एप्रिल महिन्यात राज्यसभेच्या ३७ जागा रिक्त होणार आहेत. त्यामुळे आज (१६ मार्च) राज्यसभेच्या ३७ जागांसाठी दहा राज्यांमध्ये मतदान होत आहे. राज्यसभा निवडणुकीत भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) इंडिया आघाडीपेक्षा जास्त जागा जिंकता येतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, क्रॉस व्होटिंगची शक्यता असल्याने सहा जागांबाबत पेच आहे. या सहा जागा एनडीएला की इंडिया आघाडीला मिळतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. राज्यसभा निवडणुकीत भाजपाप्रणित एनडीए १९ जागा बिनविरोध जिंकण्याची शक्यता आहे. या निवडणुकीनंतर संसदेच्या वरिष्ठ सभागृहात एनडीएचे संख्याबळ वाढणार आहे. तर इंडिया आघाडीचे संख्याबळ घटणार आहे. काँग्रेस व इंडिया आघाडी १२ जागा जिंकेल, असा अंदाज आहे. या निवडणुकीत इंडिया आघाडीतील घटक पक्षांसमोर एकत्रित राहण्याचे आव्हान असणार आहे.
राज्यसभेच्या २४५ जागांपैकी १३३ जागा एनडीएकडे आहेत, त्यापैकी १०३ जागा भाजपाकडे आहेत. राज्यसभेत स्पष्ट बहुमत मिळवण्यापासून भाजपा फक्त २० जागा दूर आहे. तर दुसरीकडे इंडिया आघाडीकडे राज्यसभेच्या ७९ जागा आहेत. त्यापैकी २७ जागा काँग्रेस, १२ जागा तृणमूल काँग्रेस (ममता बॅनर्जी), १० जागा एमके स्टॅलिन यांचा डीएमके पक्ष, ५ जागा लालूप्रसाद यादव यांच्या आरजेडी पक्षाकडे आहेत.
फोटो लावणे
महाराष्ट्रात राज्यसभेच्या सात जागांसाठी मतदान
महाराष्ट्राचे सात खासदार निवृत्त होत असल्याने राज्यसभेच्या सात जागांसाठी मतदान होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शरद पवार, आरपीआय (आठवले) पक्षाचे रामदास आठवले आणि शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी यांच्यासह इतर खासदार निवृत्त होत आहेत. राज्यसभेच्या या सात जागांपैकी चार जागा महाविकास आघाडी तर तीन जागा महायुतीकडे होत्या.
विधानसभा निवडणुकीत २८८ पैकी २३५ जागांवर महायुतीचे आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे राज्यसभेच्या सात जागांपैकी सहा जागा महायुती जिंकेल अशी शक्यता आहे. उमेदवाराला निवडून येण्यासाठी ३६ आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्या राज्यसभेतील तीन जागा कमी होणार आहेत.
महायुतीकडून आरपीआयचे रामदास आठवले, अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार, भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, माजी भाजपा आमदार रामराव वडकुते, शिवसेनेच्या (शिंदे) ज्योती वाघमारे व भाजपाच्या नागपूरमधील नेत्या माया इवनाते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून शरद पवार यांना उमेदवारी देण्यात आली.
तमिळनाडूत राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान
तमिळनाडूत राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान होत आहे. इंडिया आघाडीचा घटक असलेल्या एमके स्टॅलिन यांच्या डीएमके पक्षाला चार जागांवर सहज विजय मिळवता येणार आहे. तर भाजपाशी युती केलेल्या एआयएडीएमके व तमिळ मणिला काँग्रेस (मुपानार) पक्षाला प्रत्येकी एक-एक जागा जिंकता येणार आहेत. तमिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या डीएमके व मित्र पक्षांचे १५९ आमदार आहेत. तर विरोधक असलेल्या एआयएडीएमके व एनडीएचे ७५ आमदार आहेत. उमेदवाराला राज्यसभेत जिंकून जाण्यासाठी ३३ मतांची गरज आहे.
पश्चिम बंगालमध्ये राज्यसभेच्या पाच जागांसाठी मतदान
पश्चिम बंगाल विधानसभेच्या २९४ जागांपैकी २२३ जागा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाकडे आहेत. तर भाजपाकडे ६४ आमदार आमदार आहेत. त्यामुळे पाचपैकी चार जागा तृणमूल काँग्रेस पक्ष जिंकू शकतो. तर भाजपा एका जागेवर जिंकू शकतो. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे साकेत गोखले, काँग्रेसच्या मौसम नूर निवृत्त होत आहेत. तृणमूल काँग्रेसने राज्यसभेसाठी हाय प्रोफाईल उमेदवार दिले आहेत. त्यात सर्वोच्च न्यायालयात एलजीबीटीक्यू कम्युनिटीसाठी लढा दिलेल्या वकिल मेनाका गुरूस्वामी, बंगालचे माजी डीजीपी राजीव कुमार, बंगाली अभिनेते कोयल मालिक, भाजपाचे माजी केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो (२०२१च्या विधानसभा निवडणुकीआधी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश) यांचा समावेश आहे. तर भाजपाने माजी प्रदेशाध्यक्ष राहुल सिन्हा यांना उमेदवारी दिली आहे.
बिहारमध्ये राज्यसभेच्या पाच जागांसाठी मतदान
बिहारमध्ये विधानसभेच्या २४३ जागांपैकी भाजपाप्रणित एनडीएकडे २०२ जागा आहेत. त्यामुळे एनडीएला चार जागा जिंकणे सहज शक्य आहे. दरम्यान, विरोधी पक्ष असलेल्या आरजेडीकडे ३५ आमदार आहेत. आरजेडीला एक जागा जिंकण्यासाठी आणखी सहा आमदारांच्या मतांची गरज आहे. तर एनडीएला पाचवी जागा जिंकण्यासाठी विरोधी पक्षांतील फक्त तीन आमदारांच्या मतांची गरज आहे. त्यामुळे बिहारमध्ये पाचही जागा भाजपा जिंकेल असा अंदाज आहे. एनडीएकडून मुख्यमंत्री नितीश कुमार, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, केंद्रीय मंत्री व जदयूचे नेते राम नाथ ठाकुर आणि शिवेश राम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, बिहारमध्ये एका जागेसाठी होणाऱ्या मतदानात एमआयएमची भूमिका महत्वाची ठरणार आहे.
ओडिशामध्ये राज्यसभेच्या चार जागांसाठी मतदान
ओडिशामध्ये राज्यसभेच्या चार जागांसाठी मतदान होत आहे. भाजपा व बिजू जनता दल या पक्षांमध्ये लढत होत आहे. बिहारप्रमाणेच ओडिशामध्ये देखील एक जागा कोण जिंकेल हे अस्पष्ट आहे. दोन जागांवर भाजपा तर एका जागेवर बिजू जनता दलाचा उमेदवार बिनविरोध निवडून येऊ शकतो, असा अंदाज आहे. तर चौथ्या जागेसाठी भाजपा व बिजू जनता दल या दोन्ही पक्षांनी उमेदवार दिला आहे. ओडिशात भाजपाचे सरकार आहे. एकूण १४७ विधानसभा सदस्यांपैकी ८२ आमदार भाजपाचे आहेत, तर ४८ आमदार हे बिजू जनता दलाचे आहेत. काँग्रेसचे १४ आमदार आहेत. बिजू जनता दल व काँग्रेस हे मित्रपक्ष आहेत. मत फुटण्याची भीती असल्याने काँग्रेसने उमेदवारांना बंगळुरूतील एका हॉटेलमध्ये हलवले आहे. दरम्यान, आसाममध्ये राज्यसभेच्या तीन जागांसाठी मतदान, छत्तीसगडमध्ये राज्यसभेच्या दोन जागांसाठी मतदान, हरयाणामध्ये राज्यसभेच्या दोन जागांसाठी मतदान, तेलंगणामध्ये राज्यसभेच्या दोन जागांसाठी मतदान, हिमाचल प्रदेशमध्ये राज्यसभेच्या एका जागेसाठी मतदान होणार आहे.
