पुणे : लोकसभा, विधानसभा, महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये अपेक्षित यश मिळू न शकल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे हे नाराज झाले असून, पुण्यात पक्षाला उर्जितावस्था आणण्यासाठी आता नवीन आराखडा तयार केला जाणार आहे. त्यानुसार आगामी काळात पक्षांतर्गत बदलांसह पुणेकरांच्या जिव्हाळ्याचे विषय हाती घेवून मूळ रुपातील आक्रमक मनसे दिसणार आहे.
महापालिका निवडणुकीत पुण्यात मनसेला एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे राज ठाकरे हे नाराज झाले. त्यांनी अनेक वर्षांपासून पदावर असलेल्या नेत्यांना फैलावर घेतले. सोमवारी ठाकरे यांनी पुण्यात पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यामध्येही त्यांनी नाराजी दर्शविली. महापालिकेत शिवसेनेबरोबर युती करूनही यश का मिळाले का नाही, याबाबत त्यांनी विचारणा केली. तसेच पुण्यासह, नाशिक आणि मुंबईसाठी नवीन आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांना सांगितले.
दर आठवड्याला पक्षाच्या कामकाजाचा आढावा घेतला जाणार असल्याचे सांगत त्यांनी बैठक आटोपती घेतली. मात्र, नवीन आराखड्यानुसार पक्ष आता नागरिकांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे आगामी काळात मनसे पुन्हा ‘खळखट्याक’च्या भूमिकेत पहायला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पक्षांतर्गत बदलाच्या हालचाली?
पुणे महापालिका निवडणुकीत एकही जागा मिळाली नसल्याने वर्षानुवर्षे पदांवर असलेल्या पदाधिकाऱ्यांना बदलून नव्या चेहऱ्यांना संधी देवून पक्षवाढीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. पुणे महापालिकेच्या निवडणुकीत मनसेने शिवसेना (ठाकरे) पक्षाबरोबर युती केली. काँग्रेसने मनसेबरोबर आघाडी करण्यास विरोध केल्याने शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या कोट्यातून मनसेला ४४ जागा देण्यात आल्या. मात्र, एकाही जागेवर मनसेला यश मिळाले नाही.
मनसेला शून्य, शिवसेना (ठाकरे) पक्षाला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. उमेदवार निश्चित करताना चुकीचे निर्णय, निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांना डावलणे, काही ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी स्वत: उमेदवारी घेणे, यांसारखे प्रकार महापालिका निवडणुकीत झाल्याने मनसेला एकाही जागेवर विजय मिळवता आला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पक्षांतर्गत नाराजी वाढली आहे.
पुण्यात मनसेला उतरती कळा लागली आहे. २००७ निवडणुकीत आठ, त्यानंतरच्या २०१२ च्या निवडणुकीत मनसेचे २९ नगरसेवक निवडून आले. २०१७ मध्ये दोन आणि आता शून्य अशी या पक्षाची स्थिती झाली आहे. याची गांभीर्याने दखल राज ठाकरे यांनी घेतली आहे. त्यामुळे आता पक्षांतर्गत बदल केले जाणार आहेत. जुने पदाधिकारी बदलून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे; तसेच पुणेकरांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे भूमिका मांडण्यात येणार असल्याने मनसे पुन्हा एकदा ‘खळखट्याक’ करणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

