Rahul Gandhi Letter to Hemant Soren Regarding Student Protest : झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनाचा दबाव वाढत असताना काँग्रेसने राज्यातील सत्ताधारी आघाडीतील आपला मित्रपक्ष असलेल्या झारखंड मुक्ती मोर्चाला स्पष्ट संदेश दिला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना पत्र लिहून आंदोलक विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेण्याचे आणि त्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आवाहन केले. नीट पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीतील जंतर-मंतरवर मोठे आंदोलन झाल्यानंतर अवघ्या महिनाभरात झारखंडमध्येही विद्यार्थ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. राज्य लोकसेवा आयोग (JPSC) आणि कर्मचारी निवड आयोगाच्या (JSSC) भरती प्रक्रियेत कथित अनियमितता झाल्याच्या आरोपांवरून विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.

सरकारविरोधातील वाढता रोष पाहता राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना लिहिलेल्या पत्रातून आंदोलक विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि मागण्या समजून घेऊन त्यावर योग्य तो तोडगा काढण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, असा संदेश काँग्रेसकडून देण्यात आला आहे. झारखंडमध्ये सध्या काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षाचे सरकार आहे. या आंदोलनामुळे काँग्रेस पक्षाची मोठी राजकीय कोंडी झाली आहे. दिल्लीत झालेल्या देशव्यापी विद्यार्थी आंदोलनात काँग्रेसने स्वतः आघाडीवर राहून सक्रिय सहभाग नोंदवला होता; पण आता झारखंडमध्ये काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या आंदोलन हाताळण्याच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री सोरेन यांना थेट पत्र लिहिले आहे.

पत्रात राहुल गांधी यांच्या पत्रात नेमके काय?

“भारतीय संविधानाने दिलेला शांततापूर्ण आंदोलनाचा अधिकार हा आपल्या लोकशाहीच्या प्रमुख आधारस्तंभांपैकी एक आहे, असा काँग्रेस पक्षाचा विश्वास आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून प्रश्नपत्रिका फुटणे आणि शिक्षण व्यवस्थेतील अनियमिततेविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना आम्ही पूर्ण पाठिंबा दिला आहे,” असे राहुल गांधी यांनी पत्रात नमूद केले आहे. यावेळी त्यांनी देशातील शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींवरही बोट ठेवले आहे. “भारतातील शिक्षण व्यवस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात गेली असून, विद्यार्थ्यांचे शोषण आणि दडपशाही करण्याचे साधन म्हणून तिचे रूपांतर करण्यात आले आहे. दशकभरापूर्वी असलेली मजबूत ज्ञानव्यवस्था आता राहिलेली नाही,” असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनाचा उल्लेख करताना राहुल म्हणाले की, तुम्हाला माहिती आहेच की, झारखंडमधील विद्यार्थीही राज्यातील भरती परीक्षांमधील अनियमिततेविरोधात आंदोलन करत आहेत. त्यांचे आंदोलन शांततापूर्ण असून त्यांच्या मागण्या योग्य आहे. झारखंड सरकारने विद्यार्थ्यांशी संवाद सुरू केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. आपण गठीत केलेल्या समितीच्या माध्यमातून झारखंड सरकारने विद्यार्थ्यांशी चर्चा सुरू केली आहे, ही नक्कीच स्वागतार्ह बाब आहे. विद्यार्थ्यांनी मांडलेल्या अनेक मागण्यांवर सरकार आणि आंदोलकांमध्ये सहमती झाल्याचेही समजते आहे. मात्र, असे असतानाही अद्याप आंदोलन सुरूच असून, काही विद्यार्थी अजूनही बेमुदत उपोषणावर बसलेले असल्याचे राहुल गांधी यांनी पत्रात नमूद केले आहे. विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना आंदोलक विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींशी प्रत्यक्ष भेटून चर्चा करण्याचे आवाहन केले आहे.

“आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींशी आपण स्वतः भेटून चर्चा करावी, अशी माझी नम्र सूचना आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या उर्वरित समस्या सोडविण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा संदेश अधिक ठोसपणे जाईल. तरुण आणि विद्यार्थी हेच देशाचे भविष्य आहे. या संकटाच्या काळात त्यांच्यासोबत उभे राहणे आणि त्यांना पाठिंबा देणे ही आपली जबाबदारी आहे. कृपया विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत आणि या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी योग्य ती कारवाई करावी,” असेही राहुल यांनी पत्रात नमूद केले आहे. दरम्यान, झारखंडमधील या आंदोलनामुळे काँग्रेससमोर दुहेरी राजकीय आव्हान निर्माण झाले आहे. एकीकडे काँग्रेस देशभरातील विद्यार्थी आंदोलनांना पाठिंबा देत असताना, दुसरीकडे- त्यांच्या मित्रपक्षाचे सरकार असलेल्या राज्यात विद्यार्थ्यांचा रोष उफाळून आला आहे. हीच बाब लक्षात घेता, राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना पत्र लिहून विद्यार्थांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे.

विद्यार्थ्यांवरील लाठीमारप्रकरणी भाजपा आक्रमक

स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी प्रकरणी झारखंड विधानसभेवर मोर्चा काढणाऱ्या विद्यार्थी आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला होता. याप्रकरणी भाजपाने आक्रमक पवित्रा घेत काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षावर टीकेची झोड उठवली. विधानसभेत या मुद्द्यावरून गदारोळ झाल्यामुळे नियोजित वेळेच्या एक दिवस आधीच पावसाळी अधिवेशन तहकूब करण्यात आले. दिल्लीतील २० जुलैच्या मोर्चावरील पोलिसांच्या कठोर कारवाईमुळे दिल्लीमध्ये काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्ष सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचे प्रत्युत्तर भाजपाने झारखंडमध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे. यादरम्यान, गेल्या आठवड्यात विधानसभेवर मोर्चा काढणाऱ्या अखिल भारतील विद्यार्थी परिषदेच्या जवळपास ११० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यातील अनेक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. भरती परीक्षांमधील अनियमिततांच्या आरोपांची सीआयडी चौकशी सुरू आहे. तसेच सरकारने प्रस्ताव दिलेले सर्व सुधारणा उपाय निदर्शक विद्यार्थ्यांनी स्वीकारले असल्याची माहिती झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी माध्यमांना दिली आहे.