Rahul Gandhi on PM Narendra Modi : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या गुजरात येथील अधिवेशनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या आयात शुल्कावरून त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. देशावर आर्थिक संकट येतंय, पंतप्रधान मोदी कुठे लपून बसलेत? कुठं गेली ती ५६ इंचांची छाती? असे तिखट प्रश्न राहुल गांधींनी सत्ताधाऱ्यांना विचारले. अमेरिकेच्या आयात शुल्कामुळे देशात आर्थिक वादळ निर्माण होईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

लोकसभेपाठोपाठ तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. विशेष बाब म्हणजे या निवडणुकांमध्ये पक्षाच्या मताधिक्यातही मोठी घट झाल्याचे दिसून आले. निवडणुकांमध्ये सातत्यानं अपयश येत असल्यानं काँग्रेसनं यावर विचारमंथन सुरू केलं आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी गुजरातमधील अहमदाबाद येथे पक्षाचं अधिवेशन घेण्यात करण्यात आलं होतं. या अधिवेशनात काँग्रेस नेत्यांनी विविध मुद्द्यांवर लक्ष वेधून केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याची रणनीती आखली.

राहुल गांधी नेमकं काय म्हणाले?

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी प्रभावी भाषण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं. बुधवारी (तारीख ९ एप्रिल) अधिवेशनाची सांगता झाल्यानंतर काँग्रेसने स्पष्ट संकेत दिले की, भाजपाचा विजयी रथ रोखण्यासाठी आणि निवडणुका जिंकण्यासाठी पक्ष मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय आणि आदिवासी समुदायावर अधिक लक्ष केंद्रित करील. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावाला बळी पडले आहेत, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

आणखी वाचा : Amit Shah : नितीश कुमार पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री होतील का? अमित शाह काय म्हणाले?

“पंतप्रधान मोदी कुठे लपून बसलेत?”

राहुल गांधी म्हणाले, “यापूर्वी मोदींनी अमेरिकेत जाऊन ट्रम्प यांना मिठी मारली होती. तुम्ही त्यांचा मिठी मारतानाचा फोटो पाहिलाच असेल. ट्रम्प माझे चांगले मित्र आहेत, असं मोदी वारंवार सांगतात. मात्र, अमेरिकेनं भारतावर लादलेल्या अतिरिक्त आयात शुल्कावर मोदींनी एक शब्दही उच्चारला नाही. ते अजूनही त्यावर बोलायला तयार नाहीत. लोकांचे लक्ष याकडे जाऊ नये म्हणून केंद्र सरकारने वक्फ विधेयकात दुरुस्ती करून संसदेत दोन दिवस नाटक केले. देशावर आर्थिक वादळ घोंगावतं आहे. अमेरिकेच्या आयात शुल्कामुळे कोट्यवधी लोक त्रस्त होतील. आधीच बेरोजगारीनं ५० वर्षांतील उच्चांक गाठला आहे. मोदी कुठे आहेत? ते कुठे लपून बसले आहेत”, असे तिखट प्रश्नही राहुल यांनी उपस्थित केले.

‘कुठंय ती ५६ इंचांची छाती?’

अलीकडेच बांगलादेशचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. त्या भेटीवरूनही राहुल गांधींनी पंतप्रधानांना लक्ष्य केलं. “जेव्हा बांगलादेशच्या नेत्यांनी भारताविरोधात नकारात्मक टिप्पणी केली. तेव्हा पंतप्रधानांच्या तोंडातून त्याबद्दल एकही शब्द निघाला नाही. कुठंय ती ५६ इंचांची छाती?” अशी विखारी टीकाही राहुल गांधींनी मोदींवर केली. काँग्रेसच्या अधिवेशनातील ठरावात बांगलादेशातील कट्टरपंथीयांबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. त्यांच्या प्रवृत्तीमुळे बांगलादेशातील हिंदू, बौद्ध व ख्रिश्चनांसह धार्मिक अल्पसंख्याकांसाठी असुरक्षित वातावरण निर्माण झालं आहे”, असं ठरावात नमूद करण्यात आलं आहे.

“भाजपाकडून आरक्षण संपवण्याचा प्रयत्न”

तेलंगणातील काँग्रेस सरकारनं केलेल्या जातीय जनगणनेबाबत बोलताना राहुल गांधी म्हणाले, “सर्वेक्षणातून हे उघड झाले की, राज्यात मागावर्गीयांची संख्या ९० टक्के आहे. त्यामध्ये सर्व वंचित घटकांचा समावेश आहे. काँग्रेसनं राज्यातील ओबीसी आरक्षण ४२ टक्क्यांपर्यंत वाढवलं आहे. तेलंगणानं संपूर्ण देशाला मार्ग दाखवला आहे. जर केंद्रात काँग्रेसचं सरकार आलं, तर देशभरात जातीय जनगणना केली जाईल आणि आरक्षणावरील ५० टक्के मर्यादेची भिंत तोडली जाईल.” दरम्यान, काँग्रेसच्या अधिवेशनात मंजूर झालेल्या ठरावात सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. केंद्र सरकार जाणूनबुजून मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय समुदायाला लक्ष्य करीत आहे. आरक्षणाची चौकट नष्ट करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे, असं ठरावात नमूद करण्यात आलं आहे.

हेही वाचा : Congress vs BJP : भाजपाला रोखण्यासाठी काँग्रेसचं चक्रव्यूह; गुजरातमधील अधिवेशनात काय रणनिती ठरली?

मल्लिकार्जुन खरगे काय म्हणाले?

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही आपल्या भाषणातून भाजपाला लक्ष्य केलं. भाजपानं मतदार याद्यांमध्ये फेरफार करून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक जिंकली, असा आरोप खरगे यांनी केला. केंद्रीय निवडणूक आयोगानं ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या पाहिजेत. जगभरातील अनेक विकसित देशांनी मतदानासाठी ईव्हीएम हटवून त्या जागी मतपत्रिकेचा स्वीकार केला आहे. दुसऱ्या बाजूला आपण आजही ईव्हीएमवर अवलंबून आहोत. भारतीय जनता पार्टी त्यांच्या वैयक्तिक लाभांसाठी अजूनही ईव्हीएम वापरत आहे आणि ईव्हीएमचाच प्रचार करत आहे, अशी टीका खरगेंनी केली. मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याच्या मागणीबाबतचं नेतृत्व देशातील तरुणांकडून केलं जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

“मोदीजी देशाची मालमत्ता विकून निघून जातील”

ईव्हीएममधील फेरफार आणि मतदार यादीत घोटाळा झाल्याचे पुरावे मागणाऱ्या निवडणूक आयोगावरही खरगेंनी अप्रत्यक्ष टीका केली. “तुम्ही अशा युक्त्या आखल्या आहेत की, त्यांचा फायदा फक्त सत्ताधारी पक्षाला होतो. त्यांनी कोणत्या प्रकारच्या मतदार याद्या तयार केल्या आहेत, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत सर्वांत मोठी फसवणूक झाली आहे. हरियाणामध्येही असेच प्रकार घडले आहेत,” असं खरगे यांनी म्हटलं आहे. “मोदी सरकारनं खाणकामापासून विमानतळांपर्यंत सर्व काही त्यांच्या उद्योगपती मित्रांच्या हाती सोपवलं आहे. जर परिस्थिती अशीच राहिली, तर एक दिवस असा येईल की, जेव्हा मोदी सरकार आणि स्वतः मोदीजी देशाची मालमत्ता विकून निघून जातील; मी हे स्पष्टपणे सांगत आहे,” अशी टीकाही खरगे यांनी केली.