Rajya Sabha Polls 2026 Analysis : राज्यसभेच्या ३७ पैकी २६ जागा बिनविरोध झाल्यानंतर उर्वरित ११ जागांसाठी सोमवारी (१६ मार्च) तीन राज्यांत निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत भाजपाने तब्बल नऊ जागांवर दणदणीत विजय मिळवून विरोधकांना पराभवाचा धक्का दिला. पुरेसे संख्याबळ नसतानाही बिहारमध्ये सत्ताधारी पक्षाने दोन अतिरिक्त जागा जिंकल्याने महाआघाडीच्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. या पार्श्वभूमीवर निवडणुकीत नेमके काय घडले? काँग्रेसच्या आमदारांनी त्यांच्याच पक्षाला कसा दगा दिला? राज्यसभेत भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे एकूण संख्याबळ किती झाले? या सर्व घडामोडींचा घेतलेला हा सविस्तर आढावा…
बिहारमधील पाचही जागांवर भाजपाचा विजय
बिहारसह हरियाणा आणि ओडिशामध्ये राज्यसभेच्या एकूण ११ जागा रिक्त होत्या. त्यासाठी सोमवारी झालेल्या निवडणूक प्रक्रियेत एकूण १४ उमेदवार रिंगणात होते. बिहारमध्ये सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने राज्यसभेच्या पाचही जागांवर विजय मिळवला. या विजयासह मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांचा राज्यसभेचा मार्ग मोकळा झाला. दुसरीकडे विरोधकांच्या महाआघाडीला प्रथम पसंतीच्या ४१ मतांचा आकडा गाठण्यात अपयश आले. त्यामागचे मुख्य कारण म्हणजे मतदानाच्या वेळी त्यांचे चार आमदार अनुपस्थित राहिले. त्यामध्ये काँग्रेसच्या तीन आणि राष्ट्रीय जनता दलाच्या एका आमदाराचा समावेश होता. हे चारही आमदार बेपत्ता झाले असल्याची आवई बिहारच्या राजकीय वर्तुळात उठली.
ओडिशातही भाजपाला मोठा यश
नितीश कुमार आणि नितीन नवीन यांनी प्रत्येकी ४४ मतांसह विजय मिळवला. त्याशिवाय रामनाथ ठाकूर आणि उपेंद्र कुशवाहा यांना प्रत्येकी ४२ मते मिळाली. बिहारमध्ये विरोधकांच्या महाआघाडीला आपला एक उमेदवार निवडून आणण्यासाठी सहा आमदारांच्या पाठिंब्याची गरज होती. मात्र, ऐन वेळी चार आमदार मतदानाला गैरहजर राहिल्याने विरोधकांची रणनीती पूर्णपणे फसली. ओडिशातही राज्यसभेच्या चार जागांसाठी पाच उमेदवार मैदानात होते. इथे विजयासाठी प्रत्येक उमेदवाराला प्रत्येकी ३० मतांची आवश्यकता होती. या अटीतटीच्या लढतीत भाजपाचे उमेदवार मनमोहन सामल आणि सुजीत कुमार यांनी विजय मिळवला; तर बीजेडीचे संतृप्त मिश्रा हेसुद्धा विजयी झाले आहेत. त्याशिवाय भाजपाने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार दिलीप रे यांनीही अनपेक्षित विजय मिळवला. हरियाणामध्ये राज्यसभेच्या दोन जागांसाठी निवडणूक झाली आणि त्यापैकी प्रत्येकी एका जागेवर भाजपा व काँग्रेसला विजय मिळाला.
आणखी वाचा : ठाकरेंच्या आणखी एका शिलेदाराचा राजीनामा; शिंदे गटाच्या नेत्यासह १० जणांवर गुन्हा, वाचा ५ घडामोडी…
राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंग?
ओडिशा विधानसभेत एकूण १४७ आमदार आहेत. त्यापैकी काँग्रेस आणि बिजू जनता दलाकडे त्यांच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी पुरेसे संख्याबळ होते; पण बीजेडीच्या तब्बल आठ आणि काँग्रेसच्या तीन आमदारांनी पक्षाच्या आदेशाविरोधात भाजपाने पाठिंबा दिलेल्या दिलीप रे यांना क्रॉस व्होटिंग केल्याचा आरोप होत आहे. बीजेडीचे सर्वेसर्वा नवीन पटनायक यांनी भाजपावर घोडेबाजाराचा आरोप केला आहे. तसेच पक्षाचा आदेश डावलणाऱ्या आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची तयारी केल्याचेही त्यांनी माध्यमांना सांगितले आहे. राज्यसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसल्यानंतर इंडिया आघाडीच्या नेत्यांनी आपल्या आमदारांना भाजपाने धमकावल्याचा गंभीर आरोप केला आहे.
महाआघाडीला कशामुळे आले अपयश?
बिहारमध्ये राज्यसभा निवडणुकीत महाआघाडीचे चार आमदार मतदानाला गैरहजर राहिले हे महाआघाडीच्या पराभवाचे मुख्य कारण असल्याचे सांगितले जाते. या चारही आमदारांच्या अनुपस्थितीमुळे ऐन वेळी महाआघाडीचे संख्याबळ थेट कमी झाले आणि त्यांचे उमेदवार अमरेंद्र धारी सिंह यांना विजयासाठी आवश्यक असलेला ४१ मतांचा आकडा गाठता आला नाही. विशेष बाब म्हणजे असदुद्दीन ओवैसी यांच्या पाच आमदारांनी आणि बसपाच्या एका आमदाराने महाआघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. मात्र, स्वतःच्याच चार आमदारांच्या गैरहजेरीमुळे हा पाठिंबा व्यर्थ ठरला. आघाडीच्या नेत्यांनी एकजुटीचा दावा केला असला तरीही मतदानाला आमदारांची पूर्ण उपस्थिती हे त्यांच्या पराभवाचे कारण ठरल्याचे दिसून आले.
मतदानाला गैरहजर राहिलेले चार आमदार कोण?
वाल्मीकीनगर (पश्चिम चंपारण) मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार सुरेंद्र प्रसाद कुशवाहा मतदानाच्या आदल्या दिवशी बेपत्ता झाल्याची चर्चा रंगली. नोव्हेंबर २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत जेडीयूचे उमेदवार धीरेंद्र प्रताप सिंह यांचा अटीतटीच्या लढतीत पराभव करून कुशवाहा हे पहिल्यांदाच आमदार झाले. राज्यसभा मतदानाच्या दिवशी त्यांचा मोबाईल फोन बंद होता आणि ते दिवसभर पक्षाच्या नेतृत्वाच्या संपर्कात नव्हते, असे काँग्रेसमधील एका सूत्राने सांगितले. फारबिसगंज (अररिया) मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार मनोज विश्वास हेदेखील मतदानाच्या वेळी कोणाच्याही संपर्कात नव्हते. २०२५ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपाच्या विद्यासागर केशरी यांचा अवघ्या २२१ मतांच्या निसटत्या फरकाने पराभव केला होता. मनिहारी (कटिहार) मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार मनोहर प्रसाद सिंह यांनीही राज्यसभेच्या मतदानाकडे पाठ फिरवली. निवडणुकीच्या दिवशी सकाळी ते नेत्यांच्या संपर्कात होते आणि त्यांनी मतदानासाठी पोहोचण्याचे आश्वासनही दिले होते; मात्र प्रत्यक्षात ते आलेच नाहीत. ढाका (पूर्व चंपारण) मतदारसंघाचे फैसल रहमान हे मतदानाला गैरहजर राहणाऱ्यांमध्ये आरजेडीचे एकमेव आमदार होते. आईची प्रकृती बिघडल्याने आपल्याला तातडीने दिल्लीला जावे लागले, असे स्पष्टीकरण त्यांनी माध्यमांना दिले.
हेही वाचा : धर्मांतर बंदी विधेयकावरून मुस्लीम नेते का संतापले? विरोधकांच्या टीकेला फडणवीसांनी कसे प्रत्युत्तर दिले?
राज्यसभेत भाजपाकडे किती संख्याबळ?
सोमवारी रात्री उशिरा जाहीर झालेल्या निकालानंतर राज्यसभेतील राजकीय गणिते बदलली आहेत. राज्यसभेत बहुमतासाठी १२३ जागांची आवश्यकता असते. ताज्या निकालानंतर भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे १४० पेक्षा जास्त सदस्यांचे संख्याबळ झाले आहे. त्यामध्ये भारतीय जनता पक्षाकडे राज्यसभेचे सर्वाधिक १०६ खासदार आहेत. त्यामुळे भाजपाने सभागृहातील सर्वांत मोठा पक्ष म्हणून आपले स्थान आणखीनच बळकट केले आहे. दुसरीकडे विरोधकांच्या इंडिया आघाडीकडे केवळ ७९ ते ८१ सदस्यांचे संख्याबळ आहे. खासदारांची संख्या वाढल्याने केंद्र सरकारला आता महत्त्वाची विधेयके बहुमताने मंजूर करणे सोपे होणार आहे.
