मागील अनेक दिवसांपासून विरोधकांच्या ऐक्यासाठी प्रयत्न केला जात आहे. या मोहिमेत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी देशातील सर्व प्रमुख विरोधी पक्षांच्या प्रमुखांच्या भेटी घेतल्या आहेत. नितीश कुमार यांच्या या प्रयत्नांमुळे आगामी १२ जून रोजी बिहारमधील पटणा येथे विरोधकांची महत्त्वाची बैठक पार पडणार होती. मात्र काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि माजी खासदार राहुल गांधी उपस्थित राहण्याची शक्यता नसल्यामुळे ही बैठक आता पुढे ढकलण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१२ जून रोजी होणार होती बैठक

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाला पराभूत करायचे असेल तर एकजूट महत्त्वाची आहे, हे विरोधी पक्षांना उमगले आहे. यासाठी २०२४ ची लोकसभा निवडणूक आणि या निवडणुकीसाठीच्या ऐक्यावर चर्चा करण्यासाठी बिहारमधील पटणा येथे येत्या १२ जून रोजी विरोधकांची बैठक होणार होती. या बैठकीला देशातील सर्व महत्त्वाच्या विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहणार होते. मात्र पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी हे या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे. तसा संदेश काँग्रेस पक्षाकडून देण्यात आलेला आहे. मात्र विरोधकांच्या ऐक्यावरील चर्चेसाठीची ही पहिलीच बैठक आहे. या बैठकीस या दोन नेत्यांची उपस्थिती गरजेची असल्यामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे.

राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर असल्यामुळे बैठक लांबणीवर

राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. ते १८ जूननंतर भारतात परतणार आहेत. त्यामुळे ही बैठक २० जूनच्या नंतरच आयोजित करावी, अशी काँग्रेसची इच्छा होती. मात्र तरीदेखील जनता दल (यूनायटेड) पक्षाने विरोधकांची ही बैठक १२ जून रोजी होईल असे जाहीर केले होते. अन्य पक्षांसाठी ही तारीख सोईची आहे, असे यावेळी कारण देण्यात आले होते. मात्र ही तारीख डीएमके, सीपीआय(एम) या पक्षांसाठी सोईची नव्हती. तरीदेखील जेडीयूने बैठकीच्या तारखेची थेट घोषणा करून टाकली होती. त्यामुळे खरगे आणि राहुल गांधी हे या बैठकीस उपस्थित राहू शकणार नाहीत, असा संदेश काँग्रेसकडून देण्यात आला होता.

आता बैठक २३ जून रोजी होण्याची शक्यता

विरोधकांच्या पहिल्याच बैठकीत काँग्रेसचे सर्वोच्च नेते उपस्थित असणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास चुकीचा संदेश जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता जेडीयूने ही बैठक पुढे ढकलली आहे. आता ही बैठक २३ जून रोजी होण्याची शक्यता आहे. याआधी ही बैठक १२ जून रोजी झाल्यास आम्ही आमचे अन्य राज्यातील मुख्यमंत्रीपदावरच्या नेत्याला बैठकीस पाठवू असे काँग्रेसने सांगितले होते.

विरोधकांच्या ऐक्याची जबाबदारी नितीश कुमार यांच्यावर

दरम्यान, आगामी निवडणुकीत विरोधकांचे ऐक्य झाल्यास आम्हीच केंद्रस्थानी राहू, असा विश्वास काँग्रेसला वाटतो. मात्र तरीदेखील विरोधकांचे ऐक्य घडवून आणण्याच्या प्रयत्नांत त्यांनी नितीश कुमार यांना पुढे केलेले आहे. देशातील तृणमूल काँग्रेस, बीआरएस, आम आदमी पार्टी अशा काही पक्षांना काँग्रेसचे नेतृत्व मान्य नाही. त्यामुळे काँग्रेसने नितीश कुमार यांना पुढे करून विरोधकांचे ऐक्य घडवण्यासाठी पाऊल टाकले आहे. त्यामुळे आगामी काळात या प्रयत्नांना यश येणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi absent opposition party patana meeting postponed prd
First published on: 06-06-2023 at 20:54 IST