पुणे : पुरंदर विधानसभा मतदारसंघातील एके काळचे शत्रू आणि महायुतीमुळे आता मित्र झालेले, पारंपरिक प्रतिस्पर्धी माजी मंत्री विजय शिवतारे आणि भाजपमध्ये प्रवेश केलेले काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप हे पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत.
पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला सत्तेसाठी एका जागेची गरज असताना, शिवतारे आणि जगताप यांनी सत्तेत सहभागी होण्यासाठी राजकीय डावपेच सुरू केले आहेत. ‘राष्ट्रवादी’ सत्ता स्थापन करण्यासाठी दोन्ही मित्रपक्षांच्या संपर्कात असून, कोणाची साथ घ्यायची, या संभ्रमात पडली असल्याने मित्रपक्षांमध्येच ‘राजकीय संंशयकल्लोळ’ निर्माण झाल्याचे चित्र आहे.
पुरंदर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी झालेल्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने बाजी मारली आहे. जिल्हा परिषद गटात दोन, तर पंचायत समितीमध्ये ८ पैकी ४ जागा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने जिंकल्या. त्यामुळे शिवसेना (शिंदे) पक्षाचे विद्यमान आमदार विजय शिवतारे यांना धक्का बसला आहे. पंचायत समितीमध्ये ‘राष्ट्रवादी’च्या चार, भाजप आणि शिवसेना (शिंदे) पक्षाला प्रत्येकी दोन जागा मिळाल्या आहेत.
‘राष्ट्रवादी’ला सत्ता स्थापन करण्यासाठी एका जागेची गरज आहे. त्यासाठी ‘राष्ट्रवादी’ भाजप आणि शिवसेना (शिंदे) या दोन्ही मित्रपक्षांच्या संपर्कात आहे. शिवसेना (शिंदे) पक्ष ‘राष्ट्रवादी’ला बिनशर्त पाठिंबा देण्याच्या तयारीत आहे, तर भाजपला पंचायत समितीचे उपाध्यक्षपद हवे आहे. या तालुक्यात ‘राष्ट्रवादी’ आणि शिवसेना (शिंदे) हे प्रमुख प्रतिस्पर्धी पक्ष आहेत. माजी मंत्री शिवतारे यांनी सहकार्याचा हात पुढे केला असला, तरी ‘राष्ट्रवादी’कडून त्यांना प्रतिसाद देण्यात आलेला नाही. भाजप मात्र उपाध्यक्षपद देण्याच्या बदल्यात पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे ‘राष्ट्रवादी’ कोणाची साथ घेणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, पुरंदरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या दोन्ही ‘राष्ट्रवादीं’नी एकत्र येऊन निवडणूक लढवली. माजी आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ही निवडणूक लढवली. भाजपला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये प्रत्येकी दोन जागा मिळाल्या. शिवसेनेचे (शिंदे) आमदार विजय शिवतारे यांची मात्र या निवडणुकीत पीछेहाट झाली. यापूर्वी जिल्हा परिषदेमध्ये ४ पैकी ३ जागा शिवसेनेकडे होत्या, तर १ जागा काँग्रेसकडे होती. पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे ६, तर काँग्रेसचे २ सदस्य होते. या निवडणुकीत मात्र शिवसेनेला जिल्हा परिषदेमध्ये खाते उघडता आले नाही. पंचायत समितीमध्ये फक्त २ जागा निवडून आल्या.
काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली भाजपने या निवडणुकीत मुसंडी मारली. भाजपला जिल्हा परिषदेमध्ये आणि पंचायत समितीमध्ये प्रत्येकी दोन जागा मिळाल्या. यापूर्वी भाजपच्या चिन्हावर कधीही निवडणूक लढवली गेली नव्हती.
पुरंदर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही सदस्य नव्हता. या वेळी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार) चांगले यश मिळाले. जिल्हा परिषदेच्या २ व पंचायत समितीच्या ४ जागा मिळाल्या. काँग्रेसला मात्र खाते उघडता आले नाही.
