अलिबाग– रायगड जिल्हा परिषद निवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील संबध ताणले गेले आहेत. त्यामुळे शिंदेची शिवसेना एकाकी पडल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या शिवसेना शिंदे गटाता सत्तेपासून दूर ठेवण्याची रणनिती राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने आखली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केला नाही तर शिवसेना शिंदे गटाला विरोधी पक्षात बसावे लागण्याची शक्यता आहे.

महायुतीत एकत्र असूनही शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी कांग्रेस यांच्यात पराकोटीचे वाद होते. त्यामुळे स्थानिक पातळीवर दोन्ही पक्ष एकत्र येण्याची सुतराम शक्यता नव्हती. भाजप आणि शिवसना शिंदे गटात कुठलेही वाद नव्हते, जिल्हा परिषद निवडणुकीतनंतर भाजप नेते शिवसेना शिंदे गटाच्या विरोधात गेले आहेत. यापुढे शिवसेनेची साथ नकोच अशी भूमिका अनेक नेत्यांकडून बोलून दाखवली जात आहेत. अलिबाग पेण विधानसभा मतदारसंघातील सत्तासंघर्ष यास कारणीभूत ठरला आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीत अलिबाग आणि पेण विधानसभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती व्हावी यासाठी भाजपनेते आग्रही होते. अलिबाग मतदारसंघात किमान तीन ते चार जिल्हा परिषदेच्या जागा मिळाव्या अशी मागणी भाजपनेत्यांनी केली होती. पण शिवसेनेनी शेवटपर्यंत जागा सोडल्या नाहीत. पक्षाची मते आहेत कुठे म्हणून हा प्रस्ताव धुडकावून लावला. पेण विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाने भाजपकडे दोन जागांची मागणी केली. भाजपने ती फेटाळून लावली. त्यांमुळे दोन्ही पक्षांमधील संबध ताणले गेले. सुधागड तालुक्यातील शिवसेनेचा एक संभाव्य उमेदवार भाजपने पळवला. त्यामुळे शिवसेनेला आयत्यावेळी दुसऱा उमेदवार देण्याची वेळ आली.

त्यामुळे दोन्ही पक्ष अलिबाग आणि पेण विधानसभा मतदारसंघात एकमेकांविरोधात लढले, यात भाजपच्या पाच प्रमुख उमेदवारांचा पराभव झाला. भाजपचे जिल्हाध्यक्ष खासदार धैर्यशील पाटील यांच्या पत्नी निलिमा पाटील शिवसेनेच्या उमेदवाराने पराभव केला. शेकापमधून भाजप मध्ये आलेल्या पाटील कुटूंबातील चित्रा पाटील, भावना पाटील, सवाई पाटील यांचाही शिवसेना उमेदवारांनी पराभव केला, आमदार रविशेठ पाटील यांच्या सूनेलाही शिवसेनेच्या उमेदवारामुळे पाराभूत व्हावे लागले, माजी जिल्हाध्यक्ष महेश मोहीते यांच्या पत्नीचाही शिवसेना उमेदवारांनी पराभव केला. निवडणूकीतील हे पराभव भाजप नेत्यांच्या जिव्हारी लागले.

प्रस्थापित नेत्यांच्या कुटूंबियांना शिवसेनेच्या नवख्या उमेदवारांनी धुळ चारली. त्यामुळे निवडणुकीनंतर भाजप नेत्यांमध्ये शिवसेना शिंदे गटाबाबत नाराजी निर्माण झाली. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी जाणिव पूर्वक भाजप उमेदवारांना पाडल्या आरोप भाजप नेत्यांनी केला. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये कमालीचा दूरावा आल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. सेना भाजप मधील या दुराव्याची संधी ओळखून प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी भाजप सोबत जुळवून घेतले आहे.

जिल्हा परिषदेत भाजप सोबत युती करून सत्ता स्थापन करणार असल्याचेही तटकरे यांनी जाहीर केले आहे. तर भाजप नेत्यांकडून यापुढे शिवसेनेसोबत युती करणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे सर्वाधिक जागा जिंकूनही जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट एकाकी पडल्याचे चित्र आहे.

जिल्हा परिषदेत शिवसेना आणि भाजप युती व्हावी यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केले. पण शिवसेनेनी नेत्यांनी प्रतिसाद दिला नाही. आम्ही स्वबळावर लढलो. पक्षाचे उमेदवार निवडून आले नाहीत. पण त्यांना ४२ हजार मते पडली. त्यामुळे पक्षाची ताकद कळली. त्यामुळे आता शिवसेनेशी जुळवून घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जिल्हा परिषदेत भाजपचाच अध्यक्ष बसणार. – आस्वाद पाटील, भाजप नेते.