राज ठाकरेंचा अयोध्या दौरा आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यानंतर

राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित झाल्यानंतर त्यावरून तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

raj thackeray ayodhya visit aaditya thackeray
राज ठाकरेंचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित!

संजय बापट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ५ जूनचा आपला बहुचर्चित अयोध्या दौरा शुक्रवारी तुर्तास स्थगित केला. प्रकृतीच्या कारणास्तव ठाकरे यांनी अयोध्या दौरा स्थगित केल्याचे मनसेकडून सांगितले जात असले तरी उत्तर प्रदेशातील भाजप खासदाराचा आक्रमक विरोध आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यात शिवेसनेकडून होणारे शक्तीप्रदर्शन या पार्श्वभूमीवर राज यांनी हा दौरा स्थगित केला असून आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यानंतर राज ठाकरे दौरा करणार असल्याचे मनसेतील सूत्रांनी सांगितले.

उघडपणे हिंदुत्वाचा पुरस्कार करीत मशिदींवरील भोंगे उतरिवण्याची केलेली मागणी आणि उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या भाजप सरकारच्या कारभाराचे कौतुक यामुळे राज ठाकरे भाजपचा अजेंडा चालवित असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून होत आहे. या वातावरणात राज ठाकरे यांनी ५ जून रोजी अयोध्याला जाण्याची घोषणा केली होती. या दौऱ्याच्या माध्यमातून अयोध्येत जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली होती. त्यासाठी मुंबई,ठाणे, पुणे, नाशिक आदी ठिकाणाहून खास अयोध्येसाठी रेल्वेगाड्यातून कार्यकर्ते जाणार होते. त्यासाठी मनसेकडून जोरदार नोंदणी अभियान सुरू करण्यात आले होते. मात्र उत्तर भारतीयांना केलेल्या मारहाण प्रकरणी माफी मागितल्याशिवाय राज ठाकरे यांना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही असा इशारा देत भाजपाचे गोंडाचे खासदार ब्रिज भूषण शरण सिंग यांनी ठाकरे यांच्या या दौऱ्यास कडवा विरोध केला.

राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यास समर्थन दिले असले तरी उत्तर प्रदेशातून भाजपाचा कोणताही नेता राज यांच्या समर्थनार्थ पुढे आलेला नाही. त्यातच राज यांच्या दौऱ्यानंतर म्हणजे १५ जून रोजी राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा होणार आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून अयोध्येत राज ठाकरे यांच्यापेक्षा मोठे शक्तीप्रदर्शन करून राज यांना प्रत्युत्तर देण्याची तयारी शिवसनेने सुरू केली होती. त्यामुळे दुहेरी कोंडीत सापडलेल्या राज ठाकरे यांनी आपला दौराच तूर्तास स्थगित केल्याची घोषणा केली आहे. अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करीत असून रविवारी पुण्यात गणेश कला क्रीडा केंद्रात होणाऱ्या सभेत यावर सविस्तर बोलणार असल्याचे राज ठाकरे यांनी ट्वीटच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे.

प्रकृतीच्या कारणास्तव दोनच दिवसांपूर्वी राज ठाकरे पुण्याचा दौरा अर्धवट सोडून मुंबईत परतले होते. एकीकडे राज्यात मनसेशी जवळीक तर उत्तर प्रदेशात विरोधाची भूमिका घेत भाजपाने मुंबईत उत्तर भारतीयांना खुश करण्याची खेळलेली चाल राज ठाकरे यांच्यासाठी मात्र अडचणीची ठरली असून पुण्याच्या सभेत ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज ठाकरे यांच्या पुणे दौरा आणि सभेबद्दलही असे संभ्रमाचे वातावरण होते. सुरुवातीस नदी पात्रातच सभा होईल, असे जाहीर केले होते. आता अखेरीस ठिकाण बदलण्यात आले असून गणेश कला क्रीडा केंद्रात सभा होणार आहे. मनसेच्या भूमिकांबद्दल संभ्रम आणि बदल यांची परंपराच असल्याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे. याहीपूर्वी लोकसभा निवडणुकांप्रसंगी राज ठाकरे यांनी भाजपाच्या विरोधातील भूमिका घेतली होती. किंबहुना निवडणुका जिंकण्यासाठी हे दंगलीही पेटवतील, अशी शक्यताही व्यक्त केली होती. आता मात्र त्यांनी घुमजाव केले असून थेट भोंगा- हनुमानचालिसा असे करत भाजपशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मनसेच्या भूमिकेत सातत्य राहिलेले नाही, अशी टीका होते आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Raj thackeray ayodhya visit postponed aaditya thackeray shivsena pmw

Next Story
ऊस उत्पादकांच्या आत्महत्यांना राजकीय वळण
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी