Rajasthan blanket distribution controversy राजस्थानमधील टोंक या गावात ब्लँकेट वाटप कार्यक्रमादरम्यान भाजपा नेत्याने केलेल्या एका कृतीने वाद निर्माण झाला आहे. माजी खासदार सुखबीर सिंह जौनपुरिया यांनी एका मुस्लीम महिलेला तिचा धर्म विचारला आणि त्यानंतर दिलेले ब्लँकेट परत घेतले. एकूण सर्वच स्तरावरून भाजपा नेत्यावर टीका होताना दिसत आहे. मात्र, आता त्या परिसरातील हिंदू नागरिकांनीही भाजपा नेत्याविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. काय आहे हे नेमके प्रकरण? हिंदू नागरिकांच्या संतापाचे कारण काय? जाणून घेऊयात…

नेमके प्रकरण काय?

टोंक-सवाई माधोपूरचे माजी खासदार आणि भाजपा नेते सुखबीर सिंह जौनपुरिया यांनी टोंकच्या करेदा बुझुर्ग गावात आयोजित केलेल्या ब्लँकेट वाटप कार्यक्रमात शकुरन आणि इतर किमान चार मुस्लीम महिला होत्या. त्या महिलांना दिलेली ब्लँकेट त्यांचा धर्म कळल्यानंतर परत घेतली गेली. हा कार्यक्रम २८ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अजमेर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जौनपुरिया यांनी आयोजित केलेल्या जनसंपर्क मोहिमेचा भाग होता. शकुरन बानो म्हणाल्या, “ब्लँकेट मिळाले नसते तरी आम्हाला काही अडचण नव्हती, मुद्दा फक्त आमच्या अपमानाचा होता.” शकुरन बानो यांचे वय ६० वर्षे आहे. या प्रकरणावर त्यांच्यासह त्यांचे हिंदू शेजारीही तितकेच संतापले आहेत.

करेदा बुझुर्गच्या सरपंचांचे पती सांगतात की, जौनपुरिया यांच्या या कृतीमुळे गावात भाजपा नेत्याविरोधात मोठा संताप आहे. “मुस्लिमांपेक्षा हिंदूच जास्त संतापले आहेत. आम्ही दुसऱ्या दिवशी जौनपुरियांचा पुतळा जाळला,” असेही त्यांनी सांगितले. सोमवारी व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, जौनपुरिया शकुरन यांच्याकडून ब्लँकेट घेताना दिसत आहेत. यानंतर शकुरन त्या ठिकाणाहून निघून जाताना दिसत आहेत. “ज्या क्षणी त्यांनी ब्लँकेट परत घेतले, त्याच वेळी मी तिथून उठले,” असे त्यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितले.

मुस्लीम महिला काय म्हणाली?

शकुरन म्हणाल्या, “जौनपुरिया म्हणाले की, जे मोदींना शिव्या देतात त्यांचा ब्लँकेटवर कोणताही अधिकार नाही. त्यावेळी खूप वाईट वाटले. ब्लँकेट मिळणे काही इतके गरजेचे नव्हते,” असे शकुरन म्हणाल्या. शकुरन सांगतात की, त्यांना एका स्थानिक महिलेने या बैठकीला येण्याचे निमंत्रण दिले होते. त्यांच्याबरोबर इतर चार मुस्लीम महिलाही गेल्या होत्या. रमझानचा उपवास असल्याचे सांगताना त्या म्हणाल्या, “तिथे ब्लँकेट वाटली जाणार आहेत हे आम्हाला माहीत नव्हते, आम्ही तिथे पोहोचल्यानंतर ती आणली गेली.”

शकुरन यांचे पती निजाम यांचे सहा वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्यांना इस्लाम (५० वर्षे) आणि हनीफ (४७ वर्षे) हे दोन मुले आहेत. इस्लाम जवळच्या चाकसू शहरात राहतो, तर हनीफ आणि त्याचे कुटुंब (दोन मुलगे आणि एक मुलगी) शकुरन यांच्याबरोबर करेदा बुझुर्गमध्ये दोन खोल्यांच्या घरात १००० रुपये भाड्याने राहतात. वडिलांप्रमाणेच लोहारकाम करणारे हनीफ म्हणतात, “आमची प्रतिष्ठा खराब झाली, त्यांनी आमचा असा अपमान करायला नको होता.” मात्र, एक चांगली गोष्ट ही आहे की संपूर्ण गाव त्यांच्या पाठीशी उभे आहे आणि त्यांच्यातील बंधुभाव अजूनही घट्ट आहे. कार्यक्रमाच्या व्हिडीओमध्ये, जौनपुरिया निघून जात असताना काही लोक त्यांना जाब विचारताना ऐकू येतात. एक जण म्हणतोय, “तुम्ही ब्लँकेट परत घेत आहात, लोकशाहीत सर्वजण समान आहेत.”

हिंदू नागरिकांचा आक्षेप

शकुरन यांनी सांगितले, “आमच्या गावातील हिंदूंनी, विशेषतः तरुणांनी यावर आक्षेप घेतला. त्यांनी जौनपुरिया यांना सांगितले की आम्ही इथे भाऊ-बहिणीसारखे राहतो. तिथे उपस्थित असलेल्या दोन-तीन पोलिसांनीही आम्हाला सांगितले की आमच्याबरोबर असे करायला नको होते.” त्यांचे हिंदू शेजारी त्यांना येऊन सांगत आहेत की, “जे घडले याचे आम्हाला खूप वाईट वाटतेय.” सरपंच बीना देवी चौधरी यांचे पती हनुमान चौधरी म्हणतात की, जौनपुरियांची कृती निंदनीय आहे. अल्पसंख्याक मुस्लीम लोकसंख्या असलेल्या या गावात नेहमीच सलोखा राहिला आहे.

हनुमान यांच्या मते, ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येत मुस्लीम साधारणपणे तीन टक्के आहेत.
“दिवाळी, होळी किंवा ईद असो, आम्ही एकत्र साजरे करतो. आम्ही भेदभाव करत नाही. जौनपुरिया यांनी येथील बंधुभाव बिघडवण्याचा प्रयत्न केला आहे,” असे ते म्हणाले. गावातील इतर लहान समाजांमध्येही भीतीचे वातावरण असल्याचे त्यांनी सांगितले. “आज मुस्लिमांबरोबर हे घडले, उद्या त्यांच्याबरोबरही असे काही घडू शकते, अशी चिंता त्यांना आहे.” काँग्रेसचे टोंक जिल्हाध्यक्ष सौद सैदी यांनी जौनपुरिया यांची भाजपामधून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.

भाजपा नेते आपल्या भूमिकेवर ठाम

जौनपुरिया यांनी पुन्हा एकदा ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, ब्लँकेट वाटप हा त्यांचा वैयक्तिक उपक्रम होता. “मी असे कार्यक्रम करत असतो. आम्ही सुमारे २०० महिला कार्यकर्त्यांची यादी तयार केली होती आणि त्यांना (मुस्लीम महिलांना) आमंत्रित केले नव्हते,” असे ते म्हणाले. ब्लँकेट वाटप सुरू असल्याचे ऐकून त्या तिथे आल्या असल्याचेही भाजपा नेत्याने म्हटले. त्या महिलांनी डोक्यावरून पदर घेतला होता, त्यामुळे सुरुवातीला त्या पक्षाच्या कार्यकर्त्या असाव्यात असे वाटले. पण, नंतर शंका आल्याने त्यांनी महिलांना त्यांची नावे विचारल्याचे त्यांनी सांगितले.

एका महिलेने नाव सांगितल्यानंतर आणि स्थानिक नेत्याने त्या मुस्लीम असल्याचे स्पष्ट केल्यावर जौनपुरिया म्हणाले, “इथे तर चुकीच्या लोकांना बोलावले आहे, हे योग्य नाही.” ते पुढे म्हणाले, “जर त्या महिला ब्लँकेट घेऊन गेल्या असत्या, तर नंतर त्यांनी ‘आम्ही जौनपुरियाला मूर्ख ठरवले’ अशा बढया मारल्या असत्या.” ते म्हणाले, “तुम्हाला आधीच सरकारी योजनांचा लाभ मिळत आहे आणि आता तुम्हाला हे पण हवे असेल, तर आमचे कार्यकर्ते वंचित राहतील. जर आम्ही तुम्हाला ३० ते ४० ब्लँकेट दिली असती, तर आमचे कार्यकर्ते नाराज झाले असते,” असे भाजपा नेते म्हणाले.

आपली कृती जातीयवादी नसल्याचा दावा जौनपुरिया यांनी केला. ते म्हणाले की, ते टोंकमध्ये गेल्या १० ते १२ वर्षांपासून स्थानिक महिला व बाल रुग्णालयातील रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी ‘सांसद रसोई’ चालवतात आणि तिथे जेवण घेणाऱ्यांपैकी निम्म्या मुस्लीम महिला असतात. “मी पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक व्यक्तीला ५०० रुपयेही देतो. हॉस्पिटलच्या एका बेडवर हिंदू असतो तर दुसऱ्यावर मुस्लीम. मी कुठे कुठे भेदभाव करणार? मला सर्वांनाच द्यावे लागते,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोण आहेत सुखबीर सिंह जौनपुरिया?

सुखबीर सिंह जौनपुरिया २००५ ते २००९ दरम्यान हरियाणाच्या सोहना येथील आमदार राहिले आहेत. ते २०१४ व २०१९ मध्ये टोंक सवाई माधोपूरमधून लोकसभेवर निवडून आले होते. मात्र, २०२४ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. जौनपुरिया यांनी दावा केला की, त्यांनी यापूर्वी मुस्लिमांना ब्लँकेट दिली आहेत आणि मुस्लीम महिला त्यांना राखीही बांधतात. २०२० मध्ये जौनपुरिया चर्चेत आले होते.

त्यांनी चिखलाने अंघोळ करताना आणि शंख फुंकतानाचा एक व्हिडीओ रेकॉर्ड केला होता आणि दावा केला होता की यामुळे कोविड-१९ रोखता येतो. त्यानंतरच त्यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली होती आणि त्यांची सर्वत्र चर्चा झाली होती. शकुरन यांना या घटनेनंतर दोन ब्लँकेट मिळाली आहेत. एक ब्लँकेट टोंकच्या राजकारण्यांकडून आणि दुसरे राजस्थान काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलकडून मिळाले आहे.