आमदारांपाठोपाठ रायगड जिल्ह्यातील शिवसेना पक्ष संघटनाही फुटीच्या उंबरठ्यावर आली आहे. कार्यकर्ते आणि पदाधिकारी बंडखोर आमदारांच्यासोबत जाण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या मनधरणीला बंडखोर आमदारांना चांगले यश मिळताना दिसत आहे. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे आणि महाडचे आमदार भरत गोगावले हे शिवसेनेचे तीनही आमदार एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले आहेत. मतदारसंघात परतल्यानंतर तिघांनीही कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या मनधरणीला सुरूवात केली आहे. त्याला यशही मिळताना दिसत आहे.

हेही वाचा- शरद पवारांकडून मराठवाड्यातील कार्यकर्त्यांसमवेत संवादाची साखरपेरणी

महाड पोलादपूर मतदारसंघातील बहुतांश पदाधिकाऱी आणि कार्यकर्ते हे भरत गोगावले यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. गोगावले यांनी महाड, पोलादपूर आणि माणगाव मधील निजामपूर येथील कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांना बंडामागील पार्श्वभूमी समजवून सांगितली. यानंतर बहुतांश पदाधिकाऱ्यांनी गोगावले यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला. राजीव साबळे, प्रमोद घोसाळकर यांच्यासारखे दुसऱ्या फळीतील नेते गोगावले यांच्या गटात सहभागी झाले आहेत.

कर्जत खालापूर मधील अनेक पदाधिकारी आमदार महेंद्र थोरवे यांच्या गटात सहभागी होण्यास सुरूवात झाली आहे. या पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे देण्याचे सत्र सुरु केले आहे. कर्जत विधानसभा संघटक संतोष भोईर आणि संपर्कप्रमुख पंकज पाटील, आणि खोपोली उपशहरप्रमुख संतोष महाडिक यांनी थोरवे यांचे समर्थन करत आपल्या पदाचे राजीनामा दिले आहेत. खोपोली शहर संघटक प्रिया जाधव आणि सुरेखा खेडकर यादेखील आपल्या पदाचे राजीनामे देत थोरवे गटात सहभागी झाल्या आहेत.

हेही वाचा- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रादेशिक प्रभारींची बैठक, कट्टरतावादावर झाली चर्चा

अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी मतदारसंघात भेट देण्यास सुरूवात केली आहे. गावागावातील कार्यकर्त्यांशी ते थेट संवाद साधत आहेत. माजी तालुका प्रमुख राजा केणी, माजी शहर प्रमुख सुशील पाटील, मुन्ना कोटीयन, संतोष निगडे यांनी उघडपणे आमदारांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. तर काही पदाधिकाऱ्यांनी उघड पाठिंबा देण्याचे टाळले आहे. एकूणच तिन्ही आमदारांच्या बंडानंतर जिल्ह्यात शिवसेनेची पक्ष संघटना फुटीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचली आहे.

गेल्या काही वर्षात जिल्ह्यात शिवसेनेचे संघटन मजबूत होत असल्याचे दिसून आले होते. गेल्या जिल्हा परिषद निवडणूकीत शिवसेनेचे १८ सदस्य निवडून आले होते. मुरुड, माथेरान नगरपालिकाही शिवसेनेनी जिंकल्या होत्या. तर खोलापूर, माणगाव, पोलादपूर नगर पंचायती शिवसेनेनी ताब्यात घेतल्या होत्या. आमदारांच्या बंडामुळे शिवसेनेची जिल्ह्यातील ताकद क्षीण होण्याची शक्यता आहे. याचा सर्वाधिक फायदा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकापला होऊ शकणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर तीनही आमदार ही परिस्थिती कशी हाताळतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.