अलिबाग : जवळपास पावणेदोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शिवसेना शिंदे गटाचे भरत गोगावले यांची रायगडच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली असली तरी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील राजकीय संघर्ष थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. उलट, दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे.

पावणेदोन वर्षांच्या संघर्षानंतर राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्याकडे रायगडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. पालकमंत्रीपदाचा तिढा सुटल्यानंतर दोन्ही पक्षांतील संघर्षाला पूर्णविराम मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र अलिबागचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांचा तटकरे कुटुंबीयांविरोधातील आक्रमक पवित्रा आणि शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी सुनील तटकरे यांना दिलेला जाहीर इशारा यामुळे संघर्ष कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विधान परिषद निवडणुकीपासून वादाला धार

जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून दोन्ही पक्षांमध्ये मतभेद तीव्र झाले. आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी अध्यक्षपदाच्या शर्यतीत होत्या. मात्र अध्यक्षपद भाजपकडे गेल्याने त्यांच्या अपेक्षांना धक्का बसला. त्यानंतर कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेसाठी महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांना महायुतीची उमेदवारी मिळावी, यासाठी दळवी आग्रही होते. मात्र सुनील तटकरे यांनी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेससाठी मिळवून घेतली. त्यानंतर जुईली दळवी यांना निवडणुकीतून माघार घ्यावी लागली आणि अनिकेत तटकरे बिनविरोध निवडून आले. या घडामोडीमुळे दळवी आणि तटकरे यांच्यातील संघर्ष अधिकच तीव्र झाला.

टिकेचा स्तर खालावला

या राजकीय संघर्षात आरोप-प्रत्यारोपांची पातळीही खालावल्याचे दिसून आले. आमदार महेंद्र दळवी यांनी अनिकेत तटकरे यांच्याबाबत सरोगसीचा उल्लेख करत टीका केली. शिवसेनेच्या उमेदवारांनी माघार घेतली नसती तर अनिकेत तटकरे निवडून आले नसते, असा दावाही त्यांनी केला.यावर अनिकेत तटकरे यांनी दळवींना प्रत्युत्तर देताना त्यांच्या वक्तव्यावर टीका केली. दळवी आपल्या पत्नीला जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळावे यासाठी सुनील तटकरे यांच्या भेटी घेत असल्याचा दावाही त्यांनी केला. त्यामुळे दोन्ही पक्षांतील राजकीय संघर्ष पुन्हा ऐरणीवर आला.

फोडाफोडीचे राजकारण सुरूच

दोन्ही पक्षांकडून एकमेकांच्या कार्यकर्त्यांना आपल्या गोटात आणण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. पालकमंत्री भरत गोगावले यांच्या मतदारसंघातील त्यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे शिवसेना ठाकरे गटाचे सोमनाथ ओझर्डे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रवेशानंतरही गोगावले यांच्या विरोधात संघर्ष सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यानंतर अवघ्या दोन दिवसांत रोहा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि सुनील तटकरे यांचे व्याही संतोष पोटफोडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्यासोबत काही माजी नगरसेवक आणि प्रमुख कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. तटकरे यांच्या बालेकिल्ल्यात झालेल्या या पक्षप्रवेशाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

बारणेंचा इशारा; तटकरेंची सावध भूमिका

कर्जत तालुक्यातील दोन रेल्वे पुलांच्या मंजुरीचे श्रेय घेण्यावरून शिवसेना खासदार श्रीरंग बारणे आणि खासदार सुनील तटकरे यांच्यातही मतभेद समोर आले. तटकरे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुलांना मंजुरी मिळाल्याचे जाहीर केल्यानंतर बारणे यांनी, ‘माझ्या मतदारसंघात ढवळाढवळ करू नका’, असा थेट इशारा दिला. लोकसभेत आपण तटकरे यांच्यापेक्षा वरिष्ठ असून आपल्याला अधिक अनुभव असल्याचे सांगत बारणे यांनी त्यांच्या मतदारसंघातील कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये, अशी नाराजी व्यक्त केली. यानंतर तटकरे यांनी मात्र सावध भूमिका घेत बारणे हे ज्येष्ठ सहकारी आणि चांगले मित्र असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील कार्यकर्ते आपल्या समस्या घेऊन येत असल्याने जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी म्हणून आपण त्यांचा पाठपुरावा करतो, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. तसेच रायगडच्या विकासासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पालकमंत्रीपदाचा तिढा सुटल्यानंतर महायुतीतील दोन्ही घटक पक्षांमधील संघर्ष संपेल, अशी अपेक्षा होती. मात्र स्थानिक पातळीवरील आरोप-प्रत्यारोप, पक्षांतर्गत फोडाफोडी आणि श्रेयवादामुळे हा संघर्ष कायम असल्याचे चित्र आहे. अशातच आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका आणि तीन वर्षांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या संघर्षाला आणखी धार येणार का आणि त्याचे महायुतीच्या एकजुटीवर काय परिणाम होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.