Rajya Sabha Election 2026: दहा राज्यांमधील राज्यसभेच्या २४ जागांसाठी निवडणूक आयोगाने शुक्रवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. जून व जुलै महिन्यात राज्यसभेच्या २४ जागा रिक्त होणार आहे. या जागांसाठी १८ जून रोजी निवडणुका होणार असल्याची घोषणा करण्यात आली. मतमोजणी १८ जून रोजीच संध्याकाळी होईल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. राज्यसभेत भाजपाचे सध्या ११३ खासदार आहेत. तर भाजपा प्रणित एनडीए आघाडीचे एकूण १४८ खासदार आहेत. एकूण २४५ सदस्यसंख्या असलेल्या राज्यसभेत दोन तृतियांश खासदारांचा टप्पा गाठण्यासाठी भाजपा प्रणित एनडीएला आणखी १५ खासदारांची आवश्यकता आहे. राज्यसभेत दोन तृतियांश खासदारांचे समर्थन असल्यास घटना दुरूस्तीशी संबंधित विधेयक मंजूर घेणे सोईचे जाते. परंतु, एनडीए सध्या हा आकडा गाठण्याची शक्यता कमी आहे.

आंध्र प्रदेश व गुजरातमध्ये एनडीएला एकूण चार जागांचा लाभ होणार आहे. तर कर्नाटक व झारखंडमध्ये भाजपाला प्रत्येकी एका जागेचे नुकसान होण्याची शक्यता आहे. राज्यसभा निवडणुकीनंतर एनडीएचा आकडा वाढेल हे निश्चित आहे. पण, त्यांना दोन तृतियांशचा टप्पा गाठता येणार नसल्याचे चित्र आहे. कोणतेही घटना दुरूस्तीचे विधेयक मंजूर करून घेण्यासाठी सरकारला दोन तृतियांश सदस्यांचे समर्थन असणे आवश्यक असते.

मल्लिकार्जुन खरगे, माजी पंतप्रधान देवेगौडा होणार निवृत्त

राज्यसभेतून देशातील अनेक दिग्गज नेते निवृत्त होणार आहेत. निवृत्त होणाऱ्या नेत्यांमध्ये राजस्थानमधून केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू, कर्नाटकातून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी पंतप्रधान व जनता दल सेक्युलरचे नेते एच. डी. देवेगौडा, मध्य प्रदेशमधून माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते दिग्विजय सिंह, गुजरातचे माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शक्तीसिंह गोहील यांचा समावेश आहे.

आंध्र प्रदेश आणि गुजरातचे प्रत्येकी चार, मध्य प्रदेश आणि राजस्थानचे प्रत्येकी तीन, आणि मणिपूर व मेघालयचे प्रत्येकी एक राज्यसभा खासदार २१ जून रोजी निवृत्त होतील. झारखंडमधील दोन जागांसाठीही निवडणूक होईल, ज्यातील एक जागा २१ जून रोजी रिक्त होत आहे आणि दुसरी जागा झारखंड मुक्ती मोर्चाचे (JMM) दिवंगत नेते शिबू सोरेन यांची आहे, त्यांचे ४ ऑगस्ट २०२५ रोजी निधन झाले होते. अरुणाचल प्रदेशातील एक जागा २३ जून रोजी रिक्त होईल, कर्नाटकातील चार जागा २५ जून रोजी रिक्त होतील, आणि मिझोरममधील एक जागा १९ जुलै रोजी रिक्त होईल.

राज्यसभेतील प्रत्येक सदस्याचा कार्यकाळा हा सहा वर्षांचा असतो. दर दोन वर्षांनी राज्यसभेचे एक तृतियांश सदस्य निवृत्त होत असतात. राज्यसभेचे कामकाज अखंडितपणे सुरू राहिल अशी तरतुद संविधानात करण्यात आली आहे. लोकसभेप्रमाणे राज्यसभा कधीच विसर्जित होऊ शकत नाही. विधानसभेत निवडून गेलेले आमदार राज्यसभा सदस्याची निवड करतात.

कर्नाटकात एनडीएला किती जागा जिंकता येणार?

कर्नाटकात रिक्त होणाऱ्या चार जागांपैकी तीन जागा एनडीए (NDA) कडे आहेत. ज्यातील दोन एकट्या भाजपच्या आहेत. आणि एक जागा काँग्रेसकडे आहे. मात्र, हे चित्र आता बदलणार आहे, कारण कर्नाटकच्या २२४ सदस्यांच्या विधानसभेत सध्या काँग्रेसचे १३५ आमदार, भाजपचे ६६ आमदार आणि एनडीएचा मित्रपक्ष असलेल्या जनता दल (सेक्युलर) म्हणजेच जेडीएस (JD-S) कडे १६ आमदार आहेत. त्यामुळे, राज्यसभेची निवडणूक जिंकण्यासाठी ४६ मतांचा कोटा (किमान मतांची गरज) आवश्यक आहे. या परिस्थितीत काँग्रेसला दोन जागा मिळणे निश्चित आहे, तर एनडीएला एक जागा मिळणे निश्चित आहे. चौथी जागा मात्र आमदार कशा प्रकारे मतदान करतात यावर अवलंबून असेल.

आंध्र प्रदेशात एनडीएचा चारही जागांवर होणार विजय?

आंध्र प्रदेशात रिक्त होणाऱ्या चार जागांपैकी तीन जागा जगन मोहन रेड्डी यांच्या वायएसआरसीपी (YSRCP) कडे आहेत, आणि एक जागा सत्ताधारी तेलगू देसम पार्टी (TDP) कडे आहे. हे चित्र देखील बदलणार आहे, कारण आंध्र प्रदेशच्या १७५ सदस्यांच्या विधानसभेत टीडीपीकडे १३५ आमदार, जनसेना पक्षाकडे २१ आमदार, भाजपकडे ८ आमदार आणि वायएसआरसीपीकडे ११ आमदार आहेत. राज्यसभा निवडणूक जिंकण्यासाठी ३६ मतांचा कोटा आवश्यक आहे. या परिस्थितीत, १६४ जागा असणारी एनडीए (NDA) चारही जागांवर निश्चितपणे विजय मिळवेल.

गुजरातमध्ये सर्वच जागा भाजपा जिंकणार?

गुजरातमध्ये विधानसभा सदस्यांची एकूण संख्या १८२ आहे. राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या चार जागांपैकी सध्या तीन जागा भाजपकडे आणि एक जागा काँग्रेसकडे आहे. या चारपैकी कोणतीही जागा जिंकण्यासाठी ३७ मतांचा कोटा आवश्यक आहे. भाजपचे १५६ आमदार आणि काँग्रेसचे १७ आमदार असल्याने या चारही जागा भाजपच्या पदरात पडणे निश्चित आहे.

राजस्थान, मध्य प्रदेशात स्थिती ‘जैसे थे’ राहणार?

राजस्थानमध्ये विधानसभेच्या एकूण २०० जागा आहेत. रिक्त होणाऱ्या तीन जागांपैकी दोन जागा भाजपाकडे आणि एक जागा काँग्रेसकडे आहे. येथे एक जागा जिंकण्यासाठी ५१ मतांचा कोटा आवश्यक आहे. भाजपकडे ११५ जागा आणि काँग्रेसकडे ६९ जागा असल्याने, भाजपकडे पुन्हा दोन जागा आणि काँग्रेसकडे एक जागा जाण्याची अपेक्षा आहे. मध्य प्रदेशात विधानसभेच्या एकूण २३० जागा आहेत. रिक्त होणाऱ्या तीन जागांपैकी दोन जागा भाजपकडे आणि १ जागा काँग्रेसकडे आहे. त्यामुळे येथील कोटा ५८ मतांचा आहे, तर सध्या भाजप आणि काँग्रेसचे संख्याबळ अनुक्रमे १६३ आणि ६६ आहे. यामुळे भाजप पुन्हा राज्यसभेच्या दोन जागा आणि काँग्रेसची एक जागा मिळवणार असे दिसते.

झारखंडमध्ये दोन्ही जागा इंडिया आघाडीला मिळणार?

झारखंडमध्ये विधानसभेच्या ८१ जागा आहेत. राज्यसभेच्या दोन जागा रिक्त होत असून निवडणूक जिंकण्यासाठी २८ मतांचा कोटा आवश्यक आहे. सद्यस्थितीनुसार, भाजप आणि जेएमएम (JMM) कडे प्रत्येकी एक जागा आहे. सध्या ‘इंडिया’ (INDIA) आघाडीचे ५६ आणि एनडीएचे (NDA) २४ असे संख्याबळ पाहता, विरोधी पक्ष दोन्ही जागा जिंकण्याचा प्रयत्न करेल, तर एनडीए रणनीती आखून एक जागा पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करेल.