राज्यसभेच्या राज्यातील सात जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कायर्क्रम जाहीर केल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार किंवा रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले हे पुन्हा वरिष्ठ सभागृहात निवडून येणार का आणि कसे याची राजकीय वर्तुळात साऱ्यांनाच उत्सुकता आहे.
राज्यसभेच्या सात जागांसाठी १६ मार्चला निवडणूक होणार आहे. २६ फेब्रुवारी ते ५ मार्च या काळात उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. सात जागांसाठी निवडणूक असल्याने विजयासाठी पहिल्या पसंतीच्या ३७ मतांची आवश्यकता असेल. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे चार, शिवसेना (शिंदे) व राष्ट्रवादीचा (अजित पवार) प्रत्येकी एक तर विरोधकांचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. संख्याबळाचा विचार करता ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता अधिक आहे.
भाजपच्या आमदारांचे संख्याबळ १३२ असले तरी अपक्ष व छोट्या पक्षांच्या पाठिंब्यावर भाजपचे चार उमेदवार निवडून येऊ शकतात. शिवसेना शिंदे गटाकडे २० मते अतिरिक्त असली तरी भाजप शिंदे गटासाठी दुसरी जागा सोडणे कठीण आहे. अजित पवार गटाकडे एक जागा निवडून आणण्यासाठी पुरेशी मते आहेत.
महाविकास आघाडीत शिवसेना २०, काँग्रेस १६ तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे १ॅ० अशी एकूण ४६ मते आहेत. शिवसेना व काँग्रेस एकत्र राहिले तरी एक जागा निवडून येऊ शकते.
शरद पवारांचे भवितव्य काय ?
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार कोणती भूमिका घेतात यावर बरीच गणिते अवलंबून आहेत. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू आहे. लगेचच विलीनीकरण दृष्टीक्षेपात दिसत नाही. अजित पवार गट शरद पवारांसाठी ही जागा सोडणार का, याचीही उत्सुकता आहे. मुळात शरद पवार पुन्हा राज्यसभेवर निवडून जाण्यात उत्सुक आहेत का ? शरद पवारांनी पुन्हा राज्यसभेवर निवडून यावे, अशी भूमिका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मांडली आहे. शरद पवार हे उमेदवार असल्यास काँग्रेसही पाठिंबा देऊ शकते. यामुळे शरद पवारांना निवडून येण्यात काही अडचण येणार नाही.
रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले हे गेली ४० वर्षे काँग्रेस, राष्ट्रवादी वा भाजपच्या मदतीवर निवडून आले आहेत. स्वबळावर त्यांना कधीच यश मिळालेले नाही. भाजपने गेल्या वेळी आठवले यांना संधी दिली. त्यांच्याकडे केंद्रात राज्यमंत्रिपदही सोपविले. राज्यात आता तीन वर्षे तरी कोणत्या निवडणुका होणार नाहीत. यामुळेच भाजप आठवले यांना संधी देते की पक्षातील अन्य कोणत्या दलीत नेत्याला संधी देते याची उत्सुकता आहे. आठवले यांना मंत्रिपद टिकविण्यासाठी पुन्हा राज्यसभा हवी आहे.
राज्यसभेचे निवृत्त होणारे सात सदस्य : शरद पवार, फौजिया खान (राष्ट्रवादी काँग्रेस), रामदास आठवले (रिपब्लिकन पक्ष), धैर्यशील पाटील, डॉ. भागवत कराड (भाजप), रजनी पाटील (काँग्रेस), प्रियंका चतुर्वेदी (शिवसेना ठाकरे),

