अलिबाग- राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रु नसतो आणि मित्रही नसतो असे म्हणतात. रायगड जिल्ह्यात सध्या याचाच प्रत्यय येतो आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निमित्ताने युती आणि आघाडीची नवनविन समिकरणे जिल्ह्यात पहायला मिळत आहे. स्थानिक पातळीवर आपआपले अस्तित्व कायम राखण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी सोयीस्कर आघाडीची भूमिका स्विकारली असल्याचे दिसून येत आहे.

रायगड जिल्हा परिषदेवर शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता होती. आता मात्र ही आघाडी संपुष्टात आली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांनी स्थानिक पातळ्यांवर नव्या सहकाऱ्यांची मदत घेतली आहे. जिल्ह्यात स्वबळावर निवडणूक जिंकून एकहाती सत्ता मिळवण्याची ताकद एकाही राजकीय पक्षाकडे नाही. त्यामुळे युती आणि आघाडीचे राजकारण ही सर्वपक्षांची गरज आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर सोयीस्कर भूमिका घेऊन जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न सर्वच पक्षांचा असणार आहे. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही महायुतीमधील प्रमुख घटक पक्षा एकाच जिल्ह्यात दोन विभागात वेगवेगळ्या पक्षांसोबत युतीकरून निवडणुकीत उतरले आहेत.

युती आघाडीचे सोयीस्कर प्रारुप रायगडला नवा नाही. यापूर्वी जिल्हा परिषदेत अशा वेगवेगळ्या आघाड्या पाहायला मिळाल्या होत्या. १९९२ नंतर जिल्हा परिषदेवर कोणालाही स्पष्ट बहुमत मिळालेल नाही. त्यामुळे बेरजेचे राजकारण करतांना सर्वच राजकीय पक्षांनी लवचिक धोरण स्विकारले असल्याचे दिसून येत आहे. यातुनच सोयीस्कर आघाड्यांचा रायगड पॅटर्न समोर आला आहे. यातील कुठले युती आघाडीचे प्रारुप मतदार स्विकारणार हे ७ तारेखेच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

महत्वाची बाब म्हणजे सत्तेच्या राजकारणाचा बेरजेचे गणित मांडतांना पुरोगामित्व, समाजवाद, हिंदूत्व, धर्मनिरपेक्षता या मुद्दे बाजूला ठेऊन सोयीस्कर आघाडीची करण्याची भूमिका सर्वच राजकीय पक्षांनी घेतली आहे. मात्र राजकीय समिकरणांची गुंतागुत समजुन घेण्यात मतदारांना मात्र तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

उत्तर रायगड मधील युती आघाडीचे समीकरण .

कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात नगरपालिका निवडणुकी प्रमाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने शिवसेना ठाकरे गटाशी जुळवून घेतले आहे. या ठिकाणी भाजप शिवसेना शिंदे गट त्यांच्या विरोधात युती करून निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

दक्षिण रायगड मधील युती आघाडीची समीकरणे कशी…

उत्तर रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना ठाकरे गटाशी युती केली असली तरी दक्षिण रायगड मधील महाड पोलादपूर मतदारसंघात दोन्ही पक्ष एकत्र आलेले नाही. या विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेने भाजप सोबत युती केली आहे. तर शिवसेना शिंदे गट आणि शेतकरी कामगार पक्ष या ठिकाणी एकत्र आले आहेत.

अलिबाग पेण विधानसभा मतदारसंघातील राजकीय चित्र

अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघात शिवसेना आणि भाजप अशी युती व्हावी यासाठी स्थानिक नेते आग्रही होते. तशा बैठकाही झाल्या, पण भाजपच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने बोलणी फिसकटली. त्यामुळे शिवसेना भाजपने एकमेकांविरोधात आपले उमेदवार कायम ठेवले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची युती असली तरी घोसाळे आणि शहापूर या दोन जिल्हा परिषद मतदारसंघात दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. पेण विधानसभा मतदारसंघातील शिहू आणि नागोठणे या दोन मतदारसंघात दोन्ही शिवसेना एकत्र आल्या आहेत.