पुणे : भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरूनही त्यांना पायउतार व्हावे लागले आहे. या पदावर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या कोणाची नेमणूक करणार, याबाबत उत्सुकता असणार आहे. या पदासाठी पुण्यातून माजी महापौर राजलक्ष्मी भोसले या इच्छुक असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
राजलक्ष्मी भोसले या पुणे महापालिकेच्या माजी महापौर असून, हडपसर विधानसभा मतदार संघ हे त्यांचे कार्यक्षेत्र आहे. सध्या त्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या पक्षाने ४० जणांची स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती केली होती. त्यामध्ये राजलक्ष्मी भोसले यांचा समावेश होता.
भोसले यांच्याशिवाय चाकणकर, महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे, सुरेखा ठाकरे, प्रतिभा शिंदे आणि सना मलिक या सहा महिला पदाधिकारी स्टार प्रचारक होत्या. त्यापैकी भोसले या प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
राजलक्ष्मी भोसले कोण?
राजलक्ष्मी भोसले या २००७ ते २००९ या कालावधीत पुणे महापालिकेच्या महापौर होत्या. त्यांचे आजोबा गणपतराव नलावडे तब्बल ४२ वर्षे तत्कालीन पुणे नगरपालिका आणि नंतरच्या महापालिकेच्या राजकारणात होते. वडील हिराजी विधाते हे हडपसर भागातील प्रसिद्ध वकील आणि काँग्रेसचे कार्यकर्ते होते.
१९९७ मध्ये त्या पहिल्यांदा महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडून निवडून आल्या. त्यानंतर २००२ आणि २००७ मध्ये त्या तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडून आल्या. २००७ मध्ये तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना यांचा ‘पुणे पॅटर्न’ झाला होता. त्या काळात त्या अडीच वर्षे महापौर पदी होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विभाजन झाल्यानंतर त्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’त प्रवेश केला. सध्या त्या महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. आता प्रदेशाध्यक्ष पदासाठी त्या इच्छुक आहेत.
सक्रिय राजकारणात १९८० पासून कार्यरत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळे महापौर म्हणून पुण्यात काम करण्याची संधी मिळाली. राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष पदाबाबत पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करणार आहे. पक्ष याबाबत अंतिम निर्णय घेईल. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी विचारणा करण्यात आली होती. मात्र, या पदासाठी ६५ पेक्षा कमी वयाची अट आहे. ६५ पेक्षा अधिक वय असल्याने या पदावर नियुक्ती होऊ शकत नाही. – राजलक्ष्मी भोसले, माजी महापौर, पुणे महापालिका.
