मोहनीराज लहाडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सलग पाच वर्षे नगरचे पालकमंत्री पद सांभाळणाऱ्या राम शिंदे यांना त्यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघात पराभव पत्करावा लागल्यानंतर आता भाजपने त्यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी देऊन एकप्रकारे त्यांचे पुनर्वसन केले आहे. त्यातून आगामी काळात धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर भाजपने आणखी एका चेहऱ्याला झळाळी दिली आहे. विधान परिषदेमुळे आता राम शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्याविरोधात पर्यायाने पवार कुटुंबीयांच्या विरोधात लढण्यासाठी भाजपने बळ दिले आहे. जिल्ह्यात यानिमित्ताने राम शिंदे यांचा विखे यांच्याविरुद्धचा पक्षांतर्गत संघर्षही भविष्यात तीव्र होताना दिसू शकतो. अर्थात आतापर्यंत आमदारकी असो की मंत्रीपद, संधीचे सोने करण्यात हुकलेले राम शिंदे या संधीचे सोने करू शकतील का हा प्रश्न चर्चेला आला आहे.

खरेतर राम शिंदे यांची आजवरची कारकीर्द, जीवन कायमच चढ-उताराचे राहिले आहे. सालकरी गड्याचा मुलगा ते मंत्री अशी भरारी त्यांनी घेतली होती. मात्र या भरारीने त्यांचे पाय जमिनीवर राहिले नाहीत, अशीही भावना पक्षाचे कार्यकर्ते आणि त्यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघात निर्माण झाली होती. पराभवाने त्याची त्यांना जाणीव करून दिली. एमएस्सी. बीएड. केल्यानंतर त्यांनी सुरुवातीचे काही काळ आष्टी (बीड) येथील एका महाविद्यालयात शिक्षक म्हणून काम केले. युती सरकारच्या काळात अण्णा डांगे मंत्री असताना त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडी (जामखेड) येथे चौंडी विकास प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पावर दैनंदिन लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी अहिल्यादेवींच्या माहेरकडील वंशज म्हणून राम शिंदे यांना प्रकल्पावर सदस्य म्हणून संधी दिली. तेथूनच राम शिंदे भाजपमध्ये सक्रिय झाले. पुढे अण्णा डांगे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली व ते राष्ट्रवादीत गेले, मात्र राम शिंदे भाजपमध्येच राहिले.

प्रवीण दरेकर – राजकीय वाऱ्यांची दिशा हेरणारे व्यक्तीमत्त्व

त्यानंतर त्यांनी १९९७ मध्ये राजकारणात उडी घेतली. पहिल्याच निवडणुकीत, पंचायत समितीच्या जवळा गणात त्यांना थोड्या मतांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर त्यांनी प्रस्थापितांची चौंडी ग्रामपंचायतमधील ४० वर्षांची सत्ता उलथून टाकत सरपंच म्हणून पाच वर्ष काम पाहिले. २००२ मध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी त्यांनी तयारी सुरू केली. मात्र त्यांच्या उमेदवारीला पक्षांतर्गत विरोध झाला. त्यामुळे त्यांना शांत बसावे लागेल. बाजार समितीच्या निवडणुकीतही दोन्ही पॅनलने त्यांना उमेदवारी दिली नाही. त्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. मात्र त्यांचा एक मताने पराभव झाला. पुढे २००६ मध्ये ते भाजपचे तालुकाध्यक्ष झाले आणि नंतरच्या वर्षात त्यांच्या पत्नी आशा पंचायत समितीच्या जवळा गटातून विजय झाल्या. सन २००९ मध्ये कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आरक्षण बदलले आणि भाजपकडून राम शिंदे यांनी तेथून विजय मिळवला. तेंव्हाही त्यांच्या उमेदवारीला पक्षांतर्गत विरोध होताच. त्याचवेळी ते भाजपचे जिल्हाध्यक्ष झाले, पुढे नंतर प्रदेश सरचिटणीस. मात्र मतदारसंघातील पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आणि त्यांच्यात कायमच वैमनस्य राहिले.

सन २०१४ च्या निवडणुकीत पुन्हा ते विजयी झाले आणि भाजपच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून त्यांचा समावेश झाला. सुरुवातीच्या काळात ते भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या जवळचे म्हणून ओळखले जात. पुढे काळाची पावले ओळखत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास संपादन केला. त्यातूनच पंकजा मुंडे यांच्याकडील ‘जलसंधारण’ हे खाते व कॅबिनेट मंत्रिपदाची बढती अशी सोनेरी संधी राम शिंदे यांना मिळाली. भाजप सरकारची ‘जलयुक्त शिवार’ ही महत्त्वाकांक्षी योजना त्यांनी राबवली. आता या योजनेतील कर्जत-जामखेडमधील कामांची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यामार्फत सुरू आहे. जिल्ह्यातील ‘जलयुक्त शिवार’ची इतर कोणत्याही कामाची चौकशी केली जात नाही. केवळ राम शिंदे यांच्या तत्कालीन मतदारसंघातील कामांचीच चौकशी केली जात आहे.

सचिन अहिर – कामगार ते गृहनिर्माण… सर्वत्र संचार

मंत्रिपदाच्या काळात काही ठराविक पदाधिकार्‍यांच्या कोंडाळ्यातील त्यांचा वावर राहिला. पक्षाच्या कार्यकर्त्यांना, नागरिकांना भेटत नाहीत अशा तक्रारी वाढू लागल्या. त्यांनी बांधलेल्या बंगल्याची जोरदार चर्चा त्यावेळी झाली होती. बाहेरचा उमेदवार अशी संभावना करत राम शिंदे यांनी पवार कुटुंबातील रोहित पवार यांच्या उमेदवारीकडे दुर्लक्ष केले आणि ते त्यांना भोवले. सन २०१९ मध्ये रोहित पवारांसारख्या तरुणाकडून पराभव पत्करण्याची वेळ त्यांच्यावर आली. आपल्यासह जिल्ह्यातील काही प्रमुख उमेदवारांच्या पराभवाला विखे जबाबदार असल्याची तक्रार त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली होती. त्यातूनच त्यांचे व विखेगटाचे वितुष्ट निर्माण झाले. पराभवानंतर पक्ष व फडणवीस यांच्याशी असलेली एकनिष्ठता पाहून भाजप प्रदेश समितीत त्यांचा समावेश करण्यात आला. शांत, संयमी असलेले राम शिंदे आपण नेहमी रुबाबदार कसे दिसू याबद्दल दक्ष असतात. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या असभ्य भाषेमुळे आणि वादग्रस्त पार्श्वभूमीमुळे पक्षाची प्रतिमा डागाळत असल्याची प्रतिक्रिया भाजपच्या पारंपरिक मतदारांमध्ये उमटत आहे. त्यामुळे राम शिंदे यांच्या रूपात धनगर समाजातील एक सुसंस्कृत व पक्षनिष्ठ चेहरा देण्याचा भाजपचा प्रयत्नही त्यांच्या उमदेवारीतून दिसतो.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ram shinde bjp leader candidate for mlc election in maharashtra print politics news pmw
First published on: 09-06-2022 at 19:27 IST