पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्हा परिषदेचा कारभार हा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी इंदापूर तालुक्याच्या हाती दिल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या गटनेतेपदी इंदापूरमधील जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले यांची निवड करण्यात आली आहे. ढोले यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दिले जाणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी गटनेता म्हणून आगामी काळात ढोले जिल्ह्यातील कारभार पाहणार आहेत.

पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये ७३ पैकी ५१ जागा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला मिळाल्या. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद कोणाला द्यायचे हे निश्चित झालेले नाही. मात्र, गटनेतेपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ढोले यांची निवड  केली आहे. ढोले यांना या पदाची जबाबदारी देण्यासाठी वडगाव मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील शेळके यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर ढोले यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. ढोले हे पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत इंदापूर तालुक्यातून सलग दोन वेळा निवडून आले आहेत.

इंदापूर तालुक्यातील राजकीय समीकरणे आता बदलली आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या दोन्ही ‘राष्ट्रवादी’ एकत्र येऊन निवडणूक लढवली. राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे एके काळचे राजकीय प्रतिस्पर्धी एकत्र आले आहेत.

इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या आठ जागांसह पंचायतीच्या १६ जागा जिंकून प्रतिस्पर्धी भाजपच्या सर्व उमेदवारचा पराभव करीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने इंदापूर तालुक्यात ताकद दाखवून दिली. गेल्या  विधानसभा निवडणुकीत सुमारे ४० हजार मते घेतलेले प्रवीण माने भाजपमध्ये गेले. त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटातून बाहेर पडत इंदापूरचे माजी नगराध्यक्ष प्रदीप गारटकर हेही भाजपत आले.

तत्पूर्वी गारटकर यांनी इंदापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवली. त्या निवडणुकीत त्यांना अत्यल्प मतांच्या फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले.  त्या वेळी झालेल्या आघाडीत हर्षवर्धन पाटील हेही होते. मात्र, पाटील यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत पक्षाबरोबरच राहणे पसंत केले. या तुल्यबळ राजकीय शक्ती एकत्र झाल्याने भाजपच्या उमेदवारांचा निभाव लागला नाही. सर्व उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले. आता इंदापूर तालुक्यावर  ‘राष्ट्रवादी’चे वर्चस्व निर्माण झाले आहे. हे वर्चस्व अधिक घट्ट करण्यासाठी जिल्हा परिषदेचे गटनेते पददेखील इंदापूर तालुक्याला देण्यात आल्याची चर्चा आहे.