Rahul Gandhi Attacks PM Modi Government : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी करणारा ठराव भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी गुरुवारी संसदेत सादर केला. या घडामोडीनंतर राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. अमेरिकेबरोबरच्या व्यापार करारावरून त्यांनी केंद्र सरकारला चांगलेच ठणकावले. तुम्हाला जे करायचे ते करा, शेतकऱ्यांच्या बाजूने मी ठामपणे उभा असून एक इंचभरही मागे हटणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राहुल गांधी यांचे आरोप काय?
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवसांपासून सत्ताधारी व विरोधकांमधील तणाव वाढला आहे. गेल्या आठवड्यात राहुल गांधी यांनी संसदेतील आपल्या भाषणात माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित आत्मचरित्राचा उल्लेख केला होता. त्यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह सत्ताधारी बाकावरील मंत्र्यांनी त्यावर तत्काळ आक्षेप घेतला. त्यांच्या मदतीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू देखील मैदानात उतरले होते. त्यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहांच्या नियमांचा दाखल देत राहुल यांना वेळीच रोखले होते. अमेरिकेबरोबरच्या व्यापार करारावरूनही राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला सातत्याने लक्ष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेबरोबरच्या व्यापार करारात देश विकल्याचा आरोपही त्यांनी केला.
राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपा आक्रमक
राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर केलेल्या टीकेनंतर सत्ताधारी बाकीवरील खासदारांनी आक्रमक पवित्रा घेतला. भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी गुरुवारी संसदेत ‘स्वतंत्र प्रस्ताव’ (Substantive Motion) दाखल करीत राहुल यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली. लोकसभेत बोलताना दुबे म्हणाले, “विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे ‘अर्बन नक्षल’ सारखे वागतात. त्यांचे सोरोस फाउंडेशन आणि फोर्ड फाउंडेशनशी घनिष्ठ संबंध आहेत. थायलंड, कंबोडिया, व्हिएतनाम आणि बहरीनमध्ये जाऊन ते देशद्रोह्यांची भेट घेतात. निवडणूक आयोग, घटनात्मक संस्था, लोकसभा अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायालयावरही ते आरोप करतात. त्यामुळेच या स्वतंत्र प्रस्तावावर चर्चा करून राहुल यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द झाले पाहिजे आणि त्यांना पुन्हा निवडणूक लढवू देऊ नये.”
आणखी वाचा : लोकसभा अध्यक्षांना पदावरून कसे हटवता येते? ओम बिर्ला यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव कशासाठी?
निशिकांत दुबे यांनी ठरावात काय म्हटलंय?
निशिकांत दुबे यांच्या मागणीनंतर इंडिया आघाडीच्या खासदारांनी आणखीनच आक्रमक भूमिका घेतली. त्यावरून गुरुवारी सभागृहात प्रचंड गदारोळ निर्माण झाल्यानंतर पीठासीन अधिकारी कृष्ण प्रसाद तेनेटी यांनी लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित केले. दुबे यांनी आपल्या नोटीसमध्ये असाही आरोप केला की- राहुल गांधी हे परदेशी संस्थांच्या मदतीने संसदेसारख्या पवित्र व्यासपीठाचा चतुराईने वापर करून जनभावना भडकवण्याचा प्रयत्न करीत आहेत. कोणताही ठोस पुरावा नसताना त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगासह सर्वोच्च न्यायालयावरही खोटे आरोप करून देशाची प्रतिमा मलीन केली आहे. यादरम्यान केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी राहुल यांच्याविरोधात हक्कभंगाची नोटीस दाखल करण्याचे संकेत दिले आहेत.
राहुल गांधी आणखीनच आक्रमक
निशिकांत दुबे यांनी खासदारकी रद्द करण्याचा ठराव मांडल्यानंतर राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांची बाजू घेत आक्रमक भूमिका मांडली. त्यांनी एक व्हिडिओ प्रसारित करून केंद्र सरकारविरोधात आणखीनच आक्रमक पवित्रा घेतला. काहीही झाले तरीही मी देशातल्या शेतकऱ्यांसह ठामपणे उभा आहे. शेतकऱ्यांना त्यांचे अधिकार आणि हक्क मिळालेच पाहिजेत. त्यांच्या लढाईत माझा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे, असे राहुल यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देश विकल्याची टीकाही त्यांनी पुन्हा एकदा केली.
राहुल गांधी मोदींबाबत काय म्हणाले?
नरेंद्र मोदी यांनी देशासह शेतकऱ्यांनाही विकून टाकले आहे. तुम्ही माझ्याविरोधात एफआयआर दाखल केली तरीही चालेल; पण मी लोकसभेत जे बोललो आहे तेच खरे आहे. भाजपाच्या खासदारांनी विशेषाधिकार प्रस्ताव आणून माझी खासदारकी रद्द केली तरी चालेल. या गोष्टींनी मला काहीही फरक पडणार नाही. मी इथे शेतकऱ्यांच्या बाजूनेच उभा असून एक इंचही मागे हटणार नाही. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह देशातील सर्वच शेतकरी माझ्या पाठिशी उभे आहेत आणि कायम राहतील, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
हेही वाचा : BMC Deputy Mayor : शिंदेंचे कट्टर टीकाकार ते मुंबईचे उपमहापौर; संजय घाडी यांची राजकीय कारकीर्द कशी आहे?
मोदींनी शेतकऱ्यांना देशाला टाकले – राहुल गांधी
राहुल गांधी पुढे म्हणाले की- भारतातले शेतकरी हे एका अर्थाने देशाचा पाया आहेत. काँग्रेस पक्षासह संपूर्ण देशाने खाद्य सुरक्षेसाठी संघर्ष केला होता; पण नरेंद्र मोदींनी अन्न सुरक्षेच्या धोरणाबाबत शेतकऱ्यांना फसवले आहे. अमेरिकेशी त्यांनी जो करार केला त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी, सोयाबीन उत्पादक शेतकरी, सफरचंद आणि फळं उत्पादक शेतकरी अडचणीत येणार आहेत. अनेक वर्षांपासून विदेशातले लोक भारतातल्या कृषी बाजारपेठेवर कब्जा करण्याचा प्रयत्न करत होते. भाजपा सरकारने करार करून त्यांना आपल्या बाजारपेठांचे दरवाजे खुले करुन दिले आहेत. मोदींनी शेतकऱ्यांना विकून टाकले हे वास्तव आहे.
पंतप्रधान मोदी शेतकरी विरोधी – राहुल गांधी
नरेंद्र मोदी यांना त्यांच्या मित्रांचे म्हणजेच- गौतम अदाणी आणि मुकेश अंबानी यांचे भले कसे करायचे हे माहीत आहे. या लोकांसाठीही ते येत्या काळात अनेक बाजारपेठा खुल्या करतील. मका, कापूस, सोयाबीन, फळे यांसारखे शेतमाल कवडीमोल दराने विकले जातील. आगामी काळात उद्योगपतींना किती गोष्टी मिळतात तुम्ही बघा. संपूर्ण देशाला माहिती आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांच्या विरोधी आहेत. मोदी फक्त त्यांच्या मित्रांचीच मदत करतात, अशी टीकाही राहुल यांनी केली आहे. यादरम्यान भाजपाने खासदारकी रद्द करण्याचा ठराव मांडल्यानंतर राहुल यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द होणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

