Who is Arvind Khanna : राजधानी दिल्लीपाठोपाठ बिहारमधील विधानसभा निवडणूक जिंकून विजयाच्या गतीवर स्वार झालेल्या भाजपाने आता आपले लक्ष्य पश्चिम बंगालकडे वळवले आहे. आगामी काळात पश्चिम बंगालसह पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक आयोगाकडून या राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याआधीच भारतीय जनता पक्षाला पंजाबमध्ये मोठा धक्का बसला आहे. पंजाबमधील भाजपाचे माजी उपाध्यक्ष अरविंद खन्ना यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह शिरोमणी अकाली दलात प्रवेश केला आहे. त्यांनी अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. यापार्श्वभूमीवर कोण आहेत अरविंद खन्ना? त्यांनी भाजपाला अचानक सोडचिठ्ठी का दिली? त्याविषयीचा हा आढावा…

कोण आहेत अरविंद खन्ना?

अरविंद खन्ना यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात शिरोमणी अकाली दलातून केली होती. पक्षात काही दिवस सक्रियपणे काम केल्यानंतर पुढे त्यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. २००२ मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर संगरूर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला. त्यानंतर दोन वर्षांनी झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना संगरूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्यांच्याविरोधात शिरोमणी अकाली दलाने सुखदेव सिंह ढींडसा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. त्यावेळी अटीतटीच्या लढाईल सुखदेव सिंह यांनी विजय मिळवून खन्ना यांना पराभवाचा धक्का दिला.

२०१२ मध्ये पहिल्यांदा आमदार

माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचे निकटवर्तीय मानले जाणारे अरविंद खन्ना २०१२ मध्ये धुरी विधानसभा मतदारसंघातून पुन्हा आमदार म्हणून निवडून आले. मात्र, दोन वर्षानंतर त्यांनी वैयक्तिक कारणे देऊन सक्रिय राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आणि विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. निवृत्तीनंतर खन्ना यांनी व्यावसायिक क्षेत्रात प्रवेश केला आणि अनेक नामांकित व्यक्तींबरोबर चांगले संबंध तयार केले. संरक्षण, रिअल इस्टेट, हॉस्पिटॅलिटी आणि क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांबरोबर त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. प्राथमिक आरोग्यसेवा, ग्रामीण विकास आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या उम्मीद फाउंडेशन या संस्थेचेही ते प्रमुखही आहेत.

आणखी वाचा : मालेगावच्या उपमहापौर शान-ए-हिंद? कोण आहेत? टिपू सुलतानच्या फोटोवरून वाद कसा निर्माण झाला?

२०२२ मध्ये भाजपात प्रवेश

जानेवारी २०२२ मध्ये खन्ना यांनी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पुन्हा सक्रिय राजकारणात प्रवेश केला. त्यांनी भाजपाच्या तिकीटावर संगरूर विधानसभा निवडणूक लढवली. मात्र, या निवडणुकीत त्यांना आम आदमी पार्टीचे उमेदवार नरिंदर कौर भराज यांच्याकडून दारुण पराभवाचा सामना करावा लागला. २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने खन्ना यांना पुन्हा संगरूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. या निवडणुकीत त्यांनी एक लाख २८ हजार मताधिक्य घेतली. तरीही त्यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला. मतदारांचा कौल लक्षात घेता आपण भाजपाला सोडचिठ्ठी देऊन अकाली दलात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे खन्ना यांनी स्पष्ट केले.

अरविंद खन्ना नेमके काय म्हणाले?

१९९७ मध्ये माझा राजकीय प्रवास अकाली दलाच्या युवा आघाडीतून सुरू झाला होता. त्यामुळे माझ्यासाठी ही एक प्रकारची घरवापसी आहे. समर्थकांच्या भावना लक्षात घेऊन मी अकाली दलात सामील झालो आहे. आम आदमी पार्टीच्या विजयापूर्वी संगरूर विधानसभा मतदारसंघात अकाली दलाचे वर्चस्व होते. भाजपाबद्दल माझ्या मनात कोणतीही कटुता नसून पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी मला दिल्ली आणि पंजाबमध्ये खूपच मानसन्मान दिला. मात्र, कधीकधी तुम्हाला आपापल्या कार्यकर्त्यांच्या मनातील भावना लक्षात घेऊन राजकीय निर्णय घ्यावा लागतो. आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही संगरूर मतदारसंघातून नक्कीच पक्षाला विजय मिळवून देणार, असे अरविंद खन्ना यांनी सोमवारी दी इंडियन एक्सप्रेसला सांगितले.

हेही वाचा : वंदे मातरम विरुद्ध जन गण मन; बंगालमध्ये राजकीय वादंग का उठला? कारण काय?

भाजपानेही दिल्या खन्ना यांना शुभेच्छा

अकाली दलात परतण्याचा निर्णय घेतल्यानंतरही खन्ना यांनी भाजपाशी असलेले आपले राजकीय संबंध तोडले नाहीत. पंजाबमधील भाजपाच्या अनेक नेत्यांनीही त्यांना नव्या राजकीय इनिंगसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यादरम्यान राज्यातील भाजपा व अकाली दलाच्या युतीच्या चर्चांनाही पूर्णविराम मिळाला आहे. २०२७ मध्ये राज्यात होणारी विधानसभा निवडणूक आम्ही स्वबळावर आणि पूर्ण ताकदीनिशी लढणार, असे भाजपाचे प्रवक्ते प्रीतपाल सिंग बलियावाल यांनी स्पष्ट केले आहे. यादरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला संगरूर विधानसभा मतदारसंघात शह देण्यासाठी अकाली दलाने जोरदार तयारी केल्याचे दिसून येत आहे. त्यासाठीच पक्षाने खन्ना यांना आपल्या गोटात सामील करून घेतल्याची चर्चा आहे. या मतदारसंघात पूर्वी सुखदेव सिंह ढींडसा आणि त्यांचे पुत्र परमिंदर सिंग ढींडसा यांचा मोठा राजकीय प्रभाव होता. सध्या परमिंदर सिंग हे शिरोमणी अकाली दलातील बंडखोर नेत्यांनी सुमारे वर्षभरापूर्वी स्थापन केलेल्या गटात सक्रित आहेत. त्यामुळे या मतदारसंघात नेमके कोणाचे वर्चस्व पाहायला मिळणार, याचीच उत्सुकता अनेकांना लागून आहे.