अलिबाग– रायगड जिल्हा परिषदेतील सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या शिंदेच्या शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते प्रयत्नशील आहेत. मात्र जिल्हा परिषदेत शिवसेनेलाही सत्तेत वाटा मिळावा यासाठी शिंदे गटाचे आमदार आग्रही आहेत. यासाठी भाजपच्या वरीष्ठ नेत्यांशी बैठकांचे सत्र सुरू असल्याची खात्रीलायक वृत्त आहे.

रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी येत्या १२ मार्चला विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे सत्तास्थापनेच्या हालचालीनी वेग घेतला आहे. शिंदेच्या शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी स्थानिक भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आग्रही असले तरी, शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर युतीसाठी आग्रह धरून दबाव टाकला जात आहे.

भरत गोगवले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन यात हस्तक्षेप करण्याची विनंती केली. नंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या समवेत शिवसेनेच्या नेत्यांची बैठक झाली. विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्या दालनातही शिवसेना आणि भाजप नेत्यांची जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेसाठी चर्चा झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. महायुतीमधील तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करावी यासाठी प्रयत्न करण्यात आले. तिनही पक्षांना दीड वर्ष जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी देण्याबाबत पर्याय यावेळी समोर ठेवण्यात आला.

भाजप आणि राष्ट्रवादीकडून या वृत्ताला दूजोरा देण्यात आला नसला तरी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी चर्चा सूरू असल्याचे स्पष्ट केले आहे. रोजगार हमी आणि फलोत्पादन भरत गोगावले यांनी जिल्हा परिषदेत सत्तेत तिन्ही पक्ष एकत्र यावेत यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे म्हटले आहे. जिल्हा परिषदेच्या सत्तेत आम्ही सहभागी होऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तर जिल्हा परिषदेत महायुती होईल आणि शिवसेनेचाच अध्यक्ष बसेल असा आशावाद आमदार महेंद्र दळवी यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे सत्तासहभाग निश्चित करण्यासाठी शिवसेना नेत्यांकडून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्षस्थ नेत्यांची मनधरणी सुरू असल्याचे दिसून येत आहे.  

भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस सदस्य गोवातून रायगडला परतले. जिल्हा परिषद निवडणूकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे नवनिर्वाचीत सदस्य स्वतंत्र गटस्थापना करून गोव्यात कँम्पवर गेले होते. सत्ता स्थापनेची बोलणी निर्विघ्नपणे व्हावी आणि  शिवसेने शिंदे गटाकडून सदस्यांची पळवापळवी होऊ नये यासाठी दोन्ही पक्षांनी खबरदारी घेतली होती. मात्र जवळपास दोन आठवडे गोव्यात राहिल्यानंतर दोन्ही पक्षाचे सदस्य होळी सणाच्या आधी रायगडमध्ये परतले आहेत.