अहिल्यानगर : राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक अखेर बिनविरोध राहिलीच नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला (शरद पवार), पर्यायाने महाविकास आघाडीला जोरदार धक्का देऊन त्यांचे प्रमुख संभाव्य उमेदवार माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी दाखल करण्यापासून रोखण्यात यश मिळवले.

आघाडीत यामुळे निर्माण झालेल्या गोंधळाने पर्यायी अपक्ष उमेदवाराला ‘राष्ट्रवादी’च्या पक्ष चिन्हावर लढतीसाठी उभे करावे लागले. शिवाय, शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या जिल्हा संघटकानेही बंडखोरी केली. आघाडीतील तिन्ही पक्षांतील समन्वयाच्या अभावावर कोणताच नेता प्रतिक्रिया व्यक्त करायला तयार नाही, इतका आघाडीला धक्का बसला आहे.

यानिमित्ताने पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील आपल्या आणखी एका विरोधकाला वेसण घातल्याचे मानले जाते. यापूर्वी विखे यांनी त्यांचे पक्षांतर्गत विरोधक, भाजपचे सहकारातील युवा नेते विवेक कोल्हे यांना मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून अटकाव निर्माण केला. आता विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची प्रमुख धुरा असलेले प्राजक्त तनपुरे यांनाही शांत केले. याचा परिणाम भाजपपेक्षा आगामी जिल्हा सहकारी बँक व जिल्हा परिषद निवडणुकीतील जुळणीला विखे यांना अधिक होणार आहे.

भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनाने राहुरीची पोटनिवडणूक होत आहे. सहानुभूतीच्या लाटेचा फायदा मिळविण्यासाठी भाजपने शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी दिली. अक्षय कर्डिले यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात करून देणारी ही पहिलीच निवडणूक आहे. आता त्यांच्या निवडणुकीची जबाबदारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर टाकण्यात आली आहे. अर्थात, कर्डिले यांच्या साथीला त्यांचे मेव्हणे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार संग्राम जगताप असणार आहेतच.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून उमेदवारी दिलेले गोविंद मोकाटे यांनी दोन दिवस आधीच अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. प्राजक्त तनपुरे यांनी भाजपच्या पथ्यावर पडणारी भूमिका घेऊन उमेदवारी करणार नसल्याचे ऐन वेळी सांगितल्यानंतर ‘राष्ट्रवादी’ने मोकाटे यांना एबी फॉर्म दिला व आपला उमेदवार मानले.

मोकाटे यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात शिवाजी कर्डिले यांच्या साथीनेच झाली. नंतर ते ‘राष्ट्रवादी’त गेले. पुढे शिवसेनेत आणि आता पुन्हा ‘राष्ट्रवादी’त अशी त्यांची वाटचाल आहे. वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके या प्रमुख उमेदवारासह अन्य चार अपक्ष, असे एकूण सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारीसाठी ‘राष्ट्रवादी’ला अक्षरश: झुलवत ठेवले. काही दिवसांपूर्वी ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चाही होती. त्यांच्या या भूमिकेत त्यांचे मामा व अशाच संभ्रमावस्थेतील ‘राष्ट्रवादी’चे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचा सहभाग किती, हे यथावकाश समोर येईलच.

तनपुरे यांनी उमेदवारी न करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांचा राहुरी, पाथर्डी व अहिल्यानगर या तिन्ही तालुक्यांतील कार्यकर्त्यांचा संच विस्कळीत होणार आहे. शिवाय, पोटनिवडणुकीत ते स्वतः ‘राष्ट्रवादी’बरोबर राहणार, की भाजपबरोबर, की तटस्थ, हे अद्याप त्यांनी जाहीर केलेले नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री विखे यांनी तनपुरे यांच्याशी चर्चा केली, त्याच वेळी तनपुरे यांना मुख्यमंत्र्यांचा दूरध्वनी आला. त्यानंतर त्यांनी भाजपच्या, पर्यायाने विखे यांच्या पथ्यावर पडणारी भूमिका जाहीर केली, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

‘राष्ट्रवादी’ने बारामती मतदारसंघात ज्याप्रमाणे उमेदवार देणार नसल्याचे जाहीर केले, तसे ते राहुरीमध्ये करण्याचे टाळले. दोन पोटनिवडणुकांबाबत ‘राष्ट्रवादी’च्या दोन भूमिका होत्या. ‘राष्ट्रवादी’ची ज्या तनपुरे यांच्यावर मदार होती, ते उमेदवारी करणार नसल्याचे अखेरच्या क्षणी स्पष्ट झाल्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी, ‘आम्ही उमेदवार देऊ,’ असे सांगितले.

शिवसेना (ठाकरे) पक्षाचे बंडखोर रावसाहेब खेवरे यांनी उमेदवारीसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क केला. त्या वेळी शरद पवार यांच्याकडून ठाकरे यांना तनपुरे उमेदवार आहेत, असे सांगण्यात आले होते. या सर्व घडामोडीतून मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या धक्क्यातून महाविकास आघाडीत नसलेला ताळमेळ उघड झाला. त्यातून आता राहुरी पोटनिवडणुकीतील चुरसही कमी झाली आहे.