अलिबाग– राजकारणात कधी कोणाचा कायम शत्रु नसतो आणि मित्रही नसतो म्हणतात. याची प्रचिती सध्या रायगडकरांना येत आहे. गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेला शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील संघर्ष अखेर संपुष्टात आला आहे. एकमेकांविरोधात आक्रमक होणारे, शाब्दीक टिकाटीप्पण्या करणारे नेते, पुन्हा एकाच व्यासपिठावर दिसू लागले आहेत. त्यामुळे जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा तिढाही सुटणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे

विधानसभा निवडणुकीपासून रायगड जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील वाद विकोपाला गेले होते. कर्जत विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुधाकर घारे यांनी केलेली बंडखोरीमुळे या वादाची ठिणगी पडली होती. लोकसभा निवडणुकीत तटकरे यांना निवडून आणण्यात शिवसेना आमदारांनी महत्वाची भूमिका बजावली होती. मात्र विधानसभा निवडणकीत तटकरे यांच्याकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नाही, उलट शिवसेना आमदार कसे पडतील यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप आमदार महेंद्र दळवी आणि मंत्री भरत गोगावले यांनी केला होता. त्यामुळे दोन्ही पक्षातील तणाव कमालीचा वाढला होता. याच वादातून शिवसेना आमदारांनी आदिती तटकरे यांना पालकमंत्री पद देण्यास विरोध केला होता. शिवसेना आमदारांच्या विरोधामुळे आदिती तटकरे यांच्या पालकमंत्री पदी झालेल्या नियुक्तीला २४ तासांच्या आत स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे दोन्ही पक्षातील वाद विकोपाला गेले होते.

दोन्ही पक्षातील वादावर पडदा का पडला ?

दोन्ही पक्षातील वाद विकोपाला गेले होते. नगरपालिका निवडणुकीदरम्यान हा वाद जास्तच चिघळला होता. खोपोली येथे मंगेळ काळोखे हत्या प्रकरणाला दोन्ही पक्षातील वादाची किनार होती. महाड नगरापालिका निवडणुकीदरम्यान दोन्ही पक्षातील कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते. प्रकरण बंदूक रोखण्यापर्यंत गेले होते. मंत्री गोगावले यांच्या मूलाला या प्रकरणी अटकही झाली होती. जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एकमेकांविरोधात त्वेशाने लढले होते. त्यामुळे दोन्ही पक्षातीलतणाव वाढला होता. पण निवडणुकीनंतर दोन्ही पक्षातील वादावर अचानक पडदा पडला.

जिल्हा परिषदेत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने केली होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत शिवसेनेला सोबत घेऊन सत्ता स्थापनेचे आदेश दिले. आणि रायगड जिल्हा परिषदेवर शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी कांग्रेस महायुतीची सत्ता स्थापन झाली. यामुळे महायुतीमधील अंतर्गत वादांवर पडदा पडला.

पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल का ?

जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते पहिल्यांदाच एकत्र आले. त्यानंतर दोन्ही पक्षांमधील तणाव निवळण्यास सुरूवात झाली. रायगड जिल्ह्याची दिशा समितीची बैठक नुकतीच मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थित पार पडली. या बैठकीला खासदार सुनील तटकरे आणि शिवसेना आमदार महेंद्र दळवी एकत्र दिसले. यानंतर अलिबाग येथे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती नवनियुक्त सदस्यांसाठी आयोजीत कार्यशाळेला आदिती तटकरे, सुनील तटकरे आणि महेंद्र दळवी पुन्हा एकदा एकत्र पहायला मिळाले.

आमदार महेंद्र थोरवे यांनी एका कार्यक्रमात खासदार तटकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी असलेले वाद संपुष्टात आले असल्याचे जाहीर केले. त्यामुळे एकमेकांविरोधात आक्रमक झालेल्या दोन्ही पक्षातील तणाव निवळत असल्याची चिन्ह दिसू लागली आहे. त्यामुळे पालकमंत्री पदाचा तिढाही लवकरच सुटण्याची चिन्ह दिसत आहेत. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री लवकरच घेतील असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे शिवसेना आमदारांनी आदिती तटकरे यांच्या विरोधातील तलवार म्यान केल्याचे संकेत मिळत आहेत.