वादग्रस्त विधान करणारे राजन पाटील यांच्या भाजप प्रवेशावर प्रश्नचिन्ह | Rajan Patil's entry into the BJP is now pending due to his Controversial statement | Loksatta

वादग्रस्त विधान करणारे राजन पाटील यांच्या भाजप प्रवेशावर प्रश्नचिन्ह

वादग्रस्त विधान राजन पाटील यांच्यासाठी अडचणीचे ठरले आहे. यातून त्यांच्या संभाव्य भाजप प्रवेशावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

वादग्रस्त विधान करणारे राजन पाटील यांच्या भाजप प्रवेशावर प्रश्नचिन्ह
वादग्रस्त विधान करणारे राजन पाटील यांच्या भाजप प्रवेशावर प्रश्नचिन्ह

एजाज हुसेन मुजावर

सोलापूर : राज्याच्या राजकारणात बेताल विधानांमुळे नेते मंडळी वादग्रस्त ठरत असताना सोलापूर जिल्ह्यातही भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचारात एकमेकांच्या संस्कृतीचे वाभाडे काढण्यात आले. त्याही पुढे जाऊन पाटलांची पोरं लग्नाच्या अगोदरच बाळ जन्माला घालतात, त्याचा सदैव अभिमान वाटतो. पाटलांची पोरं वयाच्या १७ व्या वर्षीच खुनाचे आरोप अंगावर घेतात, अशी वादग्रस्त विधाने करण्यात आली. त्यामुळे ही निवडणूक चांगलीच गाजली तरी आता अशी वादग्रस्त विधाने केलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळ तालुक्यातील प्रस्थापित नेते, माजी आमदार राजन पाटील-अनगरकर यांचा भाजपचा प्रवेशावर त्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हेही वाचा… १९ एकर शेत, अडीच लाखांवर प्रेक्षक क्षमता, १८ सेक्टर अन ११ प्रवेशद्वार ! राहुल गांधींच्या सभेसाठी काँग्रेसकडून ‘दिवसाची रात्र’

मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांच्या समोर मोहोळचे राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील-अनगरकर आणि पंढरपूरचे भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी आव्हान उभे केले होते. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी खासदार महाडिक यांनी खूप प्रयत्न केले. परंतु त्यात यश आले नाही. पाटील व परिचारक यांच्या गटाने दिलेल्या आव्हानामुळे निवडणुकीचे पडघम जोरदारपणे वाजले. कारखान्याच्या सत्तेचे सोपान कोणाला द्यायचे, याचा फैसला एकूण १९ हजार ४३० शेतकरी सभासद मतदारांच्या हाती होता. मतदारांना आपल्या बाजूला वळविण्यासाठी महाडिक व पाटील-परिचारक गटाने ताकद पणाला लावली होती. यात दोन्ही गटांतील सत्ता संघर्ष सर्वानी जवळून अनुभवला.

हेही वाचा… धुळ्यासाठी मंजूर ३० कोटींच्या निधीचे म्हणणे तरी काय ? श्रेयवादावरून एमआयएम विरुध्द भाजप जुगलबंदी

या निवडणुकीत खासदार महाडिक यांच्या बाजूने राजन पाटील यांचे राष्ट्रवादी पक्षांतर्गत शत्रू तथा राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, भाजपचे नेते, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, विजयराज डोंगरे आदी मंडळी झाडून पुढे आली होती. यात एका बाजूला भाजप विरूध्द भाजप आणि राष्ट्रवादी विरूध्द राष्ट्रवादी असे चित्र पाहायला मिळाले असताना दुसरीकडे वादग्रस्त विधानांमुळे प्रचाराची पातळी खाली घसरली. खासदार धनंजय महाडिक यांच्या पूर्वजांनी ४०-५० वर्षांपूर्वी केलेल्या कारनाम्यांचा संदर्भ देताना महाडिक यांच्या वादग्रस्त कार्यसंस्कृतीवर राजन पाटील व परिचारक गटाने बोट ठेवले होते. तर त्यावर प्रत्युत्तर देताना महाडिक यांनी जशास तसे उत्तर दिले.

हेही वाचा… अवंतिका लेकुरवाळे : समाजकारणातून राजकारणात

माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी काही वर्षांपूर्वी भारतीय लष्करातील जवानांच्या कुटुंबीयांविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा संदर्भ देत अशा परिचारक परिवाराने आम्हांला संस्कृती शिकविण्याची गरज नाही, असे भाष्य महाडिक यांनी केले होते. त्यामुळे वातावरण तापले असतानाच शेवटच्या टप्प्यात प्रचार शिगेला पोहोचला, तेव्हा राजन पाटील यांनी आपल्या मुलांच्या कर्तृत्वाविषयी बोलताना आक्षेपार्ह विधान केले. आम्हा पाटलांची पोरं लग्नाच्या आधीच बाळ जन्माला घालतात, त्याही पुढे सांगायचे तर आमच्या मुलांना वयाच्या १७ व्या वर्षात खुनाचे आरोप अंगावर घेण्याचा चांगला अनुभव आला आहे. त्याचा आम्हांला सदैव अभिमान वाटतो. आमच्या मुलांना कोणीही घाबरविण्याचा प्रयत्न करू नये, असे विधान केले. या विधानामुळे राजन पाटील हे अडचणीत आले आहेत.

हेही वाचा… Maharashtra News Live : वाचा राज्यभरातील महत्त्वपूर्ण घडामोडी एकाच क्लिकवर

राजन पाटील हे मोहोळ विधानसभा मतदारसंघातून यापूर्वी १९९५ ते २००९ पर्यंत सलग तीनवेळा निवडून आले होते. नंतर मतदारसंघ राखीव झाल्याने त्यांच्या आमदारकीचा मार्ग रोखला गेला. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह लोकनेते साखर कारखाना व इतर सत्तास्थानांचा दीर्घ अनुभव असलेले राजन पाटील यांच्या कुटुंबीयांवर यापूर्वी त्यांच्या नक्षत्र डिस्टिलरी कारखान्यातील मद्य उत्पादनात शंभर कोटींपेक्षा अधिक अबकारी कर चुकविल्याप्रकरणी फौजदारी कारवाई झाली होती. हे प्रकरण अद्याप प्रलंबित आहे. इतर काही अडचणींशी सामना करीत असतानाच राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी जनता दरबाराच्या नावाखाली राजन पाटील व त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधात एककलमी आक्रमक प्रचार चालविला आहे. उमेश पाटील हे पक्षाचे नेते अजित पवार गटाचे मानले जातात. त्यांना पक्षश्रेष्ठींकडून रोखले जात नाही. त्यामुळे राजन पाटील हे पक्षावर नाराज असून स्वतःच्याही अडचणींचा विचार करता सत्ता संरक्षणासाठी ते अलिकडे भाजपच्या वाटेवर आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्याशी त्यांचा नित्य संपर्क आहे. रणजितसिंह मोहिते-पाटील यांना मंत्रिपद मिळण्यासाठी आपण भाजप श्रेष्ठींकडे वकिली करू, असे विधान राजन पाटील यांनी अलिकडेच केले होते.

हेही वाचा… G20 Summit: परिषदेत आलेले जो बायडेन थेट मोदींच्या दिशेने, हस्तांदोलन आणि गुजगोष्टी; व्हिडीओ व्हायरल!

या पार्श्वभूमीवर भाजप प्रवेशाचा मुहूर्त टप्प्यावर आला असताना भीमा साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारात आपल्या पुत्रांच्या कारनाम्यांचा अभिमानाने उल्लेख करीत खासदार महाडिक व राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना आव्हान दिले. परंतु त्यांचे वादग्रस्त विधान राजन पाटील यांच्यासाठी अडचणीचे ठरले आहे. यातून त्यांच्या संभाव्य भाजप प्रवेशावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. खासदार धनंजय महाडिक हे भाजपचे आहेत. त्यांनी साहजिकच राजन पाटील यांच्या भाजप प्रवेशाला अडचण निर्माण केली आहे. भाजप सुसंस्कृत पक्ष आहे. राजन पाटील यांनी आपल्या पुत्रांच्या कारनाम्यांचा अभिमानाने उल्लेख करून स्वतःची गुन्हेगारी प्रवृत्ती पुढे आणली आहे. अशा प्रवृत्तीला भाजपमध्ये प्रवेश मिळणे अशक्य आहे. शेवटी हा निर्णय पक्षाच्या पातळीवर होतो, अशी प्रतिक्रिया धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-11-2022 at 14:15 IST
Next Story
१९ एकर शेत, अडीच लाखांवर प्रेक्षक क्षमता, १८ सेक्टर अन ११ प्रवेशद्वार ! राहुल गांधींच्या सभेसाठी काँग्रेसकडून ‘दिवसाची रात्र’