Rahul Gandhi on Manusmriti And Gen Z : मनुस्मृतीवरील टीका, छात्रों की गूंज, हल्द्वानी येथील ‘शुद्धीकरणा’चा वाद आणि जातनिहाय जनगणना, या चार मुद्द्यांवरून राहुल गांधी विशिष्ट रणनीतीनुसार वाटचाल करताना दिसत आहेत. काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे दलित, महिला, जेन झी, ओबीसी आणि अल्पसंख्याक या समाजघटकांना काँग्रेसच्या बाजूने वळवण्यासाठी नव्या मुद्द्यांवर भर देत आहेत.

राहुल गांधी यांनी नुकतीच मनुस्मृतीवर तिखट शब्दांत टीका केली. मनुस्मृतीमध्ये महिलांकडे स्वतंत्र व्यक्ती म्हणून न पाहता त्यांना वडील, पती किंवा मुलाशी जोडलेली दुय्यम व्यक्ती म्हणून पाहिले जाते असा आरोप त्यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपाने जोरदार आक्षेप घेतला. गांधी हिंदू धर्माचा अवमान करत असल्याचा आरोप भाजपाने केला, त्यामुळे आता महिला आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि भाजपामध्ये राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. विशेषतः २०२७ मध्ये उत्तर प्रदेशसह अन्य निवडणूक सज्ज राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्ष आपापला सामाजिक आधार मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत.

महिलांसाठी ‘कल्याण’ नव्हे, तर पितृसत्तेविरुद्ध लढा

पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमातील राहुल गांधींच्या भाषणातून काँग्रेसच्या रणनीतीमधील बदल दिसून आला. महिलांबाबत राजकीय पक्ष नेहमी ‘कल्याण’ किंवा ‘सक्षमीकरण’ यांसारखे साचेबद्ध शब्द वापरतात. मात्र, राहुल गांधी यांनी याऐवजी थेट ‘पितृसत्ताक व्यवस्था मोडून काढण्याची’ भाषा केली, याचवेळी त्यांनी आरएसएस आणि भाजपावर मनुस्मृतीचा प्रभाव असल्याचा आरोप केला.

दरम्यान, राहुल गांधींच्या कार्यक्रमाची विशिष्ट पद्धतीने आखणी केल्याचे दिसून आले. त्यांनी नेहमीपेक्षा वेगळ्या ढंगात पेहराव करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पुण्यातील कार्यक्रमात त्यांनी नेहमीचा पांढरा टी-शर्ट आणि बेज रंगाची पँट याऐवजी त्यांनी स्टायलिश पिवळा शर्ट घातला होता. प्रयागराजमधील याच ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात त्यांनी यापूर्वी गुलाबी रंगाचा सैल शर्ट घातला होता.

जेन झी महिलांना जोडण्याचा प्रयत्न?

काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मते, राहुल गांधींच्या या ‘मेकओव्हर’मागे जेन झीमधील एका मोठ्या वर्गाला, विशेषतः तरुण महिलांना पक्षाशी जोडण्याचा प्रयत्न आहे. या वर्गाकडे काँग्रेसने आतापर्यंत पुरेसे लक्ष दिले नसल्याचे पक्षातील काही नेत्यांना वाटते. शहरी, उच्चशिक्षित, मध्यमवर्गीय आणि उच्चवर्णीय जेन झी वर्गातील काही तरुणांना राहुल गांधींची ही हटके शैली आवडते. पारंपरिक राजकारण्यांकडून २४ तास काम करण्याची अपेक्षा केली जाते. त्याउलट राहुल गांधी वेळोवेळी ब्रेक घेतात, फिटनेस आणि आरोग्याकडे लक्ष देतात. त्यांची ही शैली तरुणांना भावते. सरकारला प्रश्न विचारण्याची त्यांची भूमिकादेखील तरुणांना आकर्षित करत असल्याचे कार्यकर्ते सांगतात. पुण्यातील कार्यक्रमात एका १९ वर्षीय तरुणाने सांगितले की, ‘आधुनिक असणं म्हणजे प्रश्न विचारणं.’ राहुल गांधींचा हा आक्रमक आणि तितकाच मैत्रीपूर्ण अंदाज तरुणांना आवडत असल्याचे दिसते.

तरुण महिलांशी थेट संवाद

पुण्यात राहुल गांधी यांनी राजकीय संवादाची आणखी एक वेगळी पद्धत वापरली. हातात माईक घेऊन ते स्टेजवर फिरत होते. त्यांनी तरुण महिलांच्या वेगवेगळ्या गटांना स्टेजवर बोलावून त्यांच्याशी थेट संवाद साधला. या महिलांनी आपल्या आयुष्यातील अडचणी राहुल गांधींसमोर मांडल्या. सुरक्षिततेच्या समस्यांमुळे शिक्षण आणि नोकरीवर होणारा परिणाम, स्वतःचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नसणं आणि आर्थिक अडचणी अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी चर्चा केली.

या महिलांपैकी सगळ्याच इंग्रजी बोलणाऱ्या नव्हत्या, अनेक जणींनी मराठीतच आपले प्रश्न मांडले, तर काही जणींचे हिंदीत मांडलेले अनुभवदेखील मनाला भि़डणारे होते. त्यांच्या काही मार्मिक मुद्द्यांवर प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. यातून जेन झी राहुल गांधींकडे नव्या नजरेने पाहत असल्याचे चित्र निर्माण होत आहे.

राहुल गांधींनी मनुस्मृतीचा मुद्दा का उपस्थित केला?

खरंतर महिलांच्या हक्कांवर भाष्य करताना राहुल गांधी मनुस्मृतीचा उल्लेख टाळू शकले असते, मात्र त्यांनी जाणीवपूर्वक हा वादग्रस्त मुद्दा उपस्थित केल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. त्यामागे केवळ जेन झीमधील तरुणी आणि जेन अल्फामधील मुलींशी संवाद साधण्याचा उद्देश नव्हता, तर दलित समाजालाही जोडण्याचा प्रयत्न होता.

१९२७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे सार्वजनिकरित्या दहन केले होते. मनुस्मृती अस्पृश्यतेला प्रोत्साहन देते आणि दलित व महिलांना समानता व स्वायत्ततेपासून वंचित ठेवते, अशी डॉ. आंबेडकरांची भूमिका होती, त्यामुळे मनुस्मृतीचा मुद्दा उपस्थित करून राहुल गांधी एकाच वेळी महिला आणि दलित या दोन्ही सामाजिक वर्गांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत, असा राजकीय अर्थ काढला जात आहे.

‘शुद्धीकरण’च्या मुद्द्यावरून भाजपावर निशाणा

२९ ऑगस्टला राहुल गांधी यांनी या मनुस्मृतीच्या मुद्द्याला आणखी धार दिली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या महिन्याच्या सुरुवातीला हल्द्वानी येथे एका सभेला संबोधित केले होते, त्यानंतर काही लोकांनी याच सभेच्या स्टेजचे कथित ‘शुद्धीकरण’ केले होते. राहुल गांधी यांनी या घटनेवरून भाजपावर निशाणा साधला. ‘खरगे दलित असल्यामुळेच स्टेजचे शुद्धीकरण करण्यात आले,’ असा आरोप राहुल गांधी यांनी केला. त्यांच्या मते, हा प्रकार दलितांविरोधातील अस्पृश्यता अजूनही समाजात कायम असल्याचे दाखवतो.

यातून राहुल गांधी भाजपाला एक असा संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत की, २०१४ पासून भाजपाने ओबीसी आणि दलित समाजात आपला प्रभाव वाढवला असला तरी पक्षाच्या मुळाशी अजूनही उच्चवर्णीयांचा प्रभाव आहे. त्यांनी भाजपाला ‘ब्राह्मण-बनिया पक्ष’ म्हणत प्रखर टीका केली.

भाजपानेही राहुल गांधींच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिले. मात्र, राहुल गांधी यांनी त्यांची भूमिका कायम ठेवली आहे. काँग्रेससारख्या मोठ्या पक्षाच्या दलित अध्यक्षांसोबत असा व्यवहार होऊ शकतो, तर गावातील सामान्य दलितांची परिस्थिती काय असेल? असा सवाल ते करत आहेत.

भाजपला याचा फायदा होऊ शकतो?

विशेष म्हणजे मनुस्मृतीचा वाद भाजपसाठीही राजकीयदृष्ट्या फायदेशीर ठरू शकतो. अलीकडील आंदोलनांमुळे भाजपाविरोधात वातावरण निर्माण झाले आहे, ‘हिंदू विरुद्ध हिंदूविरोधी’ असा मुद्दा उपस्थित करुन भाजपाला वातावरण आपल्या बाजूने वळवता येऊ शकते.

भाजपा नेत्यांनी राहुल गांधींवर टीका करताना असा सवाल केला की, महिलांशी भेदभाव करणाऱ्या हिंदू धर्मग्रंथांवरच ते टीका का करतात?

भाजपाच्या नव्या सरचिटणीस स्मृती इराणी यांनीही राहुल गांधींना त्यांच्या भूमिकेची अंमलबजावणी करून दाखवण्याचं आव्हान दिलं. महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीला पाठिंबा द्यावा आणि कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या मंत्रिमंडळात अधिक महिलांना स्थान द्यावं, अशी मागणी त्यांनी केली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही राहुल गांधींवर निशाणा साधला. गांधी उत्तर प्रदेश आणि देशाच्या धार्मिक परंपरांचा अपमान करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

काँग्रेससाठी दलित मतं का महत्त्वाची?

दलित समाज पुन्हा काँग्रेसच्या बाजूला येणं पक्षाच्या भविष्यासाठी महत्त्वाचं आहे, याची राहुल गांधींना जाणीव आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत दलित समाजाला संविधानाने दिलेल्या आरक्षणाला मुकण्याची भीती होती, ही भीती वाढीस लागली आणि भाजपाला स्वबळावर बहुमत मिळवता आले नाही. त्याचवेळी राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाशी संपर्क वाढवण्याचा प्रयत्न केला मात्र, हिंदी पट्ट्यात त्यांना ओबीसी समाजात अपेक्षित यश अद्याप मिळालेले नाही.

जातनिहाय जनगणनेतील प्रश्नांची रचना बदलण्याची मागणी करत राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही लिहिलं आहे. मात्र, या पत्रातून ओबीसींच्या हिताला पुरेसा न्याय मिळेल का याबाबत अनेकांना शंका आहे.

राहुल गांधींसमोरची खरी अडचण काय?

राहुल गांधींच्या राजकीय रणनीतीसमोर मात्र आणखी एक मोठं आव्हान आहे, ते म्हणजे काँग्रेसची संघटनात्मक ताकद.

देशातील अनेक भागांमध्ये काँग्रेसची संघटना कमकुवत झाली आहे. आज निवडणूक जिंकण्यासाठी केवळ वातावरण किंवा लोकप्रियता पुरेशी नसते. मतदारांमध्ये निर्माण झालेली सहानुभूती आणि समर्थन प्रत्यक्ष मतांमध्ये बदलण्यासाठी मजबूत संघटनात्मक यंत्रणा लागते. याच ठिकाणी काँग्रेस कमी पडत असल्याचं दिसतं, त्यामुळे राहुल गांधींच्या नव्या राजकीय भूमिकेमुळे चर्चा आणि वातावरण तयार झालं तरी त्याचं मतांमध्ये रूपांतर करण्यासाठी पक्षाकडे आवश्यक यंत्रणा आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.