या आहेत. विक्रम खुटवड यापूर्वी २००७ मध्ये पंचायत समिती सदस्य होते. या पंचायत समितीचे ते उपसभापतीही होते. २०१२ मध्ये तृप्ती खुटवड या जिल्हा परिषद सदस्या होत्या. २०१४ मध्ये विक्रम खुटवड यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. मात्र, त्यांचा पराभव झाला. आता ते पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले आहेत.

अध्यक्षपदाचे आणखी काही दावेदार

माजी मंत्री, आंबेगाव विधानसभेचे विद्यमान आमदार दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे विवेक वळसे पाटील, दौंड तालुक्यातील ज्येष्ठ सदस्य वीरधवल जगदाळे हे देखील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे दावेदार असल्याचे सांगण्यात आले.