Rahul Gandhi Warning Modi Shah Delhi Rally : काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात कथित मतचोरीचा मुद्दा चर्चेत आहे. याच मुद्द्याला हाताशी धरून इंडिया आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगावर आरोपांची राळ उठवली आहे. रविवारी दिल्लीतील रामलीला मैदानावर काँग्रेस पक्षाने ‘व्होट चोर, गद्दी छोड’ रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला पुन्हा लक्ष्य केले. उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांवर कारवाईचा इशाराही दिला. नेमके काय म्हणाले राहुल गांधी? त्याविषयीचा हा आढावा…

राहुल गांधी यांचा इशारा काय?

केंद्रात काँग्रेस पक्षाचे सरकार सत्तेत आल्यास मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, सुखबीर सिंग संधू व विवेक जोशी यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा राहुल गांधी यांनी दिला. तुम्ही मोदी-शाहांचे नाही, तर देशाचे निवडणूक आयुक्त आहात. सत्य आणि असत्याच्या लढाईत निवडणूक आयोग असत्याच्या बाजूने उभा असल्याची टीका त्यांनी केली. सध्याचे सरकार निवडणूक आयुक्तांना कितीही संरक्षण देत असले तरीही त्यांना भविष्यात निश्चितच कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही राहुल यांनी दिला.

काँग्रेसचा आरोप आणखीच धारदार

राहुल गांधी यांनी यापूर्वीही आपल्या पत्रकार परिषदांमधून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर टीका केली होती. मात्र, सार्वजनिक व्यासपीठावरून तिन्ही निवडणूक आयुक्तांची नावे घेऊन त्यांच्यावर हल्लाबोल करण्याची ही पहिलीच वेळ आहे. सूत्रांच्या माहितीनुसार- काँग्रेसने यापूर्वी मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून दूर करण्यासाठी संसदेत ठराव आणण्याचा विचार केला होता. परंतु, सर्व विरोधी पक्ष यासाठी एकत्र येण्यास तयार नसल्यामुळे काँग्रेसने हा विचार सोडून दिला. यादरम्यान पश्चिम बंगाल आणि तमिळनाडूसह अनेक राज्यांत निवडणूक आयोगाने मतदारांची विशेष फेरतपासणी मोहीम सुरू केल्याने काँग्रेसने मतचोरीचा आरोप आणखीच धारदार केला आहे.

आणखी वाचा : प्रशांत किशोर यांची काँग्रेसशी पुन्हा जवळीक? प्रियांका गांधींबरोबरच्या भेटीची का होतेय चर्चा?

काँग्रेसच्या सभेला कोणाकोणाची उपस्थिती?

रविवारी रामलीला मैदानावरील काँग्रेसच्या रॅलीत ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री, काँग्रेस कार्यकारिणीचे (CWC) सदस्य, विविध राज्यांचे प्रदेशाध्यक्ष, तसेच काँग्रेसच्या खासदार आणि आमदारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी पक्षाने देशभरात ‘मतचोरी’विरोधात चालविलेल्या देशव्यापी मोहिमेतून जमा केलेल्या पाच कोटी सह्यांची पोतीदेखील प्रदर्शित केली. राहुल गांधी यांनी या सभेतून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा उल्लेख करीत टीका केली.

राहुल गांधी मोहन भागवतांविषयी काय म्हणाले?

“अंदमान आणि निकोबारमध्ये मोहन भागवत यांनी एक विधान केले. ते विधान ऐकल्यानंतर मी माझ्या भाषणाचा आराखडा बदलला. गांधीजी म्हणायचे की, सत्य सर्वांत महत्त्वाचे आहे. आपल्या धर्मातही सत्यालाच सर्वोच्च स्थान दिले जाते… मोहन भागवत यांचे विधान ऐका. ते म्हणतात की, जग सत्य नव्हे, तर सत्तेला महत्त्व देते; ज्याच्याकडे सत्ता आहे, त्यालाच महत्त्व दिले जाते. ही मोहन भागवत यांची विचारसरणी आहे. ही आरएसएसची विचारधारा आहे. हिंदू धर्माची आणि प्रत्येक धर्माची विचारधारा सांगते की, सत्यच सर्वांत महत्त्वाचे आहे,” असे राहुल म्हणाले.

“सत्याच्या जोरावर मोदी-शाहांचे सरकार हटवू”

राहुल गांधी यांनी आपल्या भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही टीका केली. आपण सत्याच्या मार्गावर चालू आणि मोदी-शाहांना सत्तेतून हाकलून लावू. पंतप्रधान मोदींना ही बाब लक्षात आल्याने त्यांचा आत्मविश्वास डळमळीत झाला आहे. त्यांची मतांची चोरी पकडली गेलेली आहे. मतांची चोरी हा भारतीय संविधानावरचा सर्वांत मोठा हल्ला आहे. जर त्यांनी मते चोरली नसती, तर जनतेने त्यांना पाच मिनिटांत सत्तेवरून हाकलून लावले असते.‘मतचोरी’ या मुद्द्यावर घेतलेल्या आपण उपस्थित केलेल्या प्रश्नांना निवडणूक आयुक्तांकडून एकही उत्तर देण्यात आले नाही, अशी टीकाही राहुल यांनी केली.

हेही वाचा : तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट; फडणवीसांना चेकमेट करण्याचा शाहांचा प्रयत्न? काय चाललंय महाराष्ट्रात? वाचा ५ घडामोडी…

बिहार निवडणुकीतही मतचोरी झाल्याचे आरोप

काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी यांनी आपल्या भाषणातून लोकशाहीतील महत्त्वाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित केले. सध्या देशातील प्रत्येक संस्था पायदळी तुडवली जात आहे. त्यामुळे प्रत्येकाने त्याविरोधात उभे राहणे अत्यंत गरजेचे आहे. संसदेच्या सभागृहात फक्त एक-दोन विषयांवर चर्चा होते. जेव्हा राहुलजी आणि खर्गेजी यांनी निवडणुकीचा आणि मतदारांच्या विशेष फेरतपासणीचा मुद्दा उपस्थित केला तेव्हा सत्ताधारी घाबरले होते, असा टोला प्रियांका यांनी लगावला. मतपत्रिकेवर निवडणुका झाल्या, तर भारतीय जनता पक्ष त्या जिंकू शकत नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. निवडणूक आयोगाने बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान सत्ताधाऱ्यांना झुकते माप दिल्याचा आरोपही प्रियांका यांनी केला. आचारसंहितेच्या काळात सत्ताधारी पक्षाकडून महिलांच्या खात्यात प्रत्येकी १० हजार रुपयांचे वितरण केले जात होते. ही मतचोरी नाही, तर दुसरे काय आहे, असा प्रश्नही प्रियांका यांनी उपस्थित केला.