सांगली : राजकोट येथील छत्रपती शिवाजीमहाराज यांचा पुतळा बनविण्याच्या कामाचे कंत्राट संघाच्या व्यक्तीला दिले होते. या पुतळा उभारणीत भ्रष्टाचार झाला किंवा त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्यानेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली असावी अशा शब्दांत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कडेगावमध्ये झालेल्या जाहीर सभेत मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. या चुकीबद्दल माफी मागणाऱ्या मोदींनी आता लादलेली नोटाबंदी, जीएसटी प्रणाली (वस्तू आणि सेवा कर) आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनांनतर मागे घेतलेल्या कृषी कायद्यांबद्दलही देशवासीयांची माफी मागावी, अशी मागणीही या वेळी गांधी यांनी केली.
वांगी येथे डॉ. पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आणि लोकतीर्थ स्मृतिस्थळाचे लोकार्पण आज खा. गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर कडेगाव येथे झालेल्या जाहीर सभेत त्यांनी पंतप्रधानांवर टीकास्त्र सोडले.
हेही वाचा >>>सांगलीच्या मेळाव्याकडे उद्धव ठाकरे यांची पाठ, शिवसेना जाणीवपूर्वक दूर
महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीची माफी मागा
राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला, याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली. माफी ही चूक केली असेल, तरच मागितली जाते. मोदींनी माफी मागितली यामागे तीन कारणे असावीत. यापैकी एक म्हणजे संघाच्या कार्यकर्त्याला कंत्राट दिले म्हणून, दुसरे कारण पुतळा बनविताना भ्रष्टाचार झाला म्हणून आणि तिसरे म्हणजे पुतळा उभारणीकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले म्हणून. ही चूक असेल तर मोदींनी महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीची माफी मागायला हवी. संसदेत अदानी, अंबानी यांचे नाव घेता येणार नाही असे सांगितल्यावर मी त्यांन ए-वन आणि ए-टू अशा नावाने संबोधतो असे सांगून गांधी म्हणाले, की देशाच्या सत्तेचा लाभ मूठभर लोकांनाच होतो आहे असा आरोप राहुल यांनी केला.
या वेळी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पतंगराव कदम यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत या भागातील अनेक क्रांतिकारकांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष केला असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संयोजक आ. डॉ. विश्वजित कदम यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमास काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आदींसह काँग्रेसचे खासदार, आमदार उपस्थित होते.
हेही वाचा >>>TMC : कोलकाता बलात्कार प्रकरणावरून ममता बॅनर्जी गटाचे खासदार अभिषेक बॅनर्जींशी मतभेद? पक्षात दोन गटांची वेगळी मतं!
शिवसेना ठाकरे गटाची पाठ
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापासून ते अगदी सांगली स्थानिक पातळीवरील नेत्यांची या मेळाव्यातील अनुपस्थिती ही आज कार्यक्रमस्थळी चर्चेचा विषय झाली होती. लोकसभा निवडणुकीवेळी आ. डॉ. विश्वजित कदम यांनी अपक्ष विशाल पाटील यांची केलेली पाठराखण आणि उबाठा शिवसेनेचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांचा मानहानिकारक झालेला पराभव हे या मागील प्रमुख कारण असल्याचे मानले जात आहे.
महाराष्ट्राच्या विकासात पतंगराव कदम यांचे मोलाचे योगदान : राहुल गांधी
डॉ. पतंगराव कदम यांनी शिक्षणासह विविध क्षेत्रांत उत्तम काम करून महाराष्ट्राच्या विकासासाठी आपले आयुष्य खर्ची घातले आहे. काँग्रेसच्या विचारधारेबरोबर राहून त्यांनी पक्षाला ताकद दिली, असे गौरवोद्गार लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी काढले. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारधारेने महाराष्ट्राची वाटचाल झाली आहे. याच विचारधारेतून डॉ. पतंगराव कदम यांनी महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर नेले. इंदिरा गांधी ज्या वेळी निवडणूक हरल्या होत्या त्या वेळी पतंगराव कदम त्यांच्या बरोबर होते, अशी आठवणही राहुल यांनी सांगितली. शरद पवार म्हणाले, डॉ. पतंगराव कदम यांनी समाजातील प्रत्येक घटकातील मुला-मुलींना शिक्षण मिळावे यासाठी दूरदृष्टी ठेवून शिक्षण संस्था सुरू केल्या. गोरगरिबांना शिक्षणाची द्वारे खुली झाल्याने आणि उच्च दर्जाचे शिक्षण मिळाल्याने अनेकांचे आयुष्य बदलल्याचे नमूद केले. प्रास्ताविकात विश्वजीत कदम यांनी कार्यक्रमाविषयी माहिती दिली.