पुणे : भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी पुरंदरचे शिवसेना (शिंदे) पक्षाचे आमदार विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाबरोबर असलेले राजकीय वैर बाजूला ठेवून केलेल्या राजकीय खेळीने पुरंदर पंचायत समितीमध्ये भाजप सत्तेपासून दूर राहिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाशी जुळवून घेताना आमदार शिवतारे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेले काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप यांच्यावरही कुरघोडी केल्याचे स्पष्ट झाले आहे. पुरंदर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने बाजी मारली. जिल्हा परिषद गटात दोन, तर पंचायत समितीमध्ये ८ पैकी ४ जागा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला मिळाल्या. या निकालाने आमदार विजय शिवतारे यांच्यावर नामुष्की ओढवली.

पंचायत समितीमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाली होती. ‘राष्ट्रवादी’च्या चार, भाजप आणि शिवसेना (शिंदे) पक्षाला प्रत्येकी दोन जागा मिळाल्या. त्यामुळे ‘राष्ट्रवादी’ला सत्ता स्थापन करण्यासाठी महायुतीतील कोणत्या तरी एका पक्षाच्या पाठिंब्याची आवश्यकता होती. या ठिकाणी सत्तेत सहभागी होण्यासाठी शिवसेना (शिंदे) आणि भाजप हे दोन्ही पक्ष तयारीत होते. मात्र, आमदार शिवतारे यांनी ‘राष्ट्रवादी’शी असलेले वैर विसरून पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली. त्याबदल्यात पंचायत समितीचे उपसभापती पद देण्याची ‘राष्ट्रवादी’ने सहमती दिली. आमदार शिवतारे यांच्या या खेळीने भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुरंदर पंचायत समितीच्या सभापतीपदी ‘राष्ट्रवादी’चे अमित झेंडे यांची सभापतिपदी शिवसेनेचे प्रवीण जगताप यांची निवड झाली आहे. यंदा सभापतिपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असल्याने दिवे गणातून निवडून आलेले झेंडे आणि वीर गणातून निवडून आलेले जगताप यांची वर्णी लागली.

दरम्यान, पुुरंदरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या दोन्ही ‘राष्ट्रवादीं’नी एकत्र येऊन निवडणूक लढवली. माजी आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ही निवडणूक लढवली. भाजपला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये प्रत्येकी दोन जागा मिळाल्या. आमदार विजय शिवतारे यांची मात्र या निवडणुकीत पीछेहाट झाली.

यापूर्वी जिल्हा परिषदेमध्ये ४ पैकी ३ जागा शिवसेनेकडे होत्या, तर १ जागा काँग्रेसकडे होती. पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे ६, तर काँग्रेसचे २ सदस्य होते. या निवडणुकीत शिवसेनेला जिल्हा परिषदेमध्ये खाते उघडता आले नाही. पंचायत समितीमध्ये फक्त २ जागा निवडून आल्या. भाजपला जिल्हा परिषदेमध्ये आणि पंचायत समितीमध्ये प्रत्येकी दोन जागा मिळाल्या. यापूर्वी भाजपच्या चिन्हावर कधीही निवडणूक लढवली गेली नव्हती. पुरंदरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही सदस्य नव्हता. यावेळी मात्र ‘राष्ट्रवादी’ सत्तेवर आली आहे.