Rahul Gandhi Akhilesh Yadav : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्ष (SP) आणि काँग्रेसमधील मतभेद आता उघडपणे समोर येऊ लागले आहेत. जागावाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये कटूता निर्माण झाल्याचे चित्र आहे. नेतृत्व आणि अल्पसंख्याक मतदारांच्या प्रतिनिधित्वावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याने सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होत आहे तो म्हणजे अखिलेश यादव आणि राहुल गांधी आगामी निवडणूक एकत्र लढणार की दोघांचे मार्ग वेगळे होणार?

दोन्ही पक्षांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत दमदार कामगिरी केली. पण, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही पक्षांतील संबंध बिघडल्याचे दिसते. दोन्ही पक्षांच्या राज्यस्तरीय कार्यकर्त्यांमध्ये समन्वयाऐवजी संघर्षाचे वातावरण निर्माण झाले आहे. कार्यकर्ते एकमेकांना राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून वागवत आहेत.

दोन्ही पक्षांचे संख्याबळ किती?

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस समाजवादी पक्षाच्या युतीला मोठे यश मिळाले आणि त्यांनी ४३ जागांवर विजय खेचून आणला. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या ८० जागांपैकी निम्म्या जागांवर विजय मिळवत त्यांनी भाजपाला मोठे आव्हान दिले होते.

समाजवादी पक्ष (SP) : ६२ जागांवर निवडणूक लढवली, त्यापैकी ३७ जागांवर विजय मिळवला.
काँग्रेस (INC) : १७ जागांवर लढली, त्यापैकी ६ जागा जिंकल्या.
सपा-काँग्रेस आघाडीमुळे उत्तर प्रदेशात भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) केवळ ३६ जागांवर मर्यादित राहिली.

लोकसभेत समाजवादी पक्ष उत्तर प्रदेशातील सर्वात मोठा पक्ष ठरला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला केवळ ५ जागा मिळाल्या होत्या, तर २०२४ मध्ये पक्षाने मोठी झेप घेतली. इंडिया आघाडीला राज्यात ४३.५२ टक्के मते मिळाली, तर भाजपाप्रणीत एनडीएला ४३.६९ टक्के मते मिळाल्याने दोन्ही आघाड्यांमध्ये अत्यंत अटीतटीची लढत झाली. राहुल गांधी यांनी रायबरेली तर अखिलेश यादव यांनी कन्नौज मतदारसंघातून विजय मिळवला. अयोध्येचा समावेश असलेल्या फैजाबाद मतदारसंघात समाजवादी पक्षाने विजय मिळवत इतिहास रचला. या विजयाची संपूर्ण देशाने दखल घेतली.

२०२४ मध्ये सपा-काँग्रेसची रणनीती काय होती?

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांनी एकत्रितपणे आखलेली रणनीती उत्तर प्रदेशात यशस्वी ठरली. दोन्ही पक्षांनी आपापल्या संघटनात्मक ताकदीचा प्रभावी वापर केला आणि समन्वयाने प्रचार केला. ‘यूपी के दो लड़के’ अशी प्रतिमा उभी करत त्यांनी भाजपाचा सामना केला.

जागावाटपाची घडी बसवली
जागावाटपातही दोन्ही पक्षांनी तडजोडीची भूमिका घेतली. काँग्रेसने १७ जागांवर समाधान मानले, तर समाजवादी पक्षाने उर्वरित प्रमुख जागांवर लक्ष केंद्रित केले, त्यामुळे विरोधी मतांचे विभाजन टळले आणि युतीला त्याचा मोठा फायदा झाला.

कार्यकर्त्यांमध्ये योग्य समन्वय
स्थानिक पातळीवर असलेले पूर्वीचे मतभेद दूर करण्याचा दोन्ही पक्षांच्या नेतृत्वाने प्रयत्न केला. संयुक्त प्रचार मोहिमांमध्ये कार्यकर्त्यांनी विशेष योगदान दिले. युतीच्या उमेदवारांसाठी प्रभावीपणे काम केले.

संयुक्त प्रचारावर भर
अमरोहा, कन्नौजसह अनेक ठिकाणी राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांनी संयुक्त सभा घेतल्या. बेरोजगारी, पेपरफुटी, महागाई यांसारख्या स्थानिक मुद्द्यांना प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवून मतदारांना आकर्षित केले.

सामाजिक समीकरण जुळवले
अखिलेश यादव यांनी मागासवर्गीय, दलित आणि अल्पसंख्याक (PDA) मतदारांवर लक्ष केंद्रित केले, तर राहुल गांधी यांनी संविधानाच्या संरक्षणाचा मुद्दा पुढे करत जोरदार प्रचार केला. राजकीय विश्लेषकांच्या मते, या रणनीतीमुळे दलित मतदारांचा मोठा वर्ग या आघाडीकडे वळला.

२०२७ च्या निवडणुकीतही युती कायम राहणार?

अखिलेश यादव यांनी सपा-काँग्रेसची युती २०२७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतही कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला आहे. ‘जागांपेक्षा विजय महत्त्वाचा’ असल्याचे यादव म्हणतात, त्यामुळे युतीमध्ये वाटाघाटींपेक्षा निवडणुकीतील सामाजिक आणि राजकीय गणितांना महत्त्व दिले जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील यशामागे दोन्ही पक्षांमधील मतांचे योग्य नियोजन हेच प्रमुख कारण आहे, याची जाणीव दोन्ही पक्षांच्या नेतृत्वाला आहे; त्यामुळे युतीत फूट पडली तर भाजपाविरोधी मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा सत्ताधारी पक्षालाच होऊ शकतो.

न्यूज १८ मीडियाने पक्षातील सूत्रांच्या हवाल्याने नमूद केले की, राज्य पातळीवरील नेते सध्या जागावाटपावरून आक्रमक भूमिका घेत आहेत. असे असले तरी राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्यातील चर्चेनंतरच अंतिम निर्णय होणार आहे.

जागावाटपात वाद कोणता?

काँग्रेसची भूमिका : उत्तर प्रदेश काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी राजेंद्र पाल गौतम यांनी जागावाटपात समान वाटा आणि योग्य सन्मान मिळावा, असे काँग्रेसची भूमिका असल्याचे म्हटले.

समाजवादी पक्षाची भूमिका : समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी काँग्रेसने ‘मोठं मन’ दाखवावं असे म्हटले आहे. राज्यातील प्रादेशिक पक्षांना त्यांच्या बालेकिल्ल्यात प्राधान्य द्यावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

सपा नेत्यांचा दावा काय? – सपा नेत्यांच्या मते, उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसची कामगिरी सातत्याने घटत राहिली आहे. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने स्वतंत्रपणे लढत ४०३ पैकी केवळ २ जागांवर विजय मिळवला होता, त्यामुळे जागावाटपात काँग्रेसचा हा आकडा लक्षात घेतला पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे.

राजकीय डावपेच सुरू

बसपचा पर्याय पुढे?
जागावाटपाच्या चर्चेत आपली बाजू मजबूत करण्यासाठी काँग्रेसने बहुजन समाज पक्षाच्या (BSP) प्रमुख मायावती यांच्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. दलित मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी बसपशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे विश्लेषक सांगतात.

सपाची ‘आप’कडेही नजर
काँग्रेसकडून कठोर भूमिका घेतली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षानेही आम आदमी पक्षासाठीची (AAP) चाचपणी सुरू केल्याचे बोलले जात आहे. यामागे काँग्रेसवरील दबाव वाढवण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जाते.

पंचायत निवडणुकांपासूनच मतभेद
उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय यांनी २०२६ च्या पंचायत निवडणुका पक्ष स्वतंत्रपणे लढवणार असल्याची घोषणा केल्यानंतर दोन्ही पक्षांमधील मतभेद अधिक स्पष्टपणे समोर आले, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.