मधु कांबळे

मुंबई : हातात निवडून येण्यासाठी पुरेशी मते नसतानाही शिवसेनेने राज्यसभेची सहावी जागा लढविण्याचे जाहीर केल्यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडीत धुसफूस सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने संभाजी राजे यांच्या उमेदवारीला अनुकूलता दर्शविल्याची चर्चा सुरू असताना शिवसेनेने मात्र आपलाच उमेदवार देण्याबाबत ठाम राहण्याचे संकेत दिले. राज्यसभेच्या निवडणुकीत एकेका मताला महत्त्व असल्याने सहाव्या उमेदवारीबाबत आघाडीत चर्चा झाली पाहिजे अशी भूमिका घेत एरवी आपल्याला डावलणाऱ्या शिवसेना-राष्ट्रवादीला कोंडीत धरण्याचा व कॉंग्रेसचे राजकीय महत्त्व अधोरेखित करण्याची खेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सहा जागांसाठी १० जूनला निवडणूक होत आहे. विधानसभा सदस्यांमधून राज्यसभेवर उमेदवार निवडून द्यायचे आहेत. निवडून येण्यासाठी ४१.०१ मते मिळणे आवश्यक आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार १०६ आमदार असलेल्या भाजपचे दोन उमेदवार सहज निवडून येऊ शकतात व त्यांची काही मते शिल्लक राहतात. शिवसेनेचे ५५ आमदार आहेत, त्यांचा एक उमेदवार निवडून येतो व १३ मते अतिरिक्त ठरतात. राष्ट्रवादी काँग्रेसकडे ५३ मते आहेत, त्यांचाही एक उमेदवार निवडून येतो व १२ मते शिल्लक राहतात. काँग्रेसचे ४४ आमदार आहेत. त्यांनाही एक जागा मिळते व ३ मते शिल्लक राहतात. कोणत्याही एका पक्षाच्या अतिरिक्त मतांवर सहावा उमेदवार निवडून येऊ शकत नाही. सहाव्या जागेबाबत भाजपने अजून आपले पत्ते उघड केलेले नाहीत. परंतु शिवसेनेने सहावी जागा लढविणार अशी घोषणा केली आहे. मात्र मतांचे गणित कसे जमविणार, याबाबत अद्याप त्यांचे आडाखे समोर आलेले नाहीत.

दरम्यान राज्यसभेच्या सहाव्या जागेवरूनच सध्या महाविकास आघाडीमधील घटक पक्षांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादीकडून संभाजीराजे यांच्या उमेदवारीसाठी अनुकूलता दर्शविण्यात आल्याचे बोलले जाते. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना, त्याबाबत आपणास काही माहिती नाही, असे सांगितले. शिवसेनेच्या सहाव्या उमेदवाराबाबत, त्यांनी कुणी किती जागा लढवायच्या हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. निवडून येण्यासाठी एकेका मताला महत्त्व असल्याने शुक्रवारी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सहाव्या जागेबाबत आघाडीत चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी केली. एरवी शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसला डावलतात, दुय्यम स्थान देतात अशी नाराजी कॉंग्रेसचे मंत्री, नेते व्यक्त करत असतात. आता शिवसेनेसाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या सहाव्या जागेवरून कोंडीत धरत कॉंग्रेसचे महत्त्व वाढिवण्याचा प्रयत्न त्यातून नाना पटोले यांनी केला. किंबहुना शिवसेनेला व राष्ट्रवादी आम्हाला गृहित धरू नका, असे काँग्रेसने सूचित केल्याचे मानले जात आहे.