काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांची अनेक वक्तव्ये आजवर वादग्रस्त ठरलेली आहेत. त्यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस पक्ष अनेकदा अडचणीत आलेला आहे. मात्र यावेळी दिग्विजय सिंह यांच्या वक्तव्यावर चहुबाजूंनी टीका होत असतानाच काँग्रेस पक्षातूनही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. दिग्विजय सिंह यांनी मोदी सरकारने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर संशय व्यक्त केला होता. उरीमधील हल्ल्यानंतर मोदी सरकारने बालाकोट येथे सर्जिकल स्ट्राईक केला होता. दिग्विजय सिंह यांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील टीका केली असून त्यांचे वक्तव्य ‘हास्यास्पद’ असल्याचे ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जम्मू येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, “संवाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. पण काही लोक संवाद साधत असताना हास्यास्पद दावे करतात. आमच्या एका ज्येष्ठ नेत्याने केलेल्या वक्तव्याबाबत मला खेद वाटतो.” भारत जोडो यात्रेचे काहीच दिवस शिल्लक असून ही यात्रा जम्मू आणि कश्मीरसारख्या संवेदनशील राज्यात मार्गक्रमण करत आहे. अशावेळी दिग्विजय सिंह यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा वापर करुन भाजपा काँग्रेसवर निशाणा साधू शकते.

दिग्विजय सिंह हे भारत जोडो यात्रेत प्रमुख भूमिका निभावताना आतापर्यंत दिसले. सप्टेंबर २०२२ मध्ये जेव्हा यात्रा तामिळनाडू मधून सुरु झाली तेव्हापासून दिग्विजय सिंह यात्रेत आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी देखील एकत्र चालताना दिसल्या. मात्र यावेळी प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात दिग्विजय सिंह यांनी केलेले वक्तव्य त्यांच्या आणि पक्षाच्या अंगाशी आले आहे.

दिग्विजय सिंह यांचा राजकीय इतिहास

माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राजीव गांधी यांनी १९८५ मध्ये दिग्विजय सिंह यांना मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रमुख बनवले. त्यावेळी राज्यात अर्जुन सिंह, माधवराव सिंधिया, श्माचा चरण शुक्ला आणि विद्या चरण शुक्ला हे दोन भाऊ असतानाही नवख्या दिग्विजय सिंह यांना संधी देण्यात आली. दिग्विजय हे गुनामधील राघोगढच्य राजघराण्यातले आहेत. त्यांनी दोन वेळा आमदारकी आणि एकदा खासदारकी भूषविली आहे. अर्जुन सिंह यांच्या मंत्रिमंडळात देखील त्यांनी काम केलेले आहे. राजीव गांधी यांनी निवड केल्यानंतर १९८८ पर्यंत दिग्विजय सिंह मध्य प्रदेशचे प्रमुख होते. पुढे तत्कालीन अध्यक्ष पी. व्ही. नरसिंहराव यांनी त्यांची पुन्हा प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली.

मध्य प्रदेशचे तब्बल दहा वर्ष त्यांनी मुख्यमंत्रीपद भूषविले. त्यांची ही कारकिर्द अनेकदा वादांनी व्यापलेली होती. १९९५ मध्ये अर्जुन सिंह यांनी एन. डी. तिवारी यांच्यासोबत काँग्रेसला राम राम ठोकून तिवारी काँग्रेस नावाचा नवा पक्ष स्थापन केला. अर्जुन सिंह बाहेर पडल्यानंतर शुक्ला, सिंधिया आणि मोतीलाल व्होरा यांनी दिग्विजय सिंह यांना एकटं पाडण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. दिग्विजय सर्वा विरोधकांना पुरुन उरले. नरसिंहराव यांच्यानंतर पुढे जेव्हा सोनिया गांधी राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या, तेव्हा ते त्यांच्याही विश्वासू सहकाऱ्यांमध्ये गणले जाऊ लागले.

१९९८ च्या सार्वत्रिक निवडणुकीत मध्य प्रदेशात काँग्रेसची निराशाजनक कामगिरी झाली. ४० पैकी फक्त १० जागा त्यांना जिंकता आल्या. पुढच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाला आणि दिग्विजय सिंह पुन्हा मुख्यमंत्री बनले. २००३ पर्यंत ते या पदावर होते. त्यानंतर सलग १५ वर्ष मध्य प्रदेशात भाजपाचे सरकार आहे. २०१८ मध्ये काँग्रेसने सरकार स्थापन केले तरी ते काही फार काळ टीकू शकले नाही.

इतर वादग्रस्त वक्तव्ये

याआधी २००८ मध्ये बाटला हाऊस एनकाऊंटर बनावट असल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते. तसेच मुंबईवर झालेला २६/११ च्या हल्लाआधी एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे माझ्याशी बोलले होते, असा दावा त्यांनी केला होता. करकरे यांना हिंदू कट्टरवाद्यांकडून धमक्या येत असल्याचे दिग्विजय सिंह यांनी सांगितले. २०१० साली त्यांनी केंद्रीय मंत्री पी. चिंदबरम यांच्या नक्षलवादी धोरणावर टीका केली होती.

भारत जोडो यात्रेच्या सल्लागार मार्गदर्शक म्हणून निवड होईपर्यंत दिग्विजय सिंह यांनी मधल्या काळात अनेक राज्यांचे प्रभारी पद भूषविले होते. मात्र त्या त्या राज्यातील निराशाजनक कामगिरीमुळे त्यांना पदावरुन बाजूला सारले गेले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi distanced himself from the statement of congress leader digvijay singh kvg
First published on: 25-01-2023 at 18:34 IST