scorecardresearch

राहुल गांधींच्या अपात्रतेनंतर संपूर्ण देशात काँग्रेस आक्रमक, वायनाडमध्ये मात्र कार्यकर्त्यांत मरगळ

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. याच कारणामुळे देशभरातील काँग्रेस नेते, कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे.

congress wayanad protest
वायनाडमध्ये काँग्रेसने अशा प्रकारे आंदोलन केले. (Express photo by Shaju Philip)

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. याच कारणामुळे देशभरातील काँग्रेस नेते, कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे. काँग्रसने देशात ठिकठिकाणी सत्याग्रहाच्या माध्यमातून मोदी सरकारविरोधात निदर्शनं केली. राहुल गांधी यांच्या वायनाड या लोकसभा मतदारसंघातील कालपेट्टा येथेही रविवारी अशाच सत्याग्रह करण्यात आला. मात्र या सत्याग्रहाला फारसा प्रतिसाद लाभला नाही.

हेही वाचा >>> उत्तर प्रदेशमध्ये सारस क्रौंच पक्ष्यावरून राजकारण; मुस्लिमांची सहानुभूती मिळवण्याचा प्रकार असल्याची भाजपाची सपावर टीका

वायनाडमध्ये गर्दी जमवण्यात काँग्रेसला अपयश

वायनाड येथील काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयाजवळही निदर्शनं करण्यात आली. कार्यालयाजवळच बसस्थानक आहे. या बसस्थानकावर अनेक लोक येत होते, जात होते. मात्र काँग्रेसच्या निदर्शनादरम्यान सुरू असलेली भाषणं ऐकण्यासाठी कोणीही थांबत नव्हते. लोक थेट निघून जात होते. या सत्याग्रहाची संध्याकाळी ४ वाजता सांगता झाली. मात्र यावेळीही लोकांची संख्या कमीच होती. राहुल गांधी यांच्या अपात्रतेनंतर काँग्रेसने देशभरात आक्रमक पवित्रा धारण केला. काँग्रेसने संपूर्ण देशात वातावरणनिर्मिती केली. मात्र तेवढीच वातावरणनिर्मिती वायनाडमध्ये झालेली दिसत नाही. काँग्रेसने येथे काही निदर्शनांचे आयोजन केले. मात्र या आंदोलनासाठी लोकांची गर्दी जमवण्यात काँग्रेसला यश आलेले नाही. राहुल गांधी यांच्यावर अपात्रतेची कारवाई झाल्यानंतर केरळमधील काँग्रेसच्या एकाही महत्त्वाच्या नेत्याने वायनाडला भेट दिलेली नाही. परिणामी काँग्रेसला या आंदोलनांमध्ये म्हणावे तेवढे यश मिळालेले नाही.

हेही वाचा >>> राहुल गांधींच्या वीर सावरकरांवरील विधानामुळे महाविकास आघाडीमध्ये धुसफूस, शरद पवारांची मध्यस्थी

आमचा अहिसंक आंदोलनावर विश्वास- काँग्रेस

याविषयी वायनाड काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डी एन अप्पाचन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आमचा अहिंसक आंदोलनावर विश्वास आहे. मागील तीन दिवसांपासून आम्ही कालपेट्टा येथे आंदोलन करत आहोत. गांधीमार्गाने केल्या जाणाऱ्या आंदोलनावर आमचा विश्वास आहे. राहुल गांधी यांच्याविरोधात घेण्यात आलेल्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी आमच्याकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आम्ही वायनाडमध्ये हिंसक आंदोलन करू, अशी अपेक्षा ठेवू नये,” असे अप्पाचन म्हणाले.

हेही वाचा >>> सांगली बँकेच्या चौकशीची घोषणा ही जयंत पाटील यांना अडचणीत आणण्याची खेळी ?

काँग्रेसच्या आंदोलनात फूट

कालपेट्टा येथे काँग्रेसच्या आंदोलनादरम्यान तेथील स्थानिक नेत्यांमध्ये वाद झाला. त्यामुळे आंदोलनाची धार कमी झाली. या उघड भांडणामुळे वायनाड काँग्रेसमध्ये एका प्रकारे फूट पडली आहे. परिणामी काही नेते आणि कार्यकर्ते काँग्रेसने आयोजित केलेल्या सत्यागृहापासून दूर राहिले. रविवारच्या या आंदोलनासाठी काँग्रेसला वायनाडाबाहेरील कार्यकर्त्यांना आणावे लागले.

हेही वाचा >>> बंजारा समाजाचे नेते हरिभाऊ राठोड यांच्या पक्षांतराची परंपरा सुरूच

राहुल गांधी ओबीसीविरोधी दाखवण्याचा भाजपाचा प्रयत्न

दरम्यान, राहुल गांधी यांच्या अपात्रतेच्या निर्णयानंतर वायनाड या लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यासाठी भाजपाने तयारी सुरू केली आहे. राहुल गांधी यांनी मोदी आडनावावर केलेल्या विधानाचा आधार घेत, राहुल गांधी हे ओबीसीविरोधी आहेत; अशी प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जाणार आहे. “वायनाड मतदारसंघात मागास वर्गाचे प्रमाण बरेच आहे. या वर्गाने बीडीजेएस पक्षाला पाठिंबा दिलेला आहे. राहुल गांधी यांच्याविरोधात आम्ही जो प्रचार करत आहोत, त्याचा आम्हाला फायदा होईल, अशी अपेक्षा आहे. राहुल गांधी यांच्याविरोधात सुरत न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आधार घेत, आम्ही येथे प्रचार करणार आहोत,” असे भाजपाच्या नेत्याने सांगितले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 18:32 IST

संबंधित बातम्या