आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : शक्तिपीठ महामार्गाचा विरोध करण्यासाठी केलेल्या आंदोलनादरम्यान माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली… देशविरोधी वक्तव्ये करणाऱ्या गिरीश महाजन यांची तात्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली… शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना भाजपाच्या नेत्याने १०० कोटी रुपयांची अब्रूनुकसानीची नोटीस पाठवल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली… राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची राज्यसभा खासदारकी हुकल्याने त्यांच्या समर्थकांनी बॅनरबाजी करून उघडपणे नाराजी व्यक्त केली… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी कर्जमाफी संदर्भात आणखी एक मोठा निर्णय घेतला. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
राजू शेट्टी यांची देवेंद्र फडणवीसांवर टीका
कोल्हापूर जिल्ह्यात शक्तिपीठ महामार्गाविरोधात पुन्हा एकदा तीव्र आंदोलन करण्यात आले. हा प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी १२ जिल्ह्यातून आलेले शेतकरी, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक भर उन्हात रस्तावर उतरले होते. यादरम्यान उपस्थितांना संबोधित करताना राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. आजवर आम्ही महाराष्ट्रातील अनेक मुख्यमंत्र्यांविरोधात लढलो; पण इतका लबाड मुख्यमंत्री मी माझ्या हयातीत बघितला नाही, असे नाव न घेता त्यांनी फडणवीसांवर टीका केली. शक्तिपीठ महामार्ग तुम्ही कशासाठी करता? आमच्या जीवावर का उठता? लक्षात ठेवा हे कोल्हापूर आहे. त्यामुळे आमच्या नादाला लागू नका, असा इशाराही राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला दिला. या आंदोलनात काँग्रेसचे खासदार शाहू महाराज छत्रपती, विधान परिषदेचे काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह ठाकरे गटाचे स्थानिक नेतेही सहभागी झाले होते.
गिरीश महाजन यांच्या हकालपट्टीची मागणी
देशविरोधी वक्तव्ये करणाऱ्या गिरीश महाजन यांची तात्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. गिरीश महाजन यांनी अमृतसर येथे ऑपरेशन ब्ल्यू स्टार संदर्भात केलेले वक्तव्य अत्यंत बेजबाबदार, राष्ट्रहिताला बाधा आणणारे आणि भारतीय सैन्यदलाच्या शौर्याचा अवमान करणारे आहे. देशाच्या अखंडतेसाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी राबविण्यात आलेल्या ऑपरेशन ब्ल्यू स्टार मोहिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्यांनी दहशतवादाविरोधातील भारताच्या लढ्यालाच कमी लेखण्याचा प्रयत्न केला आहे, अशी खंतही सपकाळ यांनी बोलून दाखवली. इंदिरा गांधी यांनी ऑपरेशन ब्लू स्टार राबविले नसते तर देशाचे तुकडे पडले असते, देशाच्या अखंडतेसाठी इंदिराजी यांना बलिदान द्यावे लागले त्यावरही महाजन शंका उपस्थित करतात हे अत्यंत आक्षेपार्ह व निषेधार्ह आहे असेही सपकाळ म्हणाले.
शिंदेसेनेच्या आमदाराला १०० कोटींची नोटीस
राज्यात विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच बुलढाण्यात शिवसेना शिंदे गट आणि भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांना तब्बल १०० कोटी रुपयांची अब्रूनुकसानीची नोटीस पाठवली आहे. वकील असीम सरोदे यांच्यामार्फत ही कायदेशीर नोटीस बजावण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी आमदार गायकवाड यांनी माध्यमांसमोर बोलताना विजयराज यांच्यावर गंभीर आरोप केले होते. भाजपाच्या नेत्याने त्यांच्या शाळेतील आदिवासी मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप गायकवाड यांनी केला होता. या आरोपांमुळे आपल्या राजकीय प्रतिमेला धक्का बसल्याचे म्हणत विजयराज यांना १०० कोटी रुपयांच्या अब्रूनुकसानीची नोटीस पाठवली आहे. त्यावर आता गायकवाड काय भूमिका मांडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
छगन भुजबळ खरोखर मोठा निर्णय घेणार?
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची राज्यसभा खासदारकी हुकल्याने त्यांच्या समर्थकांनी नाशिकच्या येवला शहरात बॅनरबाजी करून उघडपणे नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पक्षवाढीसाठी प्रयत्न करणाऱ्या भुजबळ यांना आता पक्षात वेगळा न्याय आणि इतर नेत्यांना वेगळा न्याय दिला जात असल्याची भावना भुजबळ समर्थकांची झाली. छगन भुजबळ यांनीही आपली नाराजी व्यक्त करताना नेमका हाच प्रश्न उपस्थित केला होता. आता भुजबळ यांच्या येवला या मतदार संघात समर्थकांनी भुजबळ यांना थेट “साहेब, निर्णय घ्या !” असे साकडे घातले आहे. भुजबळ यांची अनेक वर्षांपासून राष्ट्रीय राजकारणात जाण्याची इच्छा आहे. मागील लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदार संघातूनही त्यांच्या नावावर चर्चा झाली होती. विशेष म्हणजे, भुजबळ यांना उमेदवारी मिळावी, यासाठी भाजपचे गृहमंत्री अमित शहा हेही उत्सुक होते. परंतु, महायुतीच्या जागा वाटपात नाशिकची जागा शिंदे गटाकडे गेल्याने त्यांची संधी हुकली. आता राज्यसभेवर त्यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा रंगली असतानाच पक्षाने दुसऱ्याच नेत्याला उमेदवारी दिली. त्यामुळे भुजबळ यांचे समर्थक नाराज झाल्याचे दिसून येत आहे.
‘या’ शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफीचा लाभ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली, पण कर्जमाफीच्या या योजनेच्या अटीशर्थींमुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहतील, असा दावा काही शेतकरी संघटनांनी केला. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही या योजनेसंदर्भातील अटींबाबत सरकारने पुर्नविचार करणे गरजेचे असल्याचे म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर आज राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कर्जमाफी संदर्भात आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार आता २०१७ आणि २०१९ साली झालेल्या कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांनाही यंदा कर्जमाफी दिली जाणार आहे. या योजनेंतर्गत सुमारे ५६ लाखांहून अधिक शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार आहे. तसेच या कर्जमाफी योजनेसाठी सुमारे ३६ हजार ५८५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
