लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसची नुकतीच एक बैठक पार पडली. बैठकीत राहुल गांधी यांनी त्यांच्या बाजूला बसलेल्या एका नेत्याचे मनगट अचानक धरल्याने सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले. त्यानंतर राहुल गांधी यांनी मार्शल आर्ट्सचे राजकारणातील महत्व काँग्रेस नेत्यांना सांगितले. मार्शल आर्ट्सचा वापर राजकारणात आणि जीवनात कसा करायचा याचे धडे राहुल गांधी यांनी काँग्रेस नेत्यांना दिले. सत्ताधारी भाजपाच्या रणनीतीला बळी पडू नका, तुमच्यावर सोपवलेल्या कामाकडे लक्ष केंद्रीत करा, असा सल्ला राहुल यांनी यानिमित्ताने काँग्रेस नेत्यांना दिला. तब्बल पाच तास याबाबत राहुल गांधी यांनी काँग्रेस नेत्यांना मार्गदर्शन केले. काँग्रेसच्या बैठकीत नेमके काय घडले ते जाणून घेऊयात.

बैठकीत काँग्रेस नेत्यांना ‘जिउ जित्सु’चे धडे

काँग्रेसच्या अंतर्गत बैठकीत राहुल गांधी हे मार्शल आर्ट्ससाठीचे वस्त्र परिधान करून आले होते. तसेच त्यांनी त्यांच्याबरोबर ‘जिउ जित्सु’ या जपानी मार्शल आर्ट (युद्धकला) प्रकारातील प्रशिक्षकालाही बैठकीसाठी नेले होते. ‘जिउ जित्सु’ ही एक युद्धकला असून ती प्रामुख्याने आत्मसंरक्षणासाठी वापरली जाते. यात प्रतिस्पर्ध्याला जमिनीवर पाडून नियंत्रणात आणण्यावर भर दिला जातो. काँग्रेसच्या तरूण नेत्यांना ‘जिउ जित्सु’चे प्रशिक्षण देण्यावर राहुल गांधी यांनी बैठकीत भर दिला. तब्बल पाच तास काँग्रेस नेत्यांना या मार्शल आर्ट्स प्रकाराबाबत माहिती तसेच प्रात्यक्षिक देण्यात आले. “चर्चासत्रातील काही भाग हा तत्वज्ञानाशी संबंधित होता. तसेच आपण कुठे लक्ष केंद्रीत करायला हवे व आपल्याला कसे लक्ष्य केले जाऊ शकते, आपण आयुष्याबद्दल कसा विचार करायला हवा याबाबत माहिती देण्यात आली”, असे बैठकीत उपस्थित एका काँग्रेस नेत्याने सांगितले.

राहुल गांधी यांनी मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण देण्याचे कारण काय?

राजकारणात शाब्दिक बुक्के मारले जातात. त्यांपासून राजकारण्यांना स्वत:चा बचाव करावा लागतो. राजकीय नेत्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी आरोप-प्रत्यारोप केले जातात. राहुल गांधी यांच्या पक्षावर भाजपाकडून सातत्याने हल्लाबोल केला जातो. काँग्रेसला लक्ष्य केले जाते. तसेच मागील काही वर्षात काँग्रेसला भाजपामुळे अनेकदा पराभवाचा सामना देखील करावा लागला आहे. या सगळ्याचा सामना करणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना राहुल गांधी यांनी मार्शल आर्ट्सबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, काँग्रेसमधील काही नेत्यांनी राहुल गांधी यांच्यावर याबाबत टीकादेखील केली आहे.

राहुल गांधी मार्शल आर्ट्समध्ये निपुण ?

जानेवारी महिन्यात जिल्हा काँग्रेस समितीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राहुल गांधी यांनी मार्शल आर्ट्सचे महत्व समजावून सांगितले होते. काँग्रेसच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी मार्शल आर्ट्समधील योद्ध्यांप्रमाणे बनावे. राजकीय पटलावर भाजपाकडून त्यांनी चीतपट होऊ नये, असा सल्ला राहुल गांधी यांनी दिला होता. राहुल गांधी हे व्यक्तिमत्वापेक्षा विचारधारेला अधिक महत्व देतात. काँग्रेस व भाजपामध्ये विचारधारेची लढाई आहे, असे त्यांनी वारंवार म्हटले आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी मार्गातील स्थानिक कराटे आणि ज्युडो क्लबला भेटी दिल्या होत्या. यात्रेदरम्यान राहुल यांनी स्थानिक चिमुकल्यांना मार्शल आर्ट्सचे धडे फावल्या वेळेत दिले होते. भारत जोडो यात्रेपासून राहुल गांधी यांचे मार्शल आर्ट्स प्रेम सार्वजनिक झाले होते. सुत्रांच्या माहितीनुसार, राहुल गांधी हे मागील ३० वर्षांपासून मार्शल आर्ट्समध्ये निपुण आहेत. त्यांच्याकडे ‘आयकिडो’ (जपानी मार्शल आर्ट्सचा एक प्रकार) मध्ये ब्लॅक बेल्ट, तर ‘जिउ जित्सु’ मध्ये ब्ल्यू बेल्ट असल्याचे सुत्रांनी सांगितले.

बैठकीत उपस्थित नेते काय म्हणाले?

“राहुल गांधी हे ‘जिउ जित्सु’ या मार्शल आर्ट्स प्रकाराला शारीरिक व्यायामापेक्षा मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी प्राधान्य देतात. राजकारणात तसेच वैयक्तिक जीवनात त्यांनी या मार्शल आर्ट्स प्रकारातील रणनीतींचा, तत्वज्ञानाचा उपयोग केला आहे.”, अशी माहिती बैठकीत उपस्थित एका नेत्याने ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिली. भारत जोडो यात्रेत संध्याकाळी राहुल गांधी हे लहान मुलांना मार्शल आर्ट्सचे धडे द्यायचे, असेही काँग्रेस नेत्याने सांगितले.

“मार्शल आर्ट्समधून अनेक गोष्टी शिकता येतात. स्व-नियंत्रण, स्व-संरक्षण, यश व अपयश कसे पचवायचे ते मार्शल आर्ट्स शिकवते. ते राहुल गांधी यांना अत्यंत प्रिय आहे. मार्शल आर्ट्समधून मिळणारी ही शिकवण तरूणांमध्ये रूजावी असा राहुल गांधी यांचा प्रयत्न आहे.”, असे एका काँग्रेस नेत्याने सांगितले.

राहुल गांधींवर काँग्रेसमधूनच टीका

राहुल गांधी यांच्यावर काँग्रेसमधूनच याबाबत टीका होत आहे. राहुल गांधी हे काँग्रेस पक्षाला एखाद्या एनजीओ प्रमाणे चालवतात असा आरोप अनेकदा काँग्रेस नेत्यांकडून केला जातो. “आता राहुल गांधी हे स्पोर्ट्स क्लबकडे वळले आहेत. ही वेळ नेतृत्व दाखवण्याची आहे”, अशी टीका एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने केली आहे. त्यावर “एक गट हा कायम दु:खी असतो. गांधी हे पक्षाच्या हिताविरोधात काहीही करत नाहीत. ते चोवीस तास मार्शल आर्ट्समध्ये गुंतलेले नाहीत. त्यांनी गांभीर्याने स्वत:ला पक्षाच्या कामात झोकून दिले आहे. पक्षातील नेते व कार्यकर्त्यांशी जुळण्यासाठी त्यांनी केलेला हा एक वेगळा प्रयत्न आहे”, असे प्रत्युत्तर काँग्रेसमधूनच आरोपांना देण्यात आले.