अलिबाग- कर्जत .येथील टोरंट पॉवर प्रकल्पावरून आता रायगड जिल्ह्यात राजकीय वादाचे फटाके फुटण्यास सुरवात झाली आहे. या मुद्द्यावरून महायुतील सत्ताधारी पक्षातच प्रकल्पावरून वादाची ठिणगी पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनी प्रकल्पाविरोधात भूमिका घेतल्याने, संतापलेल्या शिवसेना शिंदे गटाने प्रकल्पाला विरोध करायचा असेल तर सत्तेतून बाहेर पडा असा शिवसेना नेते राष्ट्रवादी काँग्रेसला देऊ लागले आहेत.

कर्जत येथील टोरंट पॉवर प्रकल्पावरून तसेच प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या वनजमिनींवरील वृक्षतोडीवरून पर्यावरण वादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. विरोधी पक्षांनी या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षांना घेरण्यास सुरूवात केली आहे. अशातच सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसनी या प्रकल्पाला पक्षाचा विरोध असल्याचे जाहीर केले होते. जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी प्रकल्पाला पक्षाचा विरोध असून स्थानिकांच्या पाठीशी पक्ष ठामपणे उभे राहणाऱ असल्याचे जाहीर केले आहे.

मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या या भूमिकेमुळे महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. शिवसेना शिंदे गटाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकल्प विरोधी भूमिकेवरून संताप व्यक्त केला आहे. सत्तेत राहून सत्तेचे फायदे घ्यायचे आणि राज्यसरकारच्या प्रकल्पाला विरोध करायचा ही दुट्टप्पी भूमिका आहे. प्रकल्पाला विरोध करायचा असेल तर सत्तेतून बाहेर पडा असा थेट सल्ला शिवसेना शिंदे गटाचे स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लगावला आहे.

तर आमदार महेंद्र थोरवे यांना त्यांच्याच मतदारसंघातील लोकं फारशी गांभिर्याने घेत नाहीत, त्यामुळे त्यांच्या वक्तव्यांना किती गांभीर्याने घ्यावे हा मुद्दाच आहे. ते कधी घोड्यावर असतात तर कधी गाढवावर त्यामुळे त्यांच्या वक्तव्यांना फारसे गांभीर्याचे घ्यायला नको असे म्हणत आमदार अनिकेत तटकरे यांनी थोरवे यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे.

एकीकडे शिवसेना शिंदे गट टोरंट पॉवर प्रकल्पाची पाठराखण करतांना दिसत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस प्रकल्पाविरोधात मैदानात उतरली आहे. त्यामुळे त्यामुळे टोरंट प्रकल्पावरून सत्ताधारी पक्षातच बेबनाव असल्याचे दिसून येत आहे. दिवाळीच्या आधीच प्रकल्पावरून सत्ताधारी पक्षात राजकीय फटाके वाजण्यास सुरूवात झाल्याने, रायगडकरांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.