आजच्या महत्वाच्या राजकीय बातम्या : लोकशाही बचाव, अराजकता हटाव पदयात्रेवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधारी भाजपाला चांगलेच खडेबोल सुनावले… राज्य सरकारने शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या अग्रीम मदतीवर टीका करणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले… एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा पक्ष अमित शाहाच संपवणार असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली… अभिनेत्री दिया मिर्झा यांच्यावरील टीकेवरून मुंबई उच्च न्यायालयाने भाजपा नेत्यांचे नाव न घेता संताप व्यक्त केला… पूर्णेकर हत्या प्रकरणात उपमुख्यमंत्री शिंदे यांची प्रतिमा मलीन करण्याचा विरोधकांचा कट असल्याची टीका मीनाक्षी शिंदे यांनी केली… या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

राज ठाकरेंनी भाजपाला सुनावलं

भाजपाच्या नेतृत्त्वाखाली महायुतीच्या वतीने सोमवारी मुंबईत लोकशाही बचाव, अराजकता हटाव ही पदयात्रा काढली होती. या पदयात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीतील अनेक मंत्री तसेच नेते सहभागी झाले होते. काँग्रेसकडून घटनात्मक संस्थांवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून जनतेचा विश्वास डळमळी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका सत्ताधाऱ्यांनी केली. दरम्यान या पदयात्रेवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपाला चांगलेच खडेबोल सुनावले आहे. तुम्ही सत्तेत आहात, मग मोर्चे कसले काढताय, असा संतप्त सवाल राज यांनी पुण्यातील एका कार्यक्रमातून उपस्थित केला. तसेच फक्त सत्ता येऊन चालत नाही. सत्ता अंगात असावी लागते. भाजपा अजून विरोधी पक्षाच्या मानसिकतेतून बाहेर पडला नाही, असे राज म्हणाले. भाजपाने लोकशाही वाचवा असे सांगणे म्हणजे म्हाताऱ्याला कोंबड्या वाचवायचे सांगण्यासारखे आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

फडणवीसांची विरोधकांवर टीका

राज्य सरकारने शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या अग्रीम मदतीवर टीका करणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत ही महायुतीच्या सरकारनेच केलेली आहे. यापूर्वीच्या सरकारांनी केवळ तोंडाला पाने पुसण्याचे काम केले. तेच आता तोंड उघडून बोलतायत. पण, ते काहीही बोलले तरी, आम्ही शेतकऱ्यांना मदत करू,’ असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोच्या लोकार्पण सोहळ्यानंतर फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रीम रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे आहे. ज्यांना मोठमोठ्या गाड्यांमध्ये फिरण्याची आणि मोठमोठ्या घरांमध्ये राहण्याची सवय आहे, त्यांना पाच हजार रुपयांचे महत्व कळूच शकत नाही. त्याचे महत्त्व फक्त शेतकऱ्यांनाच कळते, असेही फडणवीस म्हणाले.

“शिंदे-पवारांचा पक्ष अमित शाह संपवणार”

एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा पक्ष अमित शाहाच संपवणार, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना राऊत म्हणाले की, अमित शाह यांनी महाराष्ट्राला दुबळे करण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन गट निर्माण केले आहेत. मात्र, हे दोन्ही गट काही दिवसांतच नष्ट होतील. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांचा पक्ष अनाथ झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसवर शरद पवार यांचाच अधिकार आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे लोकशाही बचाव म्हणून फिरत असतात, अशी टीकाही राऊत यांनी महायुतीच्या पदयात्रेवर केली. एकनाथ शिंदे त्यांच्याकडे असलेली शिवसेना हीच मोठी लोकशाहीची हत्या आहे, असा संतापही राऊत यांनी व्यक्त केला. त्यांच्या या टीकेला आता भाजपाकडून काय प्रत्युत्तर दिले जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

उच्च न्यायालयाने भाजपा नेत्यांना फटकारले

दिवाळीत कोणत्याही वेळी आणि कुठेही फटाके वाजवून ध्वनी व हवा प्रदूषण करू नये, असे आवाहन करणाऱ्या अभिनेत्री दिया मिर्झाच्या समाजमाध्यमांवरील चित्रफितीवर भाजपाच्या नेत्यांनी टीका केली होती. त्यावरून मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी भाजपा नेत्यांचे नाव न घेता संताप व्यक्त केला. भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात सार्वजनिक हितासाठी पुढे येणाऱ्या सेलिब्रेटींच्या निवडीला राजकीय नेत्यांकडून जातीय रंग दिला जाणे आणि त्यावरून राजकारण करणे हे दुर्दैवी आणि धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाविरुद्ध असल्याचे खडेबोलही न्यायालयाने सुनावले. त्याचवेळी, कोणत्याही व्यक्तीला सण साजरा करण्यापासून वेगळे ठेवता येणार नाही, असे स्पष्ट करून दिया यांची हटवण्यात आलेली चित्रफित पुन्हा प्रसारित करण्याचे आदेशही न्यायालयाने महापालिका प्रशासनाला दिले. त्यामुळे भाजपाच्या नेत्यांना बसलेली ही चपराक मानली जात आहे.

मीनाक्षी शिंदे यांचा खळबळजनक आरोप

प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गोवण्यासाठी, त्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी काही अघटित घडविण्याचा विरोधकांचा कट असल्याचा खळबळजनक आरोप शिंदे गटाच्या नगरसेविका मीनाक्षी शिंदे यांनी केला. त्यासाठी विरोधी पक्षांतील नेत्यांच्या बैठका सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला. तसेच, राम पूर्णेकर, त्यांचे कुटुंबीय व निकटवर्तीयांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी करणारे पत्र पोलीस आयुक्तांना दिल्याचेही त्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी काढण्यात आलेल्या मोर्चात आदित्य ठाकरे यांच्यासोबत काही गुन्हेगारही सहभागी झाले होते, असा गंभीर आरोप त्यांनी केला. प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्याप्रकरणात पूर्णेकर कुटुंबीयांकडून सातत्याने मीनाक्षी शिंदे व त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर आरोप केले जात आहेत. या दोघांच्या अटकेच्या मागणीसाठी पूर्णेकर समर्थकांकडून विविध ठिकाणी आंदोलनेही केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर मीनाक्षी शिंदे यांनीच आता पूर्णेकर कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.