Rahul Gandhi slams Kanhaiya Kumar over DUSU Defeat : दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या (DUSU) निवडणुकीत काँग्रेसची विद्यार्थी संघटना असलेल्या एनएसयूआयचा दारुण पराभव झाला आहे. २०१५ नंतर प्रथमच एनयूआयएवर ही नामुष्की ओढवली आहे. त्यातच एनएसयूआयने तिकीट नाकारलेले दीपांशु शौकीन यांनी निवडणुकीत अपक्ष म्हणून उभे राहत उपाध्यक्षपद जिंकले आहे; तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (ABVP) अध्यक्ष, सचिव आणि संयुक्त सचिव ही तीन पदे जिंकली. या निकालानंतर एनएसयूआयची उमेदवार निवड आणि निवडणूक रणनीतीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर सोमवारी, २८ सप्टेंबर रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एनएसयूआयचे प्रभारी कन्हैया कुमार आणि अध्यक्ष विनोद जाखड यांना बैठकीसाठी बोलावणे धाडले.

यावेळी राहुल गांधी यांनी ‘डूसू’ निवडणुकीत झालेल्या पराभवाची कारणे काय होती, उमेदवारांची निवड कशी झाली आणि संघटनेच्या पातळीवर नेमके कुठे चुकले, याबाबत त्यांनी दोन्ही नेत्यांकडून स्पष्टीकरण मागितले, असे वृत्त दी इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे.

गेल्या आठवड्यात दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या निकालानंतर तिकीटवाटपाचा मुद्दा विशेष चर्चेत आला होता. एनएसयूआयकडून तिकीट न मिळाल्याने शौकीन यांनी अपक्ष म्हणून उपाध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली आणि ते निवडूनही आले. त्यामुळे संघटनेच्या अधिकृत उमेदवारांच्या निवडीसह अंतर्गत समन्वयावर देखील चर्चा सुरू झाली आहे.

राहुल गांधींच्या ‘जेन झी कनेक्ट’समोर आव्हान?

एकीकडे राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ या विद्यार्थी संवाद उपक्रमाला विविध शहरांमध्ये मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामधून राहुल गांधी विशेषत: देशातील जेन झी तरुणांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. दुसरीकडे डूसू निवडणुकीतील प्रतिकूल निकालामुळे काँग्रेसला धक्का बसला आहे. याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी कन्हैया कुमार आणि विनोद जाखड यांना बैठकीसाठी बोलावले. याचदरम्यान, विरोधक मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षणावर (SIR) निवडणूक आयोगाला घेरण्याच्या तयारीत आहेत. आयोगात एसआयआरच्या प्रक्रियेशी मतभेद निर्माण झाल्याने आयोगासोबतच सत्ताधारी पक्ष पक्षदेखील विरोधकांच्या निशाण्यावर आहेत.

तत्पूर्वी, नीट परीक्षेतील पेपरफुटीविरोधातील सीजेपीने जंतरमंतरवर जोरदार आंदोलन केले होते. परीक्षा प्रक्रियेतील गैरप्रकार, शिक्षण व्यवस्थेवरून तरुणांमधील असंतोष आंदोलनाच्या माध्यमातून समोर आला. याच मुद्द्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही सत्ताधाऱ्यांना घेरले होते. मात्र, डुसूमधील पराभवामुळे वेगळेच चित्र निर्माण झाले आहे.

शौकीन यांना तिकीट का नाकारले -राहुल गांधींचा सवाल

दी इंडियन एक्स्प्रेसने सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले की, काँग्रेस जेन झी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असताना डूसूच्या निवडणुकीत झालेला एनएसयूआयचा पराभव राहुल गांधींना खटकला आहे. कन्हैया कुमार आणि विनोद जाखड यांनी डूसू निवडणुकीतील कामगिरीबाबतचा अहवाल सादर केला आहे. गांधी यांनी दोन्ही नेत्यांना पराभवाच्या कारणांवर विशिष्ट प्रश्न विचारले. एनएसयूआय सोडून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्या दीपांशु शौकीन यांना तिकीट का दिले गेले नाही, असा सवाल राहुल गांधी यांनी केला.
सूत्रांच्या माहितीनुसार, कन्हैया कुमार आणि विनोद जाखड यांनी राहुल गांधींना असे स्पष्टीकरण दिले की, शौकीन यांनी ठेवलेल्या अटी अवास्तव होत्या. मात्र, शौकीन यांचे प्रकरण ज्या पद्धतीने हाताळले गेले, त्यावर राहुल गांधी समाधानी नव्हते, असेही सूत्रांनी सांगितले आहे.

एनएसयूआयला डूसूच्या चार सदस्यीय केंद्रीय पॅनेलमधील एकही पद जिंकता आले नाही. दुसरीकडे आरएसएससोबत जोडलेली विद्यार्थी संघटना एबीव्हीपीने मात्र अध्यक्ष, सचिव आणि संयुक्त सचिव अशा तीनही पदांवर बाजी मारली; तर दीपांशु शौकीन यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवीत सर्वाधिक मते मिळवली आणि उपाध्यक्षपद जिंकले

शौकीन यांचा एनएसयूआयसोबतचा प्रवास

शौकीन २०२३ पासून विद्यार्थी राजकारणात सक्रिय आहेत. दिपांशु यांनी शहीद भगत सिंग विद्यालयातून बीएचे शिक्षण घेतले आणि आता ते कला क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. याचदरम्यान त्यांनी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून काम पाहिले आहे. तर २०२३ आणि २०२४ च्या निवडणुकांमध्ये त्यांनी एनएसयूआयसाठी प्रचार केला होता. २०२५ मध्ये त्यांनी संघटनेकडून तिकीट मागितले होते. मात्र, त्यांची निवड झाली नाही. यंदाही तिकीट न मिळाल्याने शौकीन यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यांनी उपाध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली आणि विजय मिळवला.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अमिताभ दुबे यांनी NSUIने दीपांशु शौकीन यांना तिकीट नाकारल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. दुबे यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले की, एनएसयूआयने शौकीन यांना अध्यक्षपदाचे तिकीट दिले होते; मात्र त्यांनी ते नाकारले. त्यानंतर त्यांनी उपाध्यक्षपदासाठी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. “त्यांना अध्यक्षपद नको होते, असे का?” असा सवालही दुबे यांनी केला.

राहुल गांधी यांनी कन्हैया कुमार आणि विनोद जाखड यांच्याकडून याच प्रकरणाबाबत स्पष्टीकरण मागितल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. आता एनएसयूआयच्या पराभवातून काँग्रेस संघटना कोणता धडा घेणार आणि आगामी काळात विद्यार्थी व तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी कोणते बदल केले जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.