पुणे : भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढा उभारता यावा आणि मरगळ आलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी शहर काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल करण्यात आले. शहरातील खड्डे, कोंडी, अतिक्रमणे अशा प्रश्नांवरून पक्ष आंदोलने करताना दिसतो आहे. त्यातच येत्या २२ ऑगस्टला काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी पुणे दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधतील, जो युवा कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्याची संधी आहे. या घडामोडी आणि राहुल यांचा पुणे दौरा शहर काँग्रेससाठी राजकीय आणि संघटनात्मक ‘रिसेट’ची संधी ठरू शकतो. अर्थात, पक्षाने ती साधायला हवी.

काँग्रेसची राजकीय परीक्षा

राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ या मोहिमेचा पुण्यातील कार्यक्रम विशेषतः विद्यार्थिनींसाठी आयोजित करण्यात आला आहे. शिक्षणव्यवस्था, रोजगार, सुरक्षितता, समान संधी आणि विद्यार्थिनींच्या प्रश्नांना व्यासपीठ देणे हा याचा केंद्रबिंदू आहे. राहुल गांधींनी या मोहिमेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्याची भूमिका घेतली आहे. पुण्यातील कार्यक्रमही त्याच मालिकेतील पुढचा टप्पा आहे. मात्र, या दौऱ्याची खरी राजकीय परीक्षा कार्यक्रम संपल्यानंतर सुरू होणार आहे.

गट-तटांची चर्चा

पुणे शहर काँग्रेसला पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागांत अध्यक्ष देण्यात आले आहेत. पश्चिम भागाच्या अध्यक्ष दीप्ती चवधरी यांनी गेल्या आठवड्यात पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर केली आहे. पूर्व भागातील पदाधिकाऱ्यांची निवड अद्याप बाकी आहे. राहुल गांधींच्या पुणे कार्यक्रमाच्या तयारीच्या बैठकीत चवधरी यांनी बैठकीची सुरुवात केली, तर पूर्व विभागाचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी कार्यक्रमासंदर्भात सूचना मांडल्या.

पुणे शहर काँग्रेसमध्ये दोन-तीन गट असल्याची चर्चा नवी नाही. अनेकदा पक्षाच्या कार्यक्रमापेक्षा कोणाचा प्रभाव अधिक, कोणाला पद मिळाले आणि कोणाच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम झाला, याच्या चर्चेवरच ऊर्जा खर्च होत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. एकाच व्यक्तीच्या हातात संघटनेचा कारभार राहू नये, यासाठी शहर काँग्रेसने संघटनात्मक रचना दोन भागांत विभागली. मात्र, यामुळे काँग्रेसची ताकद आपोआप दुप्पट होणार नाही. उलट दोन अध्यक्ष, दोन गट आणि वेगवेगळ्या राजकीय आकांक्षा यामुळे पक्षांतर्गत संघर्ष वाढला, तर त्याचा थेट फटका पक्षाच्या कामाला बसू शकतो.

विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडण्याची संधी

‘नीट’ परीक्षेच्या पेपरफुटीनंतर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला काँग्रेसने पाठिंबा दिला. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करून विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. त्यानंतर राहुल गांधींनी विद्यार्थ्यांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न ऐकण्याची मोहीम हाती घेतली. पुण्यातील कार्यक्रमात हा मुद्दा अधिक व्यापक करण्याची संधी आहे. पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. देशाच्या विविध भागांतून विद्यार्थी येथे येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रश्न म्हणजे केवळ शिक्षण शुल्क किंवा परीक्षेतील गैरप्रकार नाहीत. रोजगार, स्पर्धा परीक्षा, वसतिगृहे, महिला सुरक्षा, सार्वजनिक वाहतूक, डिजिटल सुविधा, शिक्षणाचा खर्च आणि करिअरच्या संधी हे प्रश्नही त्याच्याशी जोडलेले आहेत.

पुण्यात २२ ऑगस्टचा होणारा कार्यक्रम विशेषतः मुलींसाठी असल्याचे राहुल गांधी यांनी जाहीर केले आहे. ‘आता मुली बोलतील आणि देश ऐकेल,’ या भूमिकेतून हा कार्यक्रम पुढे नेला जात आहे. पुणे शहर काँग्रेसने या संधीचा वापर केवळ महिला मतदारांशी संवादासाठी न करता विद्यार्थिनींच्या शहरातील रोजच्या अनुभवांशी जोडला पाहिजे.

विरोधाची धार वाढविणे गरजेचे

पुणे शहरात भाजपची राजकीय ताकद मोठी आहे. राज्य आणि केंद्रातही भाजपचे सरकार आहे. त्यामुळे काँग्रेसकडे विरोधी पक्ष म्हणून प्रश्न विचारण्याची संधी मोठी आहे. शहरातील रस्त्यांवरील खड्डे, वाहतूक कोंडी, पाणीपुरवठा, नदी प्रदूषण, कचरा, पार्किंग, सार्वजनिक वाहतूक, वाढते शहरीकरण आणि पुण्यातून उद्योग बाहेर जाण्याची चिंता, असे अनेक प्रश्न पुणेकरांसमोर आहेत. यातील प्रत्येक प्रश्नावर काँग्रेसने या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठोसपणे भूमिका मांडली पाहिजे.

राहुल यांच्या दौऱ्यामुळे शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना थेट राष्ट्रीय नेतृत्वाशी संपर्क आणि पक्षाच्या व्यापक राजकीय अजेंड्याशी स्थानिक संघटनेची सांगड घालण्याची संधी उपलब्ध होणार आहे. मात्र, त्यासाठी पदाधिकाऱ्यांनी स्वतःला केवळ कार्यक्रम व्यवस्थापनापुरते मर्यादित ठेवू नये. प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या भागातील किमान पाच ठोस प्रश्न घेऊन दौऱ्यात सहभागी झाले पाहिजे. त्यातील कोणते प्रश्न विद्यार्थ्यांशी संबंधित आहेत, कोणते महिलांशी संबंधित आहेत आणि कोणते शहराच्या प्रशासनाशी संबंधित आहेत, याचे वर्गीकरण केले पाहिजे.

विश्वासार्ह नेतृत्वाचा अभाव

काँग्रेससमोरील सर्वांत मोठा धोका भाजप नसून, अंतर्गत विसंवाद हाच आहे. भाजपविरोधात पुणेकरांमध्ये काही प्रमाणात नाराजी असली, तरी ती नाराजी काँग्रेसकडे वळविण्यासाठी काँग्रेसकडे संघटनात्मक क्षमता, सातत्य आणि विश्वासार्ह नेतृत्व आवश्यक आहे. राहुल गांधींच्या पुणे दौऱ्याच्या निमित्ताने शहरातील सर्व गटांना एकत्र बसवून काही मूलभूत निर्णय घेणे आवश्यक आहे. कोणताही कार्यक्रम एका गटाचा नाही, तो पक्षाचा आहे. कोणताही प्रश्न एका नेत्याचा नाही, तो पुणेकरांचा आहे. तसेच, कोणतेही आंदोलन प्रसिद्धीसाठी नाही, तर परिणामासाठी आहे, ही कार्यपद्धती शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी स्वीकारली, तर दोन अध्यक्षांची रचना संघर्षाचे कारण न बनता संघटनात्मक विस्ताराचे साधन ठरू शकते.