scorecardresearch

अदानी-मोदी हे एकच! राहुल गांधींचा भाजपावर शाब्दिक प्रहार

अदानी आणि मोदी एकच आहेत. देशाची सगळी संपत्ती एका व्यक्तीने लुटली आहे, असा घणाघाती शाब्दिक प्रहार काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.

Rahul Gandhi modi adani
अदानी-मोदी हे एकच! राहुल गांधींचा भाजपावर शाब्दिक प्रहार (छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स)

अदानींशी तुमचे नाते काय, एवढेच मी पंतप्रधान मोदींना लोकसभेत विचारले होते. त्यांनी खरेतर नाते नाही, असे सांगायला हवे होते. पण, मी मोदींना प्रश्न विचारताच केंद्रातील सर्व मंत्री, भाजपाचे खासदार अदानींच्या बचावासाठी उभे राहिले. मोदींचे अदानींशी नाते आहे. अदानी आणि मोदी एकच आहेत. देशाची सगळी संपत्ती एका व्यक्तीने लुटली आहे, असा घणाघाती शाब्दिक प्रहार काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी रायपूरमधील काँग्रेसच्या महाअधिवेशनातील भाषणात केला.

देशात इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. ईस्ट इंडिया कंपनीने भारतात येऊन देशाची संपत्ती लुटली, आता अदानी हेच करत आहेत. अदानी समुहावर टीका करणाऱ्यांना भाजपा देशद्रोही ठरवत आहेत. मग, अदानी सर्वात मोठे देशभक्त आहेत? भाजपा-संघ अदानींना बचाव का करत आहेत? अदानींच्या बेनामी कंपन्यांमार्फत हजारो कोटींचा पैसा भारतात आणला जातो. अदानी समूह संरक्षण क्षेत्रात काम करतो, मग मोदींना त्यांच्या बेनामी कंपन्यांची माहिती नाही? ही देशाच्या सुरक्षेशी निगडीत गंभीर बाब असताना संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी का केली जात नाही, असा प्रश्नांचा भडिमार करत राहुल गांधींनी, अदानी प्रकरणातील सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत काँग्रेस आंदोलन करेल, असा इशाराही महाअधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी दिला.

हेही वाचा – तिसरी आघाडी भाजपाच्या फायद्याची! काँग्रेसच्या ठरावात भूमिका

हा तर चीनसमोर भ्याडपणा…

केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या चीनसंदर्भातील विधानांचेही राहुल गांधींनी वाभाडे काढले. चीनची अर्थव्यवस्था भारतापेक्षा मोठी असल्याने भारताला चीनविरोधात लढता येत नाही, असे विधान जयशंकर यांनी मुलाखतीत केले होते. त्यावर, एखाद्या देशाची अर्थव्यवस्था मोठी असेल तर त्याविरोधात लढायचे नाही का? मग, इंग्रजांविरोधातही आपल्याला लढता आले नसते? मोदी सरकारमधील मंत्रीच म्हणतात, भारत चीनविरोधात लढू शकत नाही. हा तर भ्याडपणा झाला. हीच का मोदी सरकारच्या मंत्र्यांची देशभक्ती? ताकदवानासमोर मान तुकवायची आणि कमकुवत असलेल्यांशी लढायचे, ही तर सावरकरांची विचारसरणी झाली! महात्मा गांधींनी ‘सत्याग्रहा’चा मार्ग दाखवला होता, भाजपा-संघ तर ‘सत्ताग्रही’ आहेत, ते सत्तेसाठी काहीही करू शकतील, चीनशी हातमिळवणी करू शकतील, त्यांच्यापुढे वाकतील, अशी तीव्र टीका राहुल गांधींनी केली.

काश्मिरी तरुणांमध्ये राष्ट्रवादी भावना

‘भारत जोडो’ यात्रेने काश्मीर खोऱ्यातील तरुणांच्या मनात राष्ट्रवाद जागृत केला, असा दावाही राहुल गांधींनी केला. काश्मीर खोऱ्यात अगदी अनंतनाग, पुलवामा अशा दहशतवादग्रस्त इलाख्यातदेखील हजारो काश्मिरी तरुण हातात तिरंगा घेऊन यात्रेत सहभागी झाले होते. काश्मिरी तरुणांनी स्वतःहून तिरंगा हाती घेतलेले अद्भुत वातावरण मी कधीही पाहिले नव्हते, असे केंद्रीय राखीव पोलीस दलातील जवान सांगत होते, असे राहुल गांधी म्हणाले. संसदेमध्ये मोदी म्हणाले की, त्यांनीही श्रीनगरमध्ये लालचौकात तिरंगा फडकावला होता. पण, त्यांनी १५-२० लोकांसोबत तिरंगा फडकावला होता, पण, यात्रेतील काश्मिरी तरुणांनी तिरंगा फडकावला. तिरंग्यामुळे येणारी राष्ट्रवादाची भावना काँग्रेसमुळे या तरुणांमध्ये निर्माण झाली, असे राहुल गांधी म्हणाले.

हेही वाचा – तिसरी आघाडी अटळ; काँग्रेसला साथ देण्यास अनेक पक्षांचा विरोध

अहंकार निघून गेला!

‘भारत जोडो’ यात्रेने माझ्यातील अहंकार काढून टाकला. यात्रेच्या सुरुवातीच्या काळात मी लोकांनाच ज्ञान देण्याचा प्रयत्न करत होतो पण, मी लोकांचे ऐकू लागलो, त्यांच्या भावना-दुःख समजू लागलो. मी आतून शांत होत गेलो. जम्मू-काश्मीरला पोहोचेपर्यंत मी ध्यान लागल्यासारखा गप्प झालो. यात्रेमध्ये मला हजारो लोक भेटले. यात्रा हेच माझे घर झाले. तिथल्या महिलांच्या, तरुणांच्या वेदना मी तुम्हाला ऐकवू शकतो पण, त्यांच्या भावना समजावून सांगू शकत नाही. तिथे लोकांशी माझे नाते बदलून गेले, अशा भावनिक शब्दांत राहुल गांधींनी पदयात्रेचा अनुभव सांगितला. भारत हा पुजाऱ्यांचा नव्हे तपस्वींचा देश आहे. ‘भारत जोडो’ यात्रा ही तपस्या होती, या तपस्येतून काँग्रेसलाच नव्हे देशालाही उर्जा मिळाली. ही तपस्या बंद होऊन चालणार नाही. भाजपा-संघाविरोधात लढायचे असेल तर सगळ्यांनी घाम गाळून तपस्येत सहभागी झाले पाहिजे. अख्खा भारत आपल्यासोबत येईल, असा आशावाद राहुल गांधींनी व्यक्त केला.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-02-2023 at 15:24 IST
ताज्या बातम्या