दयानंद लिपारे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर : कोल्हापुरातील पाटील – महाडिक या बलाढ्य कुटुंबातील राजकीय संघर्षाचा गोंधळ नवरात्रीत नव्याने पाहायला मिळत आहे. गोकुळ दूध संघानंतर आता राजाराम साखर कारखाना या महाडिक यांच्या ताब्यात असलेल्या अखेरच्या सत्ताकेंद्रावरुन दोन्ही घराण्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. शुक्रवारी होणारी राजारामची वार्षिक सभा ही महाडिक यांची शेवटची सभा असेल, अशा शब्दात सतेज पाटील यांनी आव्हान दिले आहे. तर, माजी आमदार अमल महाडिक यांनी राजाराम कारखाना योग्य लोकांच्या हातात असल्याने सभासद पुन्हा एकदा निवडणुकीत विरोधकांना जागा दाखवून देतील, असे प्रत्युत्तर दिले आहे. या सभेच्या निमित्ताने प्रथमच सतेज पाटील व अमल महाडिक असा दोन घराण्यातील संघर्ष सुरु झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात सतेज पाटील आणि महाडिक परिवार यांच्यातील राजकीय संघर्ष सातत्याने सुरू असतो. यापूर्वी राजकीय आखाड्यात हा सामना अनेकदा झाला आहे. आता तर तो सहकाराच्या मैदानातही वाद गाजत आहे. गोकुळ दूध संघ म्हणजे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे भक्कम सत्ता-अर्थ केंद्र. त्याला दीड वर्षापूर्वी सतेज पाटील यांनी धक्का दिला. त्यानंतर आता त्यांची नजर महाडिक यांचे सहकारातील अखेरचे सत्ताकेंद्र असलेल्या राजाराम कारखान्याकडे लागली आहे.

हेही वाचा : हिमाचल प्रदेश काँग्रेसमध्ये गळती सुरूच, पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षचाच भाजपामध्ये प्रवेश

पाटील यांना दिलासा

हा कारखाना पाटील राहत असलेल्या कसबा बावडा या उपनगरातील. आपल्याच कर्मभूमीतील हा कारखाना ताब्यात घेऊन महाडिकांना सहकारातील अखेरचा शह देण्याच्या त्यांच्या हालचाली आहेत. त्यात त्यांना नुकतेच न्यायालयीन पातळीवरील यश मिळाले आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्राबाहेर १३४६ सभासदांना अपात्र ठरवण्याचा निर्णय गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याने पाटील यांना दिलासा मिळाला आहे. यामुळे महाडिक यांना हक्काची मते गमवावी लागली आहेत. ही मते कमी झाली तरी कारखान्यावरील प्रभाव कमी होऊ दिला जाणार नाही, असे महाडिक गटाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सभेच्या वादाचे पडघम

या कारखान्याची वार्षिक सभा उद्या होत असताना पाटील – महाडिक यांच्यातील वाकयुद्ध रंगले आहे. सभासद कमी झाल्याने उमेद वाढलेल्या सतेज पाटील यांनी महाडिक यांची ही अखेरची सभा असेल. राजाराम कारखान्याच्या सात-बारावर अमल महाडिक यांचे नाव लावायचे नसेल; तर कारखान्यात परिवर्तन घडवूया असे, आवाहन त्यांनी समर्थकांच्या मेळाव्यात करून निवडणुकीचे रणशिंग फुंकले. त्यांची टीका महाडिक यांना जिव्हारी लागली. राजाराम कारखान्याची सूत्रे सध्या अमल महाडिक यांच्याकडे आहेत. त्यांनी टीकेला उत्तर देताना पाटील यांचा सात – बारा प्रकरण पुढे आणले. गगनबावडा येथील सप्तगंगा साखर कारखान्याचे नाव बदलून डी. वाय. पाटील साखर कारखाना केला. त्याची वार्षिक सभा होत नाही. अहवाल छापला जात नाही. पाटील यांच्या अजिंक्यतारा जनसंपर्क कार्यालयाचा सात-बारा कोणाच्या नावावर होता; हे त्यांनी जाहीर करावे, असे आव्हान अमल महाडिक यांनी दिले आहे. सतेज पाटील यांनी महाडिक गटाकडून राजारामच्या वार्षिक सभेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न झाला तर बावड्या मध्ये महाडिकांना फिरू दिले जाणार नाही, असा इशाराही दिला. बावडा ही आपली जहागिरी असल्यासारखे समजून बावड्याची बदनामी करू नका. तेथे रोखण्याचा प्रयत्न केल्यास जशास तसे उत्तर देऊ, असे प्रतिआव्हान महाडिक यांनी दिले आहे. राजारामची वार्षिक सभा गेले काही वर्ष सातत्याने गाजत आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर शेवटची वार्षिक सभा होत असताना त्यामध्ये गोंधळ होणार याची लक्षणे आधीच दिसू लागली आहेत.

हेही वाचा : संजय शिरसाठांच्या हवाल्याने खैरेंचा एकनाथ शिंदे यांच्याबाबत नवा गौप्यस्फोट ; अशोक चव्हाणांच्या वक्तव्यात नवी भर

सतेज पाटील – अमल महाडिक आमने-सामने

यापूर्वी पाटील – महाडिक घराण्यात अनेकदा राजकीय संघर्ष झाला आहे. सतेज पाटील यांनी महादेवराव महाडिक यांना विधान परिषद, धनंजय महाडिक यांना लोकसभा तर अमल महाडिक यांना विधानसभा निवडणुकीत पराभूत केले आहे. २०१४ सालच्या निवडणुकीत गृहराज्यमंत्रीपदी असतानाही सतेज पाटील यांना नवख्या अमल महाडिक यांनी हरवले होते. आजवर सतेज पाटील विरुद्ध महादेवराव महाडिक, सतेज पाटील विरुद्ध धनंजय महाडिक असा संघर्ष होत राहिला. आता पाटील – अमल महाडिक यांच्यात निवडणुकीवरून लढाईचे नवे रूप पुढे आले आहे. गतवर्षी विधान परिषद निवडणुकीवेळी सतेज पाटील यांच्या विरोधात भाजपने अमल महाडिक यांना उमेदवारी दिल्याने निवडणुकीचा आखाडा तापणार असे वाटत असताना राज्यस्तरीय तडजोडीत महाडिक यांना उमेदवारी मागे घेण्यास सांगण्यात आल्याने हे समर मध्येच थंडावले होते. राजाराम कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने सतेज पाटील – अमल महाडिक या आजी-माजी आमदारांतील संघर्षांला नव्याने उकळी फुटली आहे. राज्यात सत्तांतर आणि धनंजय महाडिक यांची राज्यसभेवर लागलेली वर्णी अशी जमेची बाजू असताना हक्काची १३४६ मते गमावलेला महाडिक परिवार सतेज पाटील यांना कारखान्यात प्रवेश करू देणार का, हे जसे लक्षवेधी आहे तसेच सतेज पाटील महाडिकांना सहकारातील अखेरचा शह देणार का याचे कुतूहल आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajaram sugar factory will be held satej patil amal mahadik family disputekasba bawada mumbai high court print politics news tmb 01
First published on: 30-09-2022 at 09:20 IST