Rahul Gandhi on Operation Sindoor : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर राबवित पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अनेक अड्डे उद्ध्वस्त केले. या कारवाईनंतर पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय खासदारांची शिष्टमंडळे परदेशात पाठवली आहेत. एकीकडे, या शिष्टमंडळाचा भाग असलेले काँग्रेसचे काही नेते केंद्र सरकारवर स्तुतीसुमनं उधळताना दिसून येत आहेत. तर दुसरीकडे लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी सरकारवर सातत्याने टीका करीत असल्याचं पाहायला मिळत आहे. मंगळवारी मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधींनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना केंद्र सरकारचं परराष्ट्र धोरण आणि पाकिस्तानबरोबरच्या युद्धविरामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
जवळपास दीड महिन्यापूर्वी २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ निष्पाप भारतीयांचा मृत्यू झाला. पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधून आलेल्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याचं स्पष्ट झालं आहे. भारतानं या हल्ल्याचा सूड म्हणून ७ मे रोजी पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी मारले गेल्याचं सांगण्यात आलं. भारतीय लष्कराने राबविलेल्या या मोहिमेला ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव देण्यात आलं. यानंतर पाकिस्ताननेही भारतावर ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भारतीय सैन्यदलाने तो यशस्वीरित्या हाणून पाडला. जवळपास ७८ तास भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष सुरू होता. यादरम्यान, भारताकडून अचानक युद्धविरामाची घोषणा करण्यात आली. यावरून विरोधकांनी केंद्र सरकारवर टीकेची तोफ डागली. अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर भारताने युद्धविराम केला असा आरोप विरोधकांनी केला आहे.
राहुल गांधी ऑपरेशन सिंदूरबाबत काय म्हणाले?
दहशतवाद्यांचा नायनाट करण्यासाठी भारतीय सैन्यदलाने राबविलेल्या ऑपरेशन सिंदूरवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी याच मुद्द्याला हाताशी धरून केंद्र सरकारला लक्ष्य केलं.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून फोन आल्यानंतर पंतप्रधान मोदींनी शरणागती पत्करली, असा दावा राहुल गांधी यांनी केला.
भाजपा आणि राष्ट्रीय लोक कसे आहेत, ते मला चांगल्या प्रकारे माहिती आहे. थोडा दबाव टाकला की हे घाबरून पळून जातात, असंही ते म्हणाले.
अमेरिकेतून डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि म्हणाले की, मोदीजी काय करत आहात? नरेंदर, सरेंडर, त्यानंतर जी हुजूर म्हणत मोदींनी शरणागती पत्करली, असा दावा राहुल गांधी यांनी केला.
आणखी वाचा : ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचं आक्षेपार्ह विधान; भाजपा आक्रमक, नेमके काय म्हणाले भगवंत मान?
१९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाचा दिला संदर्भ
यावेळी राहुल गांधींनी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचंही उदाहरणही दिलं. ते म्हणाले, “तुम्हाला कदाचित आठवत असेल, एक काळ होता जेव्हा अमेरिकेतून भारताला फोन नाही तर १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धावेळी सातवा ताफा आला होता. हत्यारे आली होती, एअरक्राफ्ट कॅरियर आले होते; पण इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या की, मला जे करायचं आहे ते मी करेन. हाच फरक आहे. हे लोक सगळे असेच आहेत. स्वातंत्र्याच्या काळापासून यांना शरणपत्र लिहायची सवय आहे… गांधीजी, जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल हे सगळे नेते शरण जाणारे नव्हते, तर ते महाशक्तींशी लढणारे होते. देशात काँग्रेसचे सरकार असते तर कधीही शरणागती पत्करली नसती.”
केंद्र सरकारने घेतलेल्या जातीयजनगणनेचा दाखल देत राहुल गांधींनी भाजपा सरकारवर टीका केली. ते म्हणाले, “मोदीजी म्हणायचे की जातीच अस्तित्वात नाहीत. मग म्हणाले फक्त चार जाती आहेत. निवडणुकांच्या वेळी ते अचानक इतर मागासवर्गीय समुदायाचा मुद्दा उपस्थित करतात. नितीश गडकरी आणि मोहन भागवत यांनीही काही विधाने केली होती. त्यानंतर थोडा दबाव आला आणि हे संपूर्णपणे शरण गेले. पण मला ते माहिती आहेत. जसं त्यांनी महिलांसाठी आरक्षणाचं हाताळलं, ते दहा वर्षांनी पुढे ढकललं. इथंही तसंच चाललंय. त्यांना खरंतर हे करायचंच नाही. फक्त दबावाखाली म्हणून बोलले. पण त्यांना हे करायचंच नाही, कारण त्यांना देशात न्याय नको आहे. त्यांना अंबानी-अदानींचा देश हवा आहे, अब्जाधीशांचा देश हवा आहे, सामाजिक न्यायाचा देश नको आहे.”
भाजपा नेत्यांची राहुल गांधींवर टीका
दरम्यान, राहुल गांधी यांनी केलेल्या विधानावरून भाजपा नेते चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. भाजपाचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी त्यांचा उल्लेख थेट पाकिस्तानचे प्रवक्ते म्हणून केला. “ऑपरेशन सिंदूरबाबत भारताचे परराष्ट्र मंत्रालय काय म्हणत आहे, हे राहुल गांधी यांनी ऐकायला हवे. त्यावरही विश्वास नसेल तर काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार शशी थरूर, मनीष तिवारी व सलमान खुर्शीद यांच्यावर तरी विश्वास ठेवावा. भारत-पाकिस्तान यांच्या तणावादरम्यान अमेरिकेतून कोणताही फोन आलेला नाही. उलट पाकिस्तानने भारतीय लष्करप्रमुखांना फोन करून सैनिकी कारवाई थांबवण्यासाठी विनवण्या केल्या”, असं पुनावाला यांनी स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा : माजी मुख्यमंत्र्यांचा पक्ष फुटणार? के. कविता यांनी नेमका काय इशारा दिला?
“राहुल गांधींचे हृदय पाकिस्तानसाठी धडधडते”
भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनीही काँग्रेसच्या ज्येष्ठ खासदारावर शाब्दिक हल्ला चढवला. राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी नेहमीच असभ्य शब्द वापरतात आणि त्यांच्या देशप्रेमावर प्रश्न उपस्थित करतात. इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला श्रद्धांजली वाहताना ते बूटसुद्धा काढत नाहीत, यावरून त्यांचे देशप्रेम दिसून येते. राहुल गांधी यांचे हृदय नेहमीच पाकिस्तानसाठी धडधडते, अशी टीका प्रदीप भंडारी यांनी केली. भाजपा खासदार संबित पात्रा यांनीही राहुल गांधींवर टीका करताना म्हटले की, “मध्यप्रदेशमधील भाषणात राहुल गांधींनी ऑपरेशन सिंदूर, भारतीय सेना आणि देशाचा अपमान केला आहे. त्यांनी ज्या प्रकारे ‘शरणागती’ असा शब्द वापरला, तो कोणत्याही सुसंस्कृत राजकारण्याला शोभणारा नाही. जो नेता आपल्या मातृभूमीविषयी असा शब्द वापरतो, तो देशासाठी योग्य नाही.”
“पाकिस्तानचं ४८ तासांचं नियोजन ८ तासांत उधळलं”
“पाकिस्ताननं भारतात दहशतवादी कारवाया करता कामा नये. ‘ऑपरेशन सिंदूर’ मागचा मूळ विचार पाकिस्तानमधून होणारा राज्य पुरस्कृत दहशतवाद थांबवणे हा होता”, असं संरक्षणदल प्रमुख अनिल चौहान यांनी म्हटलं आहे. “पाकिस्ताननं १० मे रोजी मध्यरात्री १ वाजता जाहीर केलं होतं की भारताला ४८ तासांत गुडघे टेकायला लावणार. त्यानंतर त्यांनी सीमेपलीकडून हल्ले चालू केले. त्यांनी हा वाद आणखी चिघळवला. भारतानं फक्त तिथल्या दहशतवादी तळांनाच लक्ष्य केलं होतं. पाकिस्ताननं ज्या लष्करी कारवाईसाठी ४८ तास सांगितले होते, ती मोहीम त्यांना अवघ्या ८ तासांत आटोपती घ्यावी लागली. त्यांनी लगेच फोन उचलला आणि शस्त्रविरामाची चर्चा केली”, असं जनरल अनिल चौहान यांनी स्पष्ट केलं.