माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकावरून लोकसभेत सलग दुसऱ्या दिवशी मोठा गदारोळ पाहायला मिळाला. ऑगस्ट २०२० मध्ये पूर्व लडाखमध्ये चीनबरोबर झालेल्या लष्करी संघर्षाच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी सत्ताधारी बाकांवरील सदस्यांनी आणि मंत्र्यांनी संसदीय नियमांचा हवाला देत त्यांना रोखल्याने विरोधक चांगलेच आक्रमक झाले. या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज वारंवार विस्कळीत झाले. अखेरीस सभागृहात शिस्तभंग केल्याचा ठपका ठेवत लोकसभा अध्यक्षांनी विरोधकांच्या आठ खासदारांवर उर्वरित अधिवेशनासाठी निलंबनाची कारवाई केली. यादरम्यान मंगळवारी दिवसभरात संसदेत नेमके काय घडले? राहुल गांधी यांची रणनीती काय होती? त्याविषयीचा हा आढावा…
काँग्रेसची नेमकी रणनीती काय?
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला कोंडीत पकडण्यासाठी काँग्रेसने परराष्ट्र धोरण आणि मतदार याद्यांची विशेष फेरतपासणी मोहीम हे दोन प्रमुख मुद्दे निवडले होते. त्याविरोधात सत्ताधाऱ्यांनीही प्रत्युत्तर देण्याची रणनीती आखली होती. मात्र गेल्या दोन दिवसांत राहुल यांनी आपली आक्रमकता आणखीनच वाढवत थेट पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य करण्याची नवी रणनीती आखली. त्यासाठी माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकाचा त्यांनी आधार घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. सोमवारी त्यावरून संसदेत बराच गदारोळ पाहायला मिळाला होता. मंगळवारी सभागृहाचे कामकाज सुरू होताच राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान राहुल यांनी हा मुद्दा पुन्हा उकरून काढला. त्याचवेळी सत्ताधारी बाकांवरील नेत्यांनी आक्षेप घेतल्यामुळे सभागृहात शाब्दिक चकमक उडाली.
राहुल यांनी मोदींना कसे लक्ष्य केले?
काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी यांना घेरण्यासाठी राहुल गांधींनी विशेष रणनीती आखली होती. मंगळवारी संसदेतील आपल्या भाषणात त्यांना तीन मुख्य मुद्द्यांची सांगड घालायची होती. त्यातील पहिला मुद्दा हा जनरल नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकात केलेल्या दाव्यांचा होता; तर दुसरा मुद्दा- अमेरिकेतील लैंगिक गुन्हेगार जेफ्री एप्स्टीनशी संबंधित फाइल्समध्ये असलेल्या मोदींच्या कथित नावाचा होता. तिसऱ्या मुद्दा- रशियाकडून तेल खरेदी थांबवण्याच्या कथित अटीवर झालेल्या भारत-अमेरिका व्यापार करारासंदर्भातील होता. या सर्व मुद्द्यांना एकत्रित जोडून पंतप्रधान मोदी कसे हतबल होऊन तडजोडीच्या स्थितीत आले, दावा करण्याचा राहुल यांचा प्रयत्न होता. यापूर्वी राष्ट्रवादाच्या मुद्द्यावरून भाजपाला आव्हान देण्यात काँग्रेसला यश येत नव्हते. मात्र, यावेळी थेट पंतप्रधानांनाच लक्ष्य करून राहुल यांनी भाजपाला बँकफूटवर ढकलल्याचे सूत्रांनी सांगितले.
आणखी वाचा : ३१ ऑगस्टची ‘ती’ थरारक रात्र आणि चिनी रणगाड्यांची घुसखोरी; जनरल नरवणे यांच्या पुस्तकात नेमका उल्लेख काय?
केंद्र सरकारला कसे कोंडीत पकडले?
यादरम्यान जेफ्री एपस्टीनशी संबंधित फाइल्समध्ये पंतप्रधान मोदींचा उल्लेख आल्याच्या राहुल गांधी यांचा दावा भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने फेटाळून लावला. संसदेतील भाषणादरम्यान राहुल गांधी हे भारत-अमेरिका व्यापार कराराचा संबंध अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यावर अमेरिकन सरकारी वकिलांनी दाखल केलेल्या लाचलुचपत प्रकरणाशी व एपस्टीन फाइल्समधील खुलाशांशी जोडण्याचा प्रयत्न करणार होते. तडजोडीच्या स्थितीत असलेल्या पंतप्रधानांनी अमेरिकेच्या हितासाठी व्यापार करार केला आणि त्यामुळे भारतीय शेतकऱ्यांचे नुकसान झाले. रशियन तेल खरेदी थांबवण्यास सहमती देऊन भारताची धोरणात्मक स्वायत्तताही धोक्यात घातल्याचा आरोप करण्याची तयारी राहुल यांनी केली होती, असेही काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितले.
संसदेतील गदारोळानंतर राहुल काय म्हणाले?
संसदेत बोलण्यापासून रोखल्यानंतर राहुल गांधी यांनी संसद भवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप केले. मोदी घाबरले असून त्यांच्यावर मोठा दबाव असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. हजारो कोटी रुपये खर्च करून मोदींची जी प्रतिमा तयार करण्यात आली होती, तो फुगा आता फुटणार आहे. गेल्या चार महिन्यांपासून थांबलेला भारत-अमेरिका व्यापार करार अचानक सोमवारी संध्याकाळी पूर्ण झाला. या करारात काहीही बदल झालेला नाही, तरीही तो तातडीने का करण्यात आला? याचे कारण मोदींना आणि मला चांगलंच ठाऊक आहे, असे राहुल म्हणाले. पंतप्रधानांवर नेमका कसला दबाव आहे, याचे स्पष्टीकरण देताना राहुल गांधींनी दोन मुद्दे मांडले. त्यातील पहिला मुद्दा हा उद्योगपती गौतम अदानी यांच्यावरील अमेरिकेतील खटल्यासंदर्भातील होता.
राहुल यांनी कोणते दोन मुद्दे मांडले?
अमेरिकेत अदानींवर जो खटला सुरू आहे, तो केवळ मोदींच्या संपूर्ण आर्थिक संरचनेला लक्ष्य करणारा असल्याचे राहुल म्हणाले. एपस्टीनशी संबंधित फाइल्समधून अजून बरेच काही बाहेर यायचे आहे. या फाइल्स अद्याप पूर्णपणे जाहीर झालेल्या नाहीत. पूर्ण देशाने हे जाणून घ्यायला हवे की, त्या फाइल्समध्ये नेमके असे काय दडलेय ज्यामुळे मोदींवर दबाव आहे, ज्यामुळे पंतप्रधान आज दडपणाखाली आले आहेत, असा मुद्दाही राहुल यांनी उपस्थित केला. संसदेतील गोंधळावर बोलताना, जनरल नरवणे यांचा अप्रकाशित पुस्तक हा आपला मुख्य मुद्दा नसल्याचे राहुल यांनी स्पष्ट केले. देशाच्या इतिहासात प्रथमच राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेत्याला बोलू दिले गेले नाही. मोदींनी अमेरिकेबरोबरच्या व्यापार करारात देश विकला असल्याचा आरोपही राहुल यांनी केला.
हेही वाचा : मोदींनी देश विकल्याचा राहुल गांधींचा आरोप; ठाकरेंचे शिलेदार राजीनामा देण्याच्या तयारीत? वाचा ५ घडामोडी…
राहुल यांनी रणनीती का बदलली?
राहुल गांधी यांनी गेल्या काही महिन्यांत आपल्या राजकीय हल्ल्यांची दिशा वारंवार बदलल्याचे पाहायला मिळत आहे. आता त्यांनी थेट पंतप्रधानांना लक्ष्य करण्याची रणनीती आखल्याचे दिसून येत आहे. काही महिन्यांपूर्वी राहुल यांनी भाजपाप्रणीत केंद्र सरकारवर मतचोरीचा आरोप केला होता. मात्र, त्यांचा हा मुद्दा जनतेत फारसा रुजला नसल्याचे काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे. त्याआधी राहुल यांनी सामाजिक न्यायाचा अजेंडा पुढे नेत आरक्षणावरील ५० टक्क्यांची मर्यादा हटवण्याची आणि जातनिहाय जनगणना घेण्याची मागणी सातत्याने लावून धरली होती. त्यालाही फारसा प्रतिसाद न मिळाल्याने आता त्यांनी आपला मोर्चा परराष्ट्र धोरण आणि जागतिक वादांकडे वळवल्याचे सांगितले जात आहे. यादरम्यान पंतप्रधान मोदी यांना कोंडीत पकडण्याची राहुल यांची रणनीती कितपत यशस्वी होणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

