२०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल अनेक अर्थांनी धक्कादायक आहे. भाजपाला अपेक्षित ‘४०० पार’चा आकडा गाठता आला नाही. दुसरीकडे विरोधकांची कामगिरी सुधारली असून, इंडिया आघाडीला २३२ जागा प्राप्त झाल्या आहेत. भाजपाला ओडिशामध्ये चांगली कामगिरी करता आली आहे; तर इंडिया आघाडीने उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. ही निवडणूक काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वावरील विश्वास अधिक वृद्धिंगत करणारी ठरली आहे. राहुल गांधींनी केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशमधील रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या दोन्हीही मतदारसंघांमध्ये त्यांचा विजय झाला आहे. २०१९ च्या निवडणुकीमध्ये राहुल गांधींनी उत्तर प्रदेशमधील अमेठी आणि केरळमधील वायनाड मतदारसंघात निवडणूक लढवली होती. त्यावेळी अमेठीतील भाजपाच्या उमेदवार स्मृती इराणी यांनी राहुल गांधींचा पराभव केला. त्यामुळे त्यांना वायनाड लोकसभा मतदारसंघातील विजयाच्या जोरावर संसदेत जावे लागले. मात्र, आता या निवडणुकीमध्ये राहुल गांधी लढविलेल्या दोन्हीही लोकसभा मतदारसंघांत विजयी ठरले आहेत. त्यामुळे आता त्यांना कोणता तरी एक मतदारसंघ सोडणे भाग आहे. अशा वेळी ते काय निर्णय घेतील, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

हेही वाचा : लोकसभा निवडणुकीच्या निकालातील नऊ धक्कादायक गोष्टी कोणत्या?

Caste, Latur, Latur latest news,
लातूरमधील जातीची गणिते बदलली
mahayuti, pune, Shivsena,
पुणे : शहरात महायुतीमध्ये तिढा, शिवसेनेकडून तीन विधानसभा मतदारसंघांवर दावा
Rahul Gandhi pc (Nirmal Harindran)
“अयोध्येप्रमाणे गुजरातमध्येही भाजपाला हरवणार…”, राहुल गांधींचं अहमदाबादमधून थेट मोदींना आव्हान
Raju Shetti Ravikant Tupkar Maharashtra results why farm leaders flop
शेतीचे मुद्दे प्रभावी तरीही शेतकरी नेते पराभूत; महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत असं का घडलं?
ramesh keer, Congress, niranjan davkhare,
काँग्रेसचे रमेश कीर मतदारांवर प्रभाव पाडण्यात अपयशी, कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावखरेंची हॅटट्रीक
Wardha, victory, Lok Sabha,
लोकसभा निवडणुकीतील विजयामुळे प्राधान्यात बदल, आता ‘हा’ विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या अजेंड्यावर
Mahavikas Aghadi, pune,
पुण्यात दोन मतदारसंघांवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच
kolhapur uddhav thackeray shivsena
कोल्हापूर उत्तर मतदारसंघामध्ये शिवसेनेची मशालच पाहिजे; शिवसैनिकांचा आग्रह

कोणता मतदारसंघ सोडणार राहुल गांधी?

राहुल गांधींनी दोन मतदारसंघांतून निवडणूक लढविण्याबाबत अनेक प्रकारची मते व्यक्त केली गेली. राहुल गांधी काँग्रेस पक्षाचे आणि विरोधकांचे नेतृत्व करतात आणि त्यामुळे ते एकापेक्षा अधिक मतदारसंघांतून निवडणूक लढवू शकतात, असे मत काही वायनाडकरांनी मांडले होते. मात्र, राहुल गांधींचा दोन्ही मतदारसंघांतून विजय झाल्यास राहुल गांधींनी वायनाडची जागा राखून रायबरेलीची सोडावी, असे वायनाडमधील अनेक मतदारांचे मत आहे. काल (४ जून) लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासमवेत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी म्हणाले, “मी दोन्ही मतदारसंघांमध्ये विजयी झालो आहे. मी वायनाड आणि रायबरेली या दोन्ही मतदारसंघांतील मतदारांचे आभार मानतो. दोन्हीपैकी कोणत्या मतदारसंघातून लोकसभेवर जायचे, याबाबतचा निर्णय मी अद्याप घेतलेला नाही. मात्र, मी त्यावर चर्चा करेन आणि मग निर्णय घेईन.”

केरळमध्ये राहुल गांधी यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवार अॅनी राजा यांनी व भारतीय जनता पार्टीचे उमेदवार के. सुरेंद्रन यांनी आव्हान दिले होते. या निवडणुकीमध्ये राहुल गांधी यांचा तीन लाख ६४ हजार मतांनी विजय झाला आहे. मात्र, प्रचार करताना माकप आणि भाजपाच्या नेत्यांनी असा दावा केला होता की, राहुल गांधी जर रायबरेली मतदारसंघातूनही निवडून आले, तर ते वायनाडला वाऱ्यावर सोडतील. दुसरीकडे रायबरेली मतदारसंघामध्ये राहुल गांधी यांना भाजपाच्या दिनेश प्रताप सिंह यांनी आव्हान दिले होते. या मतदारसंघात राहुल गांधींचा तीन लाख ९० हजार मतांनी विजय झाला आहे. रायबरेली हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असल्याने दोन्हीपैकी कोणता मतदारसंघ सोडायचा, असा पेचप्रसंग राहुल गांधींसमोर उभा राहिला आहे.

वायनाडसोबत काँग्रेसचे नाते

२००९ पासून वायनाडच्या लोकांनी काँग्रेसवर विश्वास ठेवला आहे. त्या लोकसभा निवडणुकीमध्ये केरळचे दिवंगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष एम. आय. शान यांचा विजय झाला होता. वायनाड हा मतदारसंघ निसर्गसान्निध्याने बहरलेला आहे. २०१९ साली राहुल गांधींनी वायनाडमधून लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यापासूनच हा मतदारसंघ विशेष चर्चेत आला आहे. अमेठीमधील पराभवानंतर वायनाड मतदारसंघातील भरघोस मताधिक्याच्या विजयामुळेच राहुल गांधींची प्रतिमा शाबूत राहिली होती. मात्र, इथे वन्य प्राण्यांनी मांडलेला उच्छाद हा या निवडणूक प्रचारातील कळीचा मुद्दा ठरला आहे. मतदारसंघातील अनेक नागरिकांचा हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी वायनाड सोडतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा : “…म्हणून आम्ही भाजपाला नाकारले”, अयोध्यावासियांची नाराजी ते दलित उमेदवाराची बाजी, अयोध्येत नक्की काय घडले?

रायबरेलीशी गांधी-नेहरू घराण्याचे जुने नाते

वायनाडशी अलीकडे ऋणानुबंध जुळलेले असले तरीही रायबरेली मतदारसंघाशी गांधी-नेहरू घराण्याचे संबंध फार जुने आहेत. अगदी पहिल्या लोकसभा निवडणुकीपासूनच गांधी घराण्यातील कुणी ना कुणी इथे निवडणूक लढवली आहे. अगदी २०१९ च्या निवडणुकीमध्ये सोनिया गांधी या मतदारसंघात विजयी ठरल्या होत्या. १९५२ साली झालेल्या पहिल्या निवडणुकीमध्ये राहुल गांधींचे आजोबा फिरोज गांधी यांनी रायबरेलीतून निवडणूक लढवली होती. त्यांच्या मृत्यूनंतर १९६१ साली इंदिरा गांधींनी या मतदारसंघातून निवडणूक लढविणे सुरू केले. आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीमध्ये संपूर्ण काँग्रेसलाच फटका बसला होता. तेव्हा रायबरेलीतून इंदिरा गांधीही पराभूत झाल्या होत्या. भारतीय लोक दलाचे उमेदवार राज नारायण यांचा या मतदारसंघात विजय झाला होता.

सोनिया गांधी यांनी आता राज्यसभेवरून संसदेत जाणे पसंत केले आहे. गेली दोन दशके त्या रायबरेलीचे प्रतिनिधित्व करीत होत्या. सोनिया गांधींची जागा प्रियांका गांधी घेतील आणि त्या पहिल्यांदाच निवडणूक लढवतील, अशा अनेक चर्चांना उधाण आले होते. मात्र, त्या चर्चा फोल ठरल्या. राहुल गांधींनी इथे पहिल्यांदाच निवडणूक लढवली असून, मोठ्या मताधिक्याने ते निवडून आले आहेत. आता राहुल गांधींनी ही जागा सोडायचा निर्णय घेतला, तर ७० वर्षांपासून या मतदारसंघाशी असलेले ऋणानुबंध नक्कीच समोर उभे राहतील. पोटनिवडणुकीमध्ये गांधी घराण्याव्यतिरिक्त इतर काँग्रेस उमेदवाराला रायबरेलीतील जनता स्वीकारेल का, हा मोठा प्रश्न उपस्थित होतो. अशा परिस्थितीत राहुल गांधी काय करणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.