Raj Thackeray Uddhav Thackary Shivaji Park Rally महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अदाणी समूहाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. शिवाजी पार्क येथे आयोजित संयुक्त सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर (भाजपा) अदाणी समूहाच्या फायद्यासाठी जमिनी हडपण्यास मदत केल्याचा आरोप केला. गेल्या १० वर्षांत या उद्योगसमूहाची अभूतपूर्व प्रगती झाली असल्याचा आरोप ठाकरेंनी केला.

त्याला उत्तर देताना भाजपाने राज ठाकरेंचे इतर उद्योजकांबरोबरचे फोटो पोस्ट करीत त्यांच्यावर टीका केली. सोमवारी पार पडलेल्या महायुतीच्या सभेतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली. या संघर्षातून महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांमधील वाढता तणाव स्पष्टपणे दिसून येत आहे. अदाणी समूहाच्या विस्तारावरून राज ठाकरेंनी भाजपावर काय आरोप केले? यावर भाजपाची भूमिका काय? जाणून घेऊयात…

नकाशा दाखवत भाजपावर आरोप

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी गौतम अदाणी यांच्या मुद्द्यावरून भाजपावर टीका केली. भाजपाने उद्योगपती गौतम अदाणी यांचे लाड पुरवले असून, मुंबई, महाराष्ट्र आणि देशभर अदाणी समूहाच्या विस्तारासाठी रस्ता मोकळा करून दिला, असा आरोप ठाकरेंनी केला. राज ठाकरे यांनी ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये रविवारी सभेत दाखवलेल्या नकाशांचा संदर्भ दिला. भाजपा सत्तेत आल्यानंतर कशा प्रकारे पायाभूत सुविधा आणि व्यवसायांचे मोठे प्रकल्प अदानी समूहाच्या पदरात पडले, हे त्या नकाशांतून स्पष्ट होत असल्याचा दावा त्यांनी केला.

मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर दादरच्या शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त सभा पार पडली. जवळपास दोन दशकांनंतर दोन्ही भाऊ पहिल्यांदाच एका व्यासपीठावर एकत्र आले होते. आपल्या भाषणात राज ठाकरेंनी २०१४ आणि २०२५ मधील नकाशे वापरून भाजपाच्या राजवटीत गौतम अदाणींच्या व्यवसायाचा विस्तार प्रचंड वेगाने झाल्याचा आरोप केला. ते म्हणाले, “पूर्वी अदाणींचे मोजकेच प्रकल्प होते; मात्र आता सरकारी पाठबळामुळे हा समूह वीज, सिमेंट, बंदरे, विमानतळ आणि पायाभूत सुविधा अशा सर्वच क्षेत्रांत सक्रिय आहे.”

भाषणादरम्यान काही व्हिडीओ दाखवीत राज ठाकरे म्हणाले, “२०१४ मध्ये गौतम अदाणींचा महाराष्ट्रात फक्त एक प्रकल्प होता. २०२४ पर्यंत त्यांच्याकडे संपूर्ण राज्यात अनेक प्रकल्प उभे राहिले आहेत.” मुंबई महानगर क्षेत्राचा (एमएमआर) उल्लेख करत ते म्हणाले, “एमएमआर क्षेत्रात अदाणी समूहाचा विस्तार नीट पाहा. मुंबई गुजरातऐवजी महाराष्ट्राचा भाग झाल्याचा राग मनात असणाऱ्या काही शक्ती, आता या उद्योगसमूहाच्या आडोशाने मुंबई आणि एमएमआरवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत.”

“विधानसभा निवडणुकीनंतर सरकारला जे हवे होते, ते त्यांनी सुरू केले. त्यांना महाराष्ट्रातील जनतेची पर्वा नव्हती,” असे म्हणत ठाकरेंनी सध्याच्या शासनाची तुलना जुन्या सरकारांशी केली. “भाजपाने अकोटमध्ये एमआयएमबरोबर आणि बदलापूरमध्ये काँग्रेसबरोबर सोईची राजकीय युती केली आणि त्यातून लोकांच्या छाननीशिवाय ६६ उमेदवार निवडून आले,” असा आरोपही त्यांनी केला. “आज ही संख्या ६६ आहे, उद्या ही संख्या वाढेल,” असा इशारा त्यांनी दिला.

भाजपाच्या उमेदवार निवडीवर टीका करताना राज ठाकरे यांनी आरोप केला की, ड्रग रॅकेटशी संबंध असलेल्या विनोद गंगणेंना तुळजापूरमधून तिकीट दिले गेले. तसेच, बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटे यालाही पक्षाने उमेदवारी दिली. ‘अशा लोकांना तिकीट कसे दिले जाऊ शकते’, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. भाजपा मुंबई, महाराष्ट्र आणि देश विकत आहे, असा आरोप करीत त्यांनी मतदारांना याच्यामुळे परिणामांचा गांभीर्याने विचार करण्याचे आवाहन केले. धारावी आणि सायन कोळीवाड्यात प्रचार करताना मुंबईला ‘आंतरराष्ट्रीय शहर’ म्हटल्याबद्दल त्यांनी भाजपा नेते के. अन्नामलाई यांचाही ‘रसमलाई’ असा उल्लेख केला.

राज ठाकरेंच्या या विधानांना प्रेक्षकांकडून मोठी दाद मिळाली. आगामी महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने मुंबईच्या अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शिवाजी पार्कवर राज आणि उद्धव यांचे एकत्र येणे हा महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, २०२६ च्या बीएमसी निवडणुकीआधी राजकीय समीकरणे बदलण्याचे हे संकेत मानले जात आहेत.

भाजपाचे जोरदार प्रत्युत्तर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजी पार्कमधील महायुतीच्या सभेत राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी अदाणींचा वकील नाही. राज ठाकरेंच्या टीकेला ते उत्तर देतीलच. मात्र, २०१४ नंतर देशात केवळ गौतम अदाणीच नव्हे, तर अनेक उद्योगसमूहांचा विकास झाला, त्यांचे उत्पन्न कित्येक पटींनी वाढले, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. फडणवीस म्हणाले, “राज ठाकरे सांगतात की, २०१४ नंतर पंतप्रधान मोदी यांच्यामुळे अदाणींची नेटवर्थ वाढली. मी काही अदाणींचा वकील नाही. पण, एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की, २०१४ साली भारत हा जगातील ११ व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला देश होता. आता २०२६ उजाडेपर्यंत भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे.”

ते पुढे म्हणाले, “साहजिक आहे की, अर्थव्यवस्था वाढली म्हणजे देशभरात अनेक नवे उद्योजक तयार झाले. पंतप्रधान मोदी यांच्यामुळे ज्या कंपन्या यापूर्वी भांडवली बाजारात लिस्टेड होऊ शकल्या नव्हत्या, त्या लिस्टेड झाल्या. देशातील प्रस्थापित उद्योगसमूहांनी प्रचंड विस्तार केला. या प्रत्येकाचे उत्पन्न आणि नफा प्रचंड वाढला.” राज ठाकरे मुंबई आणि महाराष्ट्रात अदाणी समूहाचे अनेक प्रकल्प आल्याचे सांगतात; पण अनेक काँग्रेसशासित राज्यांमध्येही अदाणींचे प्रकल्प आहेत. ते सगळे वेडे आहेत का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

काही वर्षांपूर्वी उद्योगपती गौतम अदाणी यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. गौतम अदाणी स्वत: राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गेले होते. याच भेटीचा दाखला देत भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. त्यांनी या भेटीचे फोटो ‘एक्स’वर शेअर करत “ढोंगी आणि दुटप्पीपणाचा कळस”, असे म्हणत राज ठाकरेंवर हल्ला चढवला आहे.

राज ठाकरेंनी शेअर केलेल्या व्हिडीओत काय? अदाणींना एमएमआर रिजनमध्ये कोणकोणते प्रोजेक्ट मिळाले?

  • २९ जून २०१८ रिलायन्स इंफ्रास्ट्रक्चर ताब्यात, मुंबई वीजपुरवठा क्षेत्रात प्रवेश.
  • एप्रिल २०१९ नवी मुंबई विमानतळाच्या कामाला सुरुवात केली.
  • एप्रिल २०२१ मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ताब्यात.
  • अंधेरी पश्चिम येथील आरटीओची जमीन अदाणी यांना पाच हजार कोटींना देण्यात आली.
  • ऐरोली येथील डेटा सेंटरसाठी ९२ एकर जमीन १५०० कोटींमध्ये.
  • धारावी पुनर्विकास प्रकल्प अदाणींना.
  • महाराष्ट्रात स्मार्ट वीज मीटर बसविण्यासाठी १३,८८८ कोटींचं कंत्राट, भांडुप, कल्याण इथेही मीटर्स बसवणार.
  • मुंबई आणि नवी मुंबईत हायपर स्केल डेटा सेंटर्स उभारणार.
  • महाराष्ट्र सरकारशी ५० हजार कोटींचे सामंजस्य करार.
  • मेट्रो, मोनोरेल यांना अदाणींकडून वीजपुरवठा.
  • सांताक्रुझ आणि विलेपार्ले परिसरात केंद्र सरकारच्या विमान सुरक्षित जागांवर ८० हजार झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास अदाणी करणार.
  • पनवेलमध्ये टॉवर सेमीकंडक्टर कंपनी आणि अदाणी समूह यांच्या प्रकल्पाला महाराष्ट्र सरकारची मान्यता. १० अब्ज डॉलर गुंतवणुकीचा अंदाज.
  • धारावी पुनर्विकास प्रकल्पबाधितांसाठी देवनारमध्ये १२४ एकर जमीन मिळाली.
  • मुंबई उपनगरातील वाढत्या वीज मागणी पुरवठ्यासाठी वसई खाडीजवळील २०९ कांदळवने तोडण्यास अदाणींना मुंबई हायकोर्टाची परवानगी.
  • वांद्रे रेक्लमेशन पुनर्विकास प्रकल्पासाठी २४ एकर जमीन ३० हजार कोटींमध्ये.
  • पालघर डहाणू येथे अदाणी वीज प्रकल्प.
  • वसईत तुंगारेश्वर अभायारण्यातील जमीन अदाणी इलेक्ट्रिसिटीला.
  • वाढवण येथे बंदर उभारण्याबद्दल महाराष्ट्र सरकारशी सामंजस्य करार.
  • वाढवण येथे विमानतळ उभारण्यासाठी अदाणी समूह उत्सुक.