अहिल्यानगर : राहुरी विधानसभा पोटनिवडणूक येत्या काही दिवसांत जाहीर होईल. त्याची तयारी जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली आहे. पोटनिवडणुकीत लढत कोणामध्ये रंगणार, पुन्हा कर्डिले विरुद्ध तनपुरे या पारंपारिक पद्धतीने लढवली जाणार, की अन्य काही राजकीय गणिते त्यामध्ये मांडली जाणार, उमेदवारीपूर्वी कोणत्या राजकीय घडामोडी घडणार, याच्या चर्चा विविध अंगांनी झडत आहेत.
हा मतदारसंघ राहुरीचा बराचसा भाग, पाथर्डी व अहिल्यानगरची काही गावे, अशा तीन तालुक्यांचा मिळून आहे. सन २०२४ मधील सार्वत्रिक निवडणुकीच्या तुलनेत पोटनिवडणुकीसाठी ८ हजार १७ मतदारांनी वाढ होऊन एकूण मतदार संख्या ३ लाख ३३ हजार १८३ झाली. त्या वेळी ७४.२७ टक्के म्हणजे २ लाख ४१ हजार ४०५ मतदान झाले होते. भाजपचे शिवाजी कर्डिले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्राजक्त तनपुरे यांचा ३५ हजार ४८७ मतांनी पराभव केला होता.
राज्यात राहुरीबरोबरच बारामती विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. त्यामुळे बारामतीबाबत जो निर्णय होईल, तोच राहुरीबाबतही होईल, अशी शक्यता माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी वर्तवली. त्याच वेळी माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांची वक्तव्ये, भगवी टोपी, भगवे उपरणे अशा पेहरावातून त्यांच्या संभाव्य भाजपकडील वाटचालीच्या चर्चेनेही जोर पकडला आहे. मात्र, त्यांच्या या भूमिकेला विखे यांनी अप्रत्यक्षपणे विरोध केला आहे. तनपुरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचे भाचे आहेत. जयंत पाटील यांच्या संभाव्य वाटचालीची चर्चा सातत्याने होते, त्याच्याशी तनपुरे यांचाही संबंध जोडला जातो. पोटनिवडणुकीत आपली उमेदवारी असेल. मात्र, अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे पक्ष कोणता, हे सांगता येणार नाही असे म्हणत तनपुरे यांनी या चर्चांना एक प्रकारे बळ दिले आहे.
भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे पाच महिन्यांपूर्वी निधन झाले. राहुरी मतदारसंघात यापूर्वी सन २००९ पासून सन २०२४ पर्यंत झालेल्या निवडणुका भाजपचे शिवाजी कर्डिले विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे तनपुरे कुटुंबातील सदस्य अशाच पारंपरिक पद्धतीने लढवल्या गेल्या. सन २००९ मध्ये माजी खासदार प्रसाद तनपुरे, सन २०१४ मध्ये त्यांच्या पत्नी डॉ. उषा तनपुरे (शिवसेना), सन २०१९ व २०२४ मध्ये त्यांचे चिरंजीव (राष्ट्रवादी, शरद पवार गट) प्राजक्त तनपुरे उमेदवार होते. सन २०१९ मध्ये प्राजक्त तनपुरे विजयी झाले. त्या वेळी दुहेरी लढत होती; इतर वेळी तिहेरी लढतीचा फायदा कर्डिले यांना मिळाला.
शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी, कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना पाठबळ देण्याची भूमिका जाहीर केली. कर्डिले जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते. त्यांच्या संचालकपदाच्या रिक्त जागी अक्षय यांची नियुक्ती करण्यात आली. अक्षय कर्डिले यांनी यापूर्वी कोणतीही निवडणूक लढवलेली नाही. त्यांच्या राजकीय वाटचालीचा श्रीगणेशा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतून करण्याचे यापूर्वी घाटत होते. आता ते पोटनिवडणुकीसाठी दावेदार झाले आहेत.
काही दिवसांपूर्वीच पालकमंत्री विखे यांनी अक्षय कर्डिले यांना घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे सहानुभूतीचा फायदा भाजप घेण्याच्या प्रयत्न असल्याचे दिसते. त्याच वेळी सुजय विखे यांच्या आणखी एका वक्तव्याने वेगळी राजकीय गणिते मांडली जाण्याची शक्यता व्यक्त होते आहे. या पोटनिवडणुकीच्या स्पर्धेत मी नाही. मात्र, त्यासाठी झालेल्या सर्वेक्षणात माझे नाव प्रथम क्रमांकाचे आहे, असे ते सांगतात. सार्वत्रिक निवडणुकीनंतर लगेचच झालेल्या राहुरी पालिकेच्या निवडणुकीत प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने निर्विवाद सत्ता मिळवली. पराभवाने आपण खचलो नाहीत, हे त्यांनी दाखवले आहे.
