मुंबई : भाजपच्या विधानसभा निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपचा राज्यात आणि विशेषत: मराठवाड्यात दारुण पराभव झाला. या पार्श्वभूमीवर मराठवाडा आणि मराठा असे समीकरण भाजपने साधले आहे.

भाजपने लोकसभा निवडणुकीत आमदार श्रीकांत भारतीय यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक व्यवस्थापन समिती स्थापन केली होती. आता या समितीचे प्रमुखपद दानवे यांना देण्यात आले आहे. मराठवाड्यात भाजप पक्ष संघटना कमजोर झाली असून मराठा आरक्षणाच्या प्रश्नाचाही फटका बसला आहे. स्वत: दानवे हे जालना मतदारसंघातून पराभूत झाले होते. मराठवाड्यात पक्षाला बळ मिळावे या उद्देशाने दानवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> Dalit CMs in India : सुशीलकुमार शिंदेंच्या निमित्ताने आढावा; देशातले ८ दलित मुख्यमंत्री कोण?

विविध समित्यांचे प्रमुख पुढीलप्रमाणे – जाहीरनामा समिती – वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार विशेष संपर्क झ्र उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सामाजिक संपर्क – राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, महिला संपर्क – राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर, कृषी क्षेत्र संपर्क – खासदार अशोक चव्हाण, लाभार्थी संपर्क – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, युवा संपर्क – केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, प्रचार यंत्रणा झ्र सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, सहकार क्षेत्र संपर्क – विधान परिषद गटनेते प्रवीण दरेकर, प्रसिद्धीमाध्यमे – आमदार अतुल भातखळकर, ग्रामीण व शहरी स्थानिक स्वराज्य संस्था संपर्क झ्र केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, अनुसूचित जाती संपर्क – माजी आमदार भाई गिरकर, अनुसूचित जमाती संपर्क – आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, समाजमाध्यमे – आमदार निरंजन डावखरे, निवडणूक आयोग संपर्क- माजी खासदार किरीट सोमय्या.महायुती निवडणूक अभियान समन्वयक – ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन

विशेष आमंत्रित म्हणून केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी मंत्री गणेश नाईक, माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांची नियुक्ती करण्यात आल्याचे दानवे यांनी नमूद केले.

राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन करण्याच्या निर्धाराने पक्ष कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. मतदानकेंद्र स्तरापर्यंतची यंत्रणा सक्षम करण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीचे नियोजन करण्यासाठी प्रदेश, जिल्हा, तालुका स्तरावर अधिवेशने झाली आहेत. विविध स्तरांवर समित्या गठित करण्यात आल्या आहेत. – रावसाहेब दानवे