छत्रपती संभाजीनगर : राज्यसभेची उमेदवारी मिळावी म्हणून अपेक्षा ठेवून असणाऱ्या डॉ. भागवत कराड यांचा पत्ता कटला आणि हिंगोली जिल्ह्यातील रामराव वडकुते यांना राज्यसभेची उमेदवारी भाजपने जाहीर केली. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात धनगर आणि हटकर समाजाचे मतदान अधिक आहे. शिवाय बारामतीसह पश्चिम महाराष्ट्रातील मतदानावर या उमेदवारीतून राजकीय संदेश जावा म्हणून वडकुते यांचे नाव निश्चित करण्यात आल्याचे मानले जाते. वडकुते यांना ही दुसरी लॉटरी असल्याचे सांगण्यात येते. यापूर्वी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या वतीने ते विधान परिषदेवर निवडून आले होते. तेव्हा सूर्यकांता पाटील यांचे नाव चर्चेत होते. त्यामुळे वडकुते यांना ही दुसरी लॉटरी लागल्याची चर्चा आहे.

वडकुते हे मुळचे हिंगोली जिल्ह्याचे. त्यांना भाजप कार्यालयातून तातडीने बाेलावण्यात आल्याने ते कार्यकर्त्यांसह सोमवारी मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. वडकुते हे एकेकाळी शरद पवार यांचे कट्टर समर्थक. २००२ मध्ये ते अहिल्याबाई होळकर शेळी मेंढी विकास महामंडळावर त्यांची वर्णी लागली होती.

२००४ मध्ये त्यांनी कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागाला होता. राष्ट्रवादीकडून विधान परिषदेवर निवड झाल्यानंतर राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत त्यांनी भाजपमध्ये २०१९ मध्ये प्रवेश केला होता. हिंगाेली विधानसभा मतदारसंघातून त्यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी मागितली होती. त्यांना उमेदवारी दिली गेली नाही. तरीही त्यांनी पक्ष सोडला नव्हता. हिंगोलीचे लोकसभा प्रभारी आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले.

डॉ. भागवत कराड यांना मात्र पुन्हा राज्यसभेतील उमेदवारी मिळू शकली नाही. बीडच्या राजकारणातील पंकजा मुंडे यांना आव्हान म्हणून डाॅ. कराड यांना उमेदवारी देण्यात आल्याचे मानले जात होते. मात्र, जनमानसातील नेता अशी प्रतिमा त्यांना निर्माण करता आली नाही. ओबीसी राजकारणाच्या केंद्रस्थानी असणाऱ्या मराठवाड्यातील नेत्यांसमोर ‘ मराठा आंदोलन’ मोठे होते गेले.

पण तो प्रभाव कमी करण्यात भाजपमधील ओबीसी नेत्यांना यश मिळाले नाही. याच काळात धनगर आरक्षणातील वर्ग बदलाचा लढाही मोठा होत गेला. तो प्रभाव लक्षात घेऊन वडकुते यांची निवड झाल्याची चर्चा आहे. वडकुते यांच्यामुळे राज्यसभेतील उमेदवारीमुळे मराठवाड्यातील तीन खासदार राज्यसभेत दिसतील. या पूर्वी अजित गोपछेडे, अशोकराव चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली होती.