अलिबाग- रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पदावरून सुरु असलेल्या वादावर अखेर पडदा पडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने रायगडच्या पालकमंत्री पद शिवसेना शिंदे गटासाठी सोडले आहे.

गेल्या दीड वर्षांपासून रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना शिंदेगट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात मध्ये टोकाचा संघर्ष सुरु होता. मंत्रीमंडळ स्थापनेनंतर आदिती तटकरे यांची रायगडच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागली होती. मात्र या निर्णयाविरोधात शिवसेना शिंदे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक रोखून धरत टायर जाळून आंदोलन केले होते. शिवसेना शिंदे गटाच्या आक्रमक पवित्र्यानंतर अवघ्या २४ तासात आदिती तटकरे यांच्या पालकमंत्री पदी नियुक्तीच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती. तेव्हापासून रायगडचे पालकमंत्रीपद रिक्त ठेवण्यात आले होते.

भरत गोगावले यांना रायगडचे पालकमंत्रीपद मिळावे यासाठी शिवसेनेचे आमदार आग्रही होते. त्यासाठी वेळोवेळी प्रयत्नही केले होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी आपले राजकीय वजन वापरून पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळू दिले नव्हते. त्यामुळे शिवसेना आमदार आणि रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांची कोंडी झाली होती. महायुतीमधील दोन्ही पक्ष पालकमंत्रीपदासाठी आग्रही असल्याने पालकमंत्री पदाचा तिढा काही सुटत नव्हता.

पण विधानपरिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीनंतर पालकमंत्री पदाचा तिढा अखेर सुटला आहे. विधान परिषदेच्या या जागेसाठी शिवसेना शिंदे गट आग्रही होता. निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने माघार घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिकेत तटकरे यांच्यासाठी जागा सोडली. त्यामुळे अनिकेत तटकरे बिनविरोध निवडून आले. या बदल्यात राष्ट्रवादी काँग्रेसने रायगडच्या पालकमंत्रीपदावरील आपला दावा सोडावा असा निर्णय दोन्ही पक्षांमधील चर्चे दरम्यान झाला होता. त्यानुसार आता रायगडचे पालकमंत्रीपद शिवसेनेच्या भरत गोगावले यांना देण्याचा आदेश सोमवारी जारी करण्यात आला.

सब्र का फल मिठा होता है, मंत्रीपदासाठी अडीच वर्ष थांबलो, तेव्हा पालकमंत्री पद काय चीज आहे अशी प्रतिक्रीया काही दिवसांपूर्वीच दिली होती. अखेर गोगावले यांनी दाखवलेला संयम फळाला आला आहे. ज्या पदासाठी ते जवळपास पावणे दोन वर्ष आस लावून बसले होते. ते पद अखेर त्यांना मिळाले आहे. महाड आणि माणगाव मध्ये शिवसैनिकांनी जल्लोष करून या निर्णयाचे स्वागत केले आहे,