मुंबई : महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनात आपण स्वतः लक्ष घालून त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे आणि त्यावर तोडगा काढावा, अशी विनंती मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली असली तरी या पत्राच्या माध्यमातून ठाकरे यांनी जुने हिशेब चुकते केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपट्टूंनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. सिंह यांच्यावर कारवाईची मागणी करीत महिला कुस्तीपट्टू गेल्या महिनाभरापासून दिल्लीत जंतर मंतर येथे आंदोलन करत होत्या. मात्र २८ मे रोजी दिल्ली पोलिसांनी बळाचा वापर करीत आंदोलनकर्त्यांना तेथून हुसकावून लावले. त्यावरून देशात संताप व्यक्त होत असतानाच ठाकरे यांनीही या आंदोलनाला पाठिंबा देत कुस्तीगर संघटनेच्या अध्यक्षांच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे.

हेही वाचा – ‘माधव’च्या प्रयोगाचेच भाजपकडून अनुकरण

ठाकरे यांनी मोदी यांना पाठविलेल्या पत्रात, ज्यांचा गौरव आपण ‘देश की बेटियाँ’ असा करत आलो आहोत आणि ज्यांच्या श्रमातून देशाला कुस्तीच्या खेळात अनेक पदकं बघायला मिळाली आहेत, त्या महिला कुस्तीपटू गेले कित्येक दिवस त्यांच्या मागण्यांसाठी दिल्लीत आक्रोश करत आहेत. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या (कुस्ती महासंघ) अध्यक्षांनी त्यांचा लैंगिक छळ केल्याची तक्रार आहे. अशा परिस्थितीत आपल्याला न्याय मिळावा आणि या लढाईत कोणाच्याही ‘बाहुबला’चं दडपण किंवा अडथळा येणार नाही इतकीच खात्री त्यांना सरकारकडून अर्थात आपल्याकडून हवी आहे, असे ठाकरे यांनी पत्रात नमूद केले आहे.

हेही वाचा – अरविंद केजरीवाल कठोर हिंदुत्ववादी; असदुद्दीन ओवैसी यांनी आपला पाठिंबा देण्यास केला विरोध

गेल्या वर्षी राज ठाकरे हे अयोध्येचा दौरा करणार होते. तेव्हा ठाकरे यांनी मुंबईत हिंदी भाषकांच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेच्या निषेधार्थ ठाकरे यांना अयोध्येत पाय ठवून देणार नाही, असा इशारा भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांनीच दिला होता. या इशाऱ्यानंतर राज ठाकरे यांना अयोध्या दौरा रद्द करावा लागला होता. पुढे सिंह यांचा ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यास विरोध मावळला असला तरी एरव्ही कधीही माघार न घेण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या राज ठाकरे यांना दौरा स्थगित करावा लागल्याने मनसेमध्ये सिंह यांच्या विरोधात संतप्त भावना होतीत. सिंह लैंगिक छळाच्या आरोपांवरून वादग्रस्त ठरले आहेत. सिंह यांच्यावर आरोप सुरू होताच राज ठाकरे यांनी त्यांच्या विरोधात कारवाईची मागणी करीत जुने हिशेब चुकते केले आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray has supported the wrestlers protest and demanded action against wfi chief print politics news ssb
First published on: 01-06-2023 at 10:57 IST